मुंबईत कुठेच पाणी तुंबले नाही : महापौर

25 Jun 2018 21:44:43





मुंबई : काल रात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत आज सकाळी अनेक भागांत पाणी साचले होते. त्याचा विपरित परिणाम मुंबईच्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर झाला. त्यामुळे मुंबईच्या वेगाला ब्रेक लागला, पण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या मते मुंबईला कुठेही ब्रेक लागला नाही.

 
 

मुंबईत कुठेच पाणी साचले नाही, असा दावा विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला. उलट त्यांनी मुंबई महापालिकेच्या कर्मचार्‍यांना चांगले काम केल्याचे प्रशस्तिपत्रकच दिले आहे. मुंबईत कुठेही पाणी तुंबले नाही. काही दुर्घटना घडल्या पण त्यामध्ये जीवितहानी झाली नाही, हे सुदैव,” असे महाडेश्वर म्हणाले. मी सकाळपासून मुंबईत फिरतोय पण मला कुठेही पाणी तुंबलेले दिसले नाही. काही ठिकाणी पाणी थोडंसं साचलं होतं पण ते काढून टाकण्यात आलं,” असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

 
 

मुंबईत गेल्या २४ तासांत सर्वाधिक २३१ मिमी पावसाची नोंद झाली. जून महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर कोसळलेल्या पावसामुळे महापालिकेचे सर्वच दावे वाहून गेले, पण महापौर हे मान्य करायला तयार नाहीत, अशी प्रतिक्रिया समाजाच्या विविध स्तरामधून उमटत आहे. नेहमीप्रमाणे हिंदमाता, सायन, चेंबूर, कुर्ला, खार, मिलन सबवे या भागांत पाणी साचले. त्याचे फोटोही लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाले, पण एवढे सर्व होऊनही मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या मते मुंबईत पाणी साचलंच नाही.

 
 

पावसामुळे उद्भवणार्‍या परिस्थितीस पालिका सत्ताधारी जबाबदार

मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाल्यानंतर आता विविध राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी या परिस्थितीसाठी शिवसेनेला जबाबदार धरले आहे. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नाव न घेता शिवसेनेला टोला लगावला. यावेळी शेलार म्हणाले की, ”मुंबईत पावसामुळे जी परिस्थिती उद्भवली त्याची जबाबदारी मुंबई महापालिकेतील सत्ताधार्‍यांना नाकारता येणार नाही. करून दाखवणारे पळून गेले,” असे शेलार म्हणाले. मुंबईतील पावसाचा मतदानावर परिणाम झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

- अ‍ॅड.आशिष शेलार,आमदार भाजप

Powered By Sangraha 9.0