संघसमर्पित दादा...

24 Jun 2018 18:56:17


 
 
 

 

गोविंद भगवान तथा दादा चोळकर या एका तपस्वी व्यक्तिचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...


आजच्या तरुण संघ कार्यकर्त्यांना दादा हे काय रसायन होतं हे नाही समजणार! पण एकोणिसाव्या शतकातल्या ५० ते ८० या दशकांमधील कल्याण व ठाणे परिसरातील स्वयंसेवकांचे ते एक अवर्णनीय असे दैवत होते. आमच्या सर्वांच्या पाठीवर आश्वासक असा हात फिरवणारे असे हे व्यक्तिमत्त्व! अशा अनेक, एका अर्थाने, खड्यांना हेरुन त्यांना हळुवार हाताने पैलू पाडण्याचे कामे दादांनी वर्षानुवर्षे केले आणि हे सर्व करीत असताना ऋषीमुनींप्रमाणे अगदी अलिप्त राहिले.

दादांबद्दल मी आता जे लिहीत आहे, तो तारीख-महिने-वर्षांचा इतिहास मात्र नाही. या स्वैर अशा स्मरणचित्रांचे हे रेखाटन आहे.

त्यावेळी आम्ही टिळक चौकात राहात असू, खालूनच हाक येत असे, “नंदा आहे का घरी?” आणि मग वर येऊन अगदी घरगुती चौकशी. मी नववी-दहावीत असेन. १९५३ -५४ साल. मे महिन्याची सुटी लागली आणि दादांच्या सांगण्याने मी पहिल्यांदा वाडे येथून जवळच असणार्या गोर्ह गावी पंधरा दिवस विस्तारक म्हणून गेलो. दादांनी स्वत: मला तेथे नेऊन सोडलं. येवढंस गाव! ज्यांच्या घरी उतरलो होतो, तेथून दीड मैलावरील नदीवर आंघोळीसाठी जायचे-येताना खांद्यावरुन एक घागर पाणी घरी आणायचे. मग मऊ भात वा तत्सम न्याहरी, मग गावातल्या बाल मंडळींना एकत्र करुन दंगा-मस्ती खेळ -सायम् शाखा! पंधरा दिवस कसे गेले पत्ताही नाही लागला! माझ्या सारखाच असा अनुभव दादांनी हेरुन हेरुन अनेक कार्यकर्त्यांना दिला. १९५० -६० हे दशक आठवावे. प्रथम संघबंदीच्या धक्क्यातून सर्व जण सावरले नव्हते. या धक्क्यातून दादांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढले, परत कार्यप्रवृत्त केले.

अत्यंत साधे व्यक्तिमत्त्व, डोक्यावर थोडसं टक्कल. चेहर्यावर सततचा एक मंद हास्य भाव, खाकी हाफ पँटमध्ये खोचलेला पांढरा-स्वच्छ, बाह्यांना घडी घातलेला सदरा, पायात साध्याशा वहाणा, कधी पांढरे स्वच्छ काचा घातलेलं धोतर आणि डोक्यावर करड्या रंगाची टोपी...

दादांच्या ठाण्याला झालेल्या एकसष्टीच्या सत्कारात त्यावेळचे प्रांतसंघचालक प्रल्हादजी अभ्यंकर हे दादांबद्दल जे बोलले, ते आजही स्मरणात आहे- “ना खूप आकर्षक व्यक्तिमत्त्व-ना अमोघ वक्तृत्व, ना गोड गळा. तरीही त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांना ते होते तसे सहन केले. त्यांच्या सर्व गुणदोषांसह - हे दादांचे मोठेपण!”

पडद्याआड राहून शांतपणाने काम करीत राहाणे! हे अनेक वेळा जिल्हा शिबिरांची आठ-दहा दिवस आधीपासून तयारी, आखणीपासून उभारणीपर्यंत आणि शिबीर संपल्यानंतरही या सर्वांची आवराआवर, सर्व तंबू-राहुट्यांचे सामान जागोजागी परत पोहोचेपर्यंत दादांचे बारीक लक्ष असे.

दादांचा सर्व जिल्हाभर प्रवास गावोगावी पायी होत असे. प्रवासाचं असं कोणतंच साधन दादा वापरीत नसत. त्यावेळी ठाणे जिल्हा संघकामाच्या दृष्टीने खूप मोठा होता. कर्जतपासून कांजूरमार्गपर्यंत आणि पनवेलपासून पालघर मोखाड्यापर्यंत.

१९५५ साली प्रथमच खूप वर्षांनी पुण्याला संघशिक्षावर्गाला प्रथम वर्षासाठी कल्याणमधून १४ -१५ स्वयंसेवक गेले. मीही एक त्यातलाच होतो.

१९६० साली मी तृतीय वर्षाला नागपूरला गेलो. कल्याणातून बर्याच वर्षांनी तृतीय वर्षाला कार्यकर्ता गेला, दादांच्या आग्रहामुळे. वर्ग संपवून कल्याणला परतलो, त्या दिवशी दादा गाडीवर उतरवण्यासाठी प्लॅटफॉर्मवर हजर होते. संबंध हळुवापरणे टिकवणं हेच त्याचे कारण.

दैनंदिन शाखा-कार्यक्रम याचबरोबर अन्य कामांकडेही दादांचे बारकाईने लक्ष होते. कल्याण जनता सहकारी बँक चालू होऊन मार्गस्थ होण्याचे सर्व श्रेय दादांचे! १९७३ साल असावे, दादा एक दिवस सकाळी घरी आले- मला घेऊन बाहेर पडले. खूप जणांकडे आम्ही कार्यकर्ते काही दिवस जात होतो. पन्नास हजार भागभांडवल जमा होत नव्हते. दादांनी जिद्दीने कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण केला आणि एक दिवस बँक सुरु झाली. टिळक चौकातल्या देवधरांच्या छोट्याशा जागेत, आज बँकेचे दिमाखदार भव्य स्वरुप आपण पाहात आहोत.

छत्रपती शिक्षण मंडळ ही संस्था त्यावेळी प्रभाकर संत, रामभाऊ कापसे, कान्हेरे वगैरे मंडळींनी उभी केली. टिळक चौकातल्या अभिनव विद्या मंदिर शाळेपासून सुरुवात झाली. १ मे १९६० ला संस्थेची स्थापना झाली. एक दिवस दादांनी (१९७३ साल असावं) मी, भास्करराव मराठे व श्यामराव जोशी या तिघांना त्यांच्याच घरी असलेल्या संघकार्यालयाच्या गच्चीत एकत्र बोलावले आणि आमच्याशी खूप वेळ बोलले. आम्ही तिघेही सिव्हील इंजिनिअर, म्हटलं तर शैक्षणिक क्षेत्राशी तसा संबंध कमीच. दादांनी गळ घातली आणि आम्ही तिघेही संस्थेस जोडले गेलो आणि चाळीस वर्षे तरी जोडलेच राहिलो. आज संस्थेचा वटवृक्ष तीन जिल्ह्यांमधून विस्तारला आहे. हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली. ‘प्रांतामधील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था’ असा बहुमान महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सकडून मिळाला. आम्ही तिघांनीही गरजेप्रमाणे चिटणीस, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, कार्याध्यक्ष अशी पदे सांभाळली.

मला आजही आश्चर्य वाटते की, त्यावेळी दादांनी आमच्यातले असे काय हेरले आणि आम्हाला एका अर्थाने अज्ञात अशा क्षेत्रात लोटले?

१९७७ - दुसरी संघबंदी उठली. परत संघकामाची उभारणी सुरु झाली. नमस्कार मंडळात कल्याण शहराचे एकत्रीकरण होते. १९६४ -६८ या काळात मी शहर कार्यवाह होतो, पण मधल्या जवळ-जवळ आठ-नऊ वर्षांत माझा दैनंदिन कामाशी तसा संबंध नव्हता. शहर कार्यवाह म्हणून माझी नियुक्ती घोषणा झाली, मी परत संघकामाच्या गंगौधात सामील झालो. दादांनी त्यांच्या मितभाषी कौशल्याने माझ्यासारख्याच अनेक कार्यकर्त्यांना त्यावेळी आणि नंतरही पडद्याआड राहून कार्यप्रवण केले हे दादांचे मोठेपण!

१९६३ -६४ मध्ये शिक्षण संपवून आम्ही नोकरीला लागलो होतो. त्यावेळी आम्ही एकत्र येऊन दादांना एक सुंदरशी सायकल भेट म्हणून दिली. दादांचा स्वभाव माहीत होता, म्हणून आग्रहाने एक अट घातली की, सायकल केवळ त्यांनीच वापरायची, दुसर्या कुणालाही यायची नाही.

संघ कार्यालयाची जागा हा प्रश्नही त्यावेळी गंभीर बनला होता. काही ना काही कारणाने संघ बंदी आली की, कार्यालयांना कुलपे लागायची. हतबल असल्याची स्थिती व्हायची आणि बोलता बोलता दादांच्याच डोक्यातून कल्पना सुचली आणि ‘सहजीवन सेवा मंडळ’ या ट्रस्टची १५ जून १९८१ ला स्थापना झाली. कै. दादा या मंडळाचे पहिले अध्यक्ष ते जाईपर्यंत. मंडळाच्या घटनेत मंडळाचा अधिकृत पत्ता त्यावेळी ‘सुगंध’, स्वानंद नगर, कल्याण असा होता, रुग्ण साहित्य सेवा, रुग्ण वाहिका सेवा असे शुद्ध सेवा प्रकल्प दादांच्याच प्रेरणेने आजही चालूच आहेत.

दादांचा जन्म कल्याणचाच. १९१७ सालचा मागून कल्याण शहर संघचालक राहिलेले भाऊराव चोळकरांचे दादा चिरंजीव, शालेय शिक्षणानंतर दादा व्हीजेटीआय या माटुंग्याच्या संस्थेतून ‘टेक्सटाईल इंजिनिअर’ झाले होते हे अनेकांना माहितही नाही. एकूणच संघजीवनात दादांनी हा टेंभा कधीच मिरवला नाही. १० -१२ वर्षे दादा मग मुंबईला माटुंग्याला राहात असत. बाळाराम सावरकर, अनंतराव सावरकर वगैरे मंडळी एकत्र एका चाळीत राहात होते. दादांनी एक मिलमध्ये टेक्सटाईल इंजिनिअर म्हणून नोकरीही केली. १९४० च्या सुमारास माटुंग्यालाच दादांना संघकामाचा परीसस्पर्श झाला. संघाच्या कामाला वेळ मिळावा म्हणून मिलमधली नोकरी सोडून, एका शाळेत अर्धवेळ शिक्षक म्हणूनही काही काळ नोकरी केली. १ ऑगस्ट १९४७ ला हीही नोकरी सोडून दादा पूर्णवेळ संघप्रचारक बनले, हा घेतलेला वसा त्यांनी शेवटपर्यंत जपला. सुरवातीला कर्जत तालुका प्रचारक म्हणून असतानाच अचानक संघबंदी आली. त्यावेळी तालुक्यातील कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी सत्याग्रह केला आणि चार महिने विसापूर जेलमध्ये ते बंदी होते.

बंदी नंतर काम परत जोराने उभे राहिले. १९५२ ते १९७२ अखेरपर्यंत दादा ठाणे जिल्हा प्रचारक म्हणून राहिले. त्यावेळच्या ठाणे जिल्ह्यांतील कर्जत, पनवेल, जव्हार, मोखाडा, कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड अशा सर्व तालुक्यांत दादांनी संघकामाचे रोपटे जोराने जोपासले-वाढवले. जिल्ह्यांतील वनवासींचे जटील प्रश्न आणि त्यातून मार्ग याचाही दादांनी खोलवर विचार केला. अनेक वनवासी संस्थांमध्ये दादांचा सहभाग राहिला आहे.

१९७५ साली परत संघबंदी आली. वडील कै. भाऊराव यांना त्यांच्या वयाच्या ८३ व्या बंदी बनविले. दादा मात्र बंदी उठेपर्यंत पोलिसांना सापडले नाहीत. बंदीकाळातही भूमिगत राहून कायम संचार करीत राहिले. त्यानंतर काही वर्षे त्यांनी पुणे येथील कार्यलयाचेही व्यवस्थापन उत्कृष्ट रीतीने सांभाळले. १९८० नंतर कल्याणला परतल्यानंतरही दादांनी वनवासी क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले. सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघाच्या वतीने देवबांध येथील संस्कार केंद्र आणि इतरही अनेक कार्याशी दादांचा जवळचा संबंध होता.

त्यांचे धाकटे बंधू बाळारावही संघकार्यात रमलेले राहिले. कल्याणची प्रताप प्रदोष शाखा, कल्याणच्या घोषाची पुन्हा उभारणी या मध्ये त्यांचे मोलाचे योगदान घडले.

दादांच्या कितीही आठवणी सांगितल्या, तरी कमीच आहेत. नमस्कार मंडळात रात्री जागवून, मारलेल्या गप्पा, संघगीतांचे गायन, सहकारी स्वयंसेवकांना त्यांच्या शिक्षणात मार्गदर्शन अशा किती एक! या एका तपस्वी, प्रसिद्धीपरान्मुख, समर्पित जीवनास मन:पूर्वक सविनय वंदन.

कै. गोविंद भगवान चोळकर

लेखक : सदानंद त्रिंबक फणसे

Powered By Sangraha 9.0