लॉक किया जाय?

25 Jun 2018 14:27:08



 
 

बदलत्या काळात एसी नसेल तर घर कितीही मोठे असूदे, सुखसंपन्नतेने भरलेले असू दे पण त्या घराला मोठेपण मिळणार नाही, अशीच मानसिकता तयार झाली आहे. भर उन्हातान्हात घामाने निथळत असताना, घरी थंड झोकदार हवा उपलब्ध असणे यासारखं सुख नाहीच म्हणा. पण तरीही उष्णता जाणवत नसताना, गरज नसतानाही कधीही, केव्हाही घरी एसीचे बटण ऑनच हवे आणि एसी सर्रास १६ से. ते १८ से.च्या मध्ये सुरू असायला हवा, अशीही मानसिकता दृढ होत चालली आहे. याला काय म्हणावे? जाहीर आहे की, आपल्या भारतीय शरीराला इतक्या कमी तापमानाची सवय नसतेच, नव्हे आपले अनुवांशिकपण त्याला सरावलेलेही नसते. त्यामुळे शरीराला तात्पुरते गारेगार वाटले तरी आतून एसीच्या हवेचे दुष्परिणाम काय होत असतील, याचा विचार करायलाच हवा.

आता कुणी म्हणेल की, देशात केवळ सहा टक्के घरांमध्ये एसी आहेत, पण सर्वच मोठ्या उद्योगधंद्यांच्या कार्यालयात, व्यवस्थापनामध्ये एसी आहेतच. त्याचे काय? बरं, या एसीचा परिणाम नुसत्या मानवी शरीरावर होतो का? तर नाही. वातावरणात जिवंत असलेल्या कित्येक उपकारी सूक्ष्म जिवांवरसुद्धा त्याचा परिणाम होतो. एसी मर्यादित परिसराची हवा थंड करत असतानाच पर्यावरणाचीही भयंकर हानी करतो. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांचे विधान याबाबतीत विचार करण्यासारखे आहे. ते नुकतेच म्हणाले की, “एसी चालू केला की, त्याचे तापमान आपोआप २४ अंश सेल्सिअसवरच राहिल, अशी अंतर्गत व्यवस्था उत्पादकांना त्या यंत्रातच करायला सांगण्याचा सरकारचा विचार आहे.” यावर जाणकारांच्या मते देशभरात बसविलेल्या एसीची क्षमता ८० दशलक्ष टन हवेच्या वातानुकूलनाची आहे. २०३० पर्यंत हीच क्षमता २५० दशलक्ष वाढण्याची अपेक्षा आहे. या सर्वांचे डिफॉल्ट सेंटिग केले तर ४० दशलक्ष युनिट विजेची रोज बचत होऊ शकते. विजेची कमतरता आणि त्यानुसार विस्कळीत असणारे जनजीवन, उद्योगजीवन हा देशासमोरचा मोठा प्रश् आहे. एसीच्या २४ अंश सेल्सिअस डिफॉल्ट सेटिंगने पर्यावरण, लोकजीवन आणि विजेच्या बचतीसाठी सोपा मार्ग खुला होणार आहे, तर मग एसी २४ सेल्सिअसवर लॉक किया जाय?

 
 

घरामधला अंधार लपवून!

सूर्यकांत शिंदेने पत्नी माधुरी शिंदेवर कुर्‍हाडीचे वार करून तिचा खून केला. कोल्हापूरच्या शिरोळे गावची घटना. सूर्यकांतने तिच्यावर यापूर्वीही प्राणघातक हल्ला केला होता आणि काही दिवसांपूर्वी तर वेगळ्या राहणार्‍या माधुरीच्या घराची वीजही तोडली होती. याचाच अर्थ माधुरी आणि परिसरातील सर्वांनाच माधुरी आणि सूर्यकांत यांच्यामध्ये काय चालले आहे, याबाबत माहिती होती. पण एकदा का शुभ मंगल सावधान झाले की, दोन जिवांच्यामध्ये काहीही झाले तरी तो त्यांचा कौटुंबिक मामला आहे, असे बोलून साळसूदपणे बाजूला व्हायचे, ही समाजाची रितच आहे. तसेच या घटनेमध्ये सूर्यकांतच्या या निर्घृण कृत्याचे कारण काय असावे? हा प्रश् पुढे येतो. अर्थात कारण काहीही असले तरी त्याचे उत्तर माधुरीने असे निर्घृण आणि क्रूरपणे मरणे, हे नक्कीच नव्हते.

असो, माधुरी ही फक्त रांधा- वाढा-उष्टी काढाची प्रतिनिधित्व करणारी महिला नव्हती, तर ती तृप्ती देसाईंच्या भूमाता ब्रिगेडच्या कोल्हापूर शाखेची उपाध्यक्षा होती. कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर गाभारा प्रवेश, शनिशिंगणापूर आणि हाजीअलीच्या प्रवेश आंदोलनामध्येही ती सक्रिय होती. मंदिर प्रवेश महत्त्वाचा होता पण आयुष्यात होणार्‍या अन्यायाविरुद्ध न्यायाचा प्रवेशही तितकाच महत्त्वाचा आहे, हा विषय माधुरीने गंभीरतेने घेतला होता का? भूमाता ब्रिगेडच्या छत्राखाली आंदोलन करताना माधुरीला कधीतरी वाटले का की, आपल्या घरामध्येही माणूस म्हणून हक्क मिळवण्यासाठी आंदोलन व्हायला हवे? छे! स्वतःला क्रांतिकारी, पुरोगामी वगैरे म्हणवून घेणार्‍या संस्थांची मर्यादा या घटनेमुळे प्रकर्षाने समोर येते. अशा संघटनांनी एकवार तपासावे की जनतेच्या-धर्माच्या उद्धारासाठी, नव्या क्रांतीसाठी वगैरे आपण आंदोलन चालवतो. पण या आपल्या आंदोलनात सहभागी होणार्‍यांच्या आयुष्यात काय चालले आहे? ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आंदोलनाचे फड उभे करतो, त्यांचे आयुष्य कसे आहे? दुःखाने म्हणावे लागेल की, दिव्याखाली अंधारच असतो. अशा कितीतरी माधुरी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आज वावरताना दिसतात. होऊ घातलेल्या माधुरींसाठी एकच सांगणे ‘अत्त दीप भवझाल्याशिवाय लोकदीप होता येतच नाही. समाजसुधारणा होणे आवश्यक आहे, पण त्याची सुरुवात स्वतःपासून. घरामधला अंधार लपवून, टाळून बाहेरचा सूर्य उगवत नसतो.

Powered By Sangraha 9.0