तहानेच्या वाटेवर उभा असतो पाणीदार माणूस

23 Jun 2018 10:40:35

 

बाळासाहेब सोरगीवकर

चांदूर रेल्वे,

22 जून,

 - चांदूर रेल्वेच्या पाणीदार माणसाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

- सर्वच ऋतूत 20 वर्षांपासून अविरत कार्य


ऐन वैशाखांत गावांना जोडणार्‍या एकट वाटा उन्हाच्या काहिलीने तापलेल्या असतात. या वाटांच्या घशाला कोरड पडलेली असते. वाटेच्या बाजूला झाडे असतात आपली केविलवाणी सावली धरून... झाडांच्या सावल्या पाणीदार वाटतात; पण त्या तहान भागवू शकत नाहीत. त्या सावल्याही तहानलेल्याच असतात कारण, सावली देणार्‍या झाडांच्या मूळाशी कुणीतरी दयाभूताने ओंजळभर पाणी टाकण्याची गरज असते. अशा तहानलेल्या वाटांवर तो उभा आहे गेली वीस वर्षे... हातात गार गार पाण्याचे मग घेऊन. तहाननेने करपू पाहणार्‍या वाटसरूंना तो थंडगार पाणी देतो, तेव्हा त्याची सावली झाडांपेक्षाही मोठी आणि गडतगार झालेली असते. ही करुणेची वृत्ती आहे. लौकिकाचा नाम गलबला त्यांना गरजेचा नाही, तरीही सामान्यांसाठी त्याचे नाव सांगणे गरजेचे आहे, नाव आहे विवेक उर्फ राजू चर्जन!

 

विवेक चर्जन हे बासलापूर गावातले एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. दररोज सकाळी शेतीची सगळी कामे आटोपून दुपारी घरी यायचे, अंघोळ करून आणि दोन घास पोटात टाकून बाहेर पडायचे अन्‌ तहानलेल्यांना पाणी द्यायचे, हा विवेक चर्जन यांचा गेल्या 20 वर्षांपासूनचा नित्यक्रम आहे.त्यांच्याकडे असलेल्या 4 पिशव्या आणि 20 बाटल्यांमध्ये ते पाणी भरतात आणि या थंडगार पाण्याच्या पिशव्या दुचाकीला बांधून प्रवासाला बाहेर पडतात. जवळपास किमान 30 किलोमीटर ते दररोज नक्कीच फिरतात. अमरावतीच्या दिशेने त्यांच्या प्रवासादरम्यान रस्त्यात नजरेस पडणार्‍या प्रत्येक व्यक्तीला आपुलकीने ते एक ग्लासभर तरी पाणी पाजतात.

 

पाणी 20 रुपये लिटरने विकले जाण्याच्या या दिवसांत तहानेल्यांलांना पाणी देण्याचा हा विवेक; पाण्यासाठी व्याकूळ शेतीचा मालक असलेल्या या शेतकर्‍याकडे कुठून आला असावा, असा सवाल अनेकांना पडतो. त्यांच्या या कामामुळे विवेक चर्चन या भागात मोबाईल वॉटरमॅनम्हणून ओळखले जातात. तहानलेल्या वाटा काही केवळ उन्हाळ्यांतच असतात, असे नाही. आभाळातून पडलेलं पाणी डोळ्यादेखत वाहून जाण्याच्या पावसाळी दिवसांत अन्‌ जमिनीत साठलेलं हे पाणी झाडांच्या मूळांमधून झाडांच्या खोडांत, फांद्यांत अन्‌ पानापानांत बहरू लागण्याच्या हिवाळी दवओल्या दिवसांतही वाटा आणि वाटसरू तहानलेलेच असतात. राजू म्हणूनच वर्षभर तहानेचं पाणी घेऊन उभा असतो. ऋतु कुठलाही असो तृष्णातृप्ती करण्याचा त्यांच्या समाधानाचा बहर मात्र ओसरलेला नसतो. झाडांच्या सावलीच्या आश्रयाला आलेल्या श्रमिकांच्या समोर तो पाण्याचा ग्लास करतो.

 

पैसे देऊन खाल्यावरही हॉटेलवाले पाण्याचा पाऊच विकत घ्या म्हणतात. कुलींगचे चार्जेस म्हणून पाच-सात रुपये जास्तीचे लावतात. पाणी थंड करून, बाईकसाठी पेट्रोल खर्च करून पाणी देणारा हा राजू मात्र कुणी देऊ केले तरी पैसे स्वीकारत नाही. ‘‘तहानेने व्याकूळ असणार्‍या एखाद्या व्यक्तीला पाणी पाजल्यास ते सलाईनसारखं काम करते आणि मलाही डॉक्टर झाल्यासाखे वाटते.’’, असे विवेक चर्जन सांगतात. याशिवाय माणसांना रस्तोरस्ती फिरून पाणी पाजणारे विवेक चर्जन पक्ष्यांसाठीसुद्धा जलदूत ठरले आहेत. अमरावती-चांदूर रेल्वे मार्गावर माणसांबरोबर पक्ष्यांसाठीही पाण्याची व्यवस्था त्यांनी केली. दर एक किलोमीटर अंतरावर पक्ष्यांसाठी झाडावर जलपात्र बांधून त्यामध्ये पाणी टाकायला ते कधीच विसरत नाही. याच सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची नुकतीच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्र, शिल्ड व पुस्तक इंडिया बुक ऑफ रेकॉर्डतर्फे विवेक चर्जन यांना प्राप्त झाले आहे.


Powered By Sangraha 9.0