सांग सांग विश्ननाथा, तळे दिसेल काय?

    दिनांक  25-Jun-2018   
एखाद्या महत्त्वाच्या प्रशासकीय पदावर अथवा राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी बेजबाबदार विधाने करणे, आम्हा भारतीयांच्या तसे अगदीच अंगवळणी पडलेले. कोणीही उठतो आणि मीडियाला ‘बाईट’ हवी ना, म्हणून गंभीर विषयही ‘चावून’ चोथा करतो. मागितलीत ना आमच्याकडे प्रतिक्रिया, मग आता ऐका आमची प्रतिक्रिया. मग ती कशीही का असेना... कितीही उथळ, बेपर्वा, पदाला न शोभणारीही... पण, ‘करून दाखवले’ वाल्या शाखेची ही मंडळी या बडबडीत कशी बरं मागे राहतील म्हणा! आणि त्यातही मुंबईचे प्रथम नागरिक अर्थात महापौर मास्टरांचा हात तर कोणी धरूच शकत नाही.

 

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना शहर आणि उपनगरातील रात्रभर कोसळणाऱ्या पावसाविषयी आणि परिणामी ठिकठिकाणी पाणी तुंबल्याविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर “मुंबईत कुठे पाणी साचलेच नाही,” या त्यांच्या विधानावर हसावे की रडावे, हेच कळत नाही. म्हणजे, रात्रीपासून धो-धो धुवांधार कोसळलेल्या पावसानंतर मुंबईच्या महापौरांना मात्र कुठेही पाणी साचलेले दिसत नाही. याचेच दोनच अर्थ, एक तर महापौर बंगल्याबाहेर (लाजेखातर) पालिका प्रशासनाने व्यवस्था केल्यास रस्त्याची डबकी झालेली नसतील किंवा महापौरसाहेब घरातून बाहेर पडूनही त्यांनी डोळ्यावर कदाचित झापडं लावली असावीत पण, खरेतर यापैकी काही नाही. कारण, खुद्द महापौरसाहेबच म्हणाले की, “आम्ही (नगरसेवक) मुंबईत फिरत आहोत आणि इतके फिरूनही पाणी साचलेले दिसले नाही.” पण, महापौरसाहेब, जरा आम्हालाही सांगा मुंबईच्या अशा कुठल्या भागात आपण दौरा केलात, जिथे पाण्याचा टिपूसही साचलेला नाही. मग आम्हीही आमचे बस्तान तिथेच हलवू म्हणतो... मुंबईवरील रस्त्यांची झालेली डबकीही मुंबापुरीच्या प्रथम नागरिकाच्या दृष्टीस पडू नयेत, यासारखे या महानगराचे दुसरे दुर्देव ते कोणते? मुंबईची ‘तुंबई’ होऊनही पालिका प्रशासनाची पाठ थोपटणारे हे महापौर म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस म्हणावे लागेल. पण, मास्टरांचे काही सांगता येत नाही. कधी मुंबईच्या समस्यांचे खापर ते याच बेफिकीर पालिका प्रशासनावर फोडतात, तर कधी त्यांची थेट मजल मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेण्यापर्यंत जाते. म्हणूनच की काय, महापौरांना कदाचित मुंबईतील पावसामुळे तयार झालेली तळी दिसत नसावीत. म्हणून ‘भोलनाथ’ ऐवजी ‘विश्ननाथा’लाच विचारेसे वाटते, सांग सांग विश्वनाथा, रस्त्यावर तळे दिसेल काय?

 

अन् साहेबांना वरुणकोपाची भीती

 

मान्सून आला की सर्वत्र वातावरण कसं अगदी आल्हाददायक होतं. पण, मुंबई महानगरपालिकेत पावसाळा आणि त्यातही धो-धो कोसळणारा पाऊस पडतोय म्हटल्यावर वातावरणाचा नूरच अगदी पालटतो. आपत्कालीन यंत्रणांना म्हणा सदैव ‘अलर्ट’ राहावे लागतेच, पण पावसाळ्यात त्यांच्यावरील ही नैतिक जबाबदारी अधिकच वाढते कारण, संपूर्ण मुंबईची पर्जन्य सुरक्षा या एका यंत्रणेच्या हाती एकवटलेली असते. ही यंत्रणा, तिची कार्यप्रणाली फसली की मुंबईही बुडते. म्हणूनच, ज्या सत्ताधारी शिवसेनेची पालिकेवर सत्ता आहे, तिच्या महापौरांना मुंबईत साधं कुठे पाणी साचल्यासारखंही वाटलं नाही, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षप्रमुखांनी मात्र वांद्रयावरून थेट पालिका मुख्यालय गाठले आणि आपत्कालीन विभागाशी परिस्थितीविषयी चर्चा केली. म्हणजे, महापौरांना पावसाचे गांभीर्यच नाही आणि गतअनुभवांवरून पक्षप्रमुखांना वरुणराजाच्या कोपाची इतकी भीती की, ते पालिका मुख्यालयात धावून आले.

 

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, “गेल्या वर्षीइतका पाऊस यंदा कोसळलेला नाही.” उद्धवजी, ते तुमचे आणि आम्हा मुंबईकरांचे खरं तर सुदैवच म्हणायचे. कारण, मागच्या वर्षीसारखी पूरपरिस्थिती पुन्हा उद्भवली असती तर मुंबईकरांनी तुम्हाला, तुमच्या पक्षाला कदापि माफ केले नसते, हे निश्चित! कारण, दरवर्षी पावसाळा आला की, मुंबईची एक दिवस तरी तुंबापुरी होऊन या महानगराची गती ठप्प होणार, हे जणू गृहितकच! तसे कालच्या पावसात झाले नाही, म्हणजे ते आगामी काळात होणार नाही, असेही नाही. त्यात उद्धवजी, गेल्या वर्षी तुम्हीच म्हणाला होतात की, “इतका पाऊस पडतोय, त्याला आम्ही काय करणार?” पण, दरवर्षी असाच पाऊस कोसळणार... त्यामुळे मुंबईचे पालकत्व स्वीकारलेल्या पालिकेचीच मुंबईला सुरक्षित ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी. ती तुम्हाला-आम्हाला झटकून कोणत्याही कारणास्तव चालणार नाहीच. पण, महापौरांचा ‘चलता है’, ‘हे तर होणारच...’, ‘काही झालेच नाही’ हा मुंबईकरांना गृहित धरून बुडवण्याचाच प्रकार म्हणावा लागेल. त्यात महापौरांच्या दृष्टीने कालच्या पावसात जीवितहानी झाली नाही ना, याचेच गुणगान. पण, मग ती होईपर्यंत आपण वाट पाहायची का? वडाळ्याचा रस्ता खचल्याच्या घटनेतील झालेल्या आर्थिक नुकसानाला जबाबदार कोण? त्याचे उत्तर मात्र महापौरसाहेबांकडे आणि उद्धवजी तुमच्याकडेही नाही. तेव्हा, वरुणाचा कोप होण्यापूर्वी पालिका प्रशासनाने मान्सूनपूर्व चोख कामं केली, तर ‘मातोश्री’ वरून असा वरुणासाठी ‘धावा’ करायची वेळ येणारच नाही.