प्लास्टीक बंदीसाठी महानगरपालिका सरसावल्या

23 Jun 2018 21:02:45


 
 
 

पालिकेची जनजागृती पण अजूनही प्लास्टीक घरातच

 

मुंबई : राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने प्लास्टीक बंदी केली आहे. आता जनजागृतीही आणि कारवाईदेखील सुरू झाली आहे. परंतु आजही बऱ्याच घरांमध्ये मोठ्याप्रमाणावर प्लास्टीक आहे. तसेच प्लास्टीक बंदीच्या आदल्या दिवशीही अनेक नागरिकांनी रस्त्यावर प्लास्टीक आणून टाकल्याचे चित्र पहायला मिळाले होते.

 

मुंबईत २६ जुलै २००५ रोजी महापुर आला होता, २९ ऑगस्ट २०१७ रोजीही अतिवृष्टी झाली होती. या दोन्ही घटनांमध्ये अनेकांचा बळी गेला होता. प्लास्टीकमुळे पाण्याचा योग्य रितीने निचरा न झाल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा अध्यादेश दोन महिन्यांपूर्वी जारी केला. त्यानुसार ही बंदी लागू करण्यात आली. याबाबत पालिका जनजागृती साधणारे उपक्रम राबवत असली तरी त्याची माहिती व्यापकपणे लोकांपर्यंत पोहचलेली नाही. पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी पोहचविणाऱ्या ‘प्लास्टिक’ वर प्रतिबंध येत असतानाच, ‘प्लास्टिक ला पर्याय काय?’ असाही प्रश्न अनेक ठिकाणी विचारला जात होता. ‘प्लास्टिकच्या पर्यायाबाबत नागरिकांच्या आणि उत्पादकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन वरळी येथे दि. २२ ते २४ जून दरम्यान केले आहे. मात्र न बंदीच्या आदल्या दिवशी हे प्रदर्शन आयोजित केल्याने लोकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते आहे. मुंबई महापालिकेने प्लास्टिक जमा करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ३७ सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्र सुरु केले आहेत. याबद्दलची माहिती देण्यासाठी १८००-२२२-३५७ हा ‘टोल फ्री’ क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे प्लास्टिकच्या वस्तूंच्या वापरावर कारवाई करण्यासाठी पालिकेने २४८ जणांचा गट नेमला आहे. यातील दुकाने व आस्थापना विभागाचे १०९ कर्मचारी दुकाने व आस्थापनांवर, परवाना विभागाचे ९८ निरीक्षक हे सर्व फेरीवाले व स्टॉलधारक आणि बाजार विभागातील आठ मुख्य निरीक्षक तसेच ३१ निरीक्षक मंडया, दुकानांवर कारवाई करणार आहेत.

 

प्लास्टीकबंदी बाबत आमच्यामार्फत नागरीकांची जनजागृती केली जात आहे. वरळी परिसरातही जनजागृतीसाठी प्रदर्शन सुरु आहे. नागरीकांनी अनेक प्रश्न विचारले आम्ही ते प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न आम्ही केले. आज जनजागृती रॅली काढण्यात आली. प्लास्टीक बंदी साठी नागरीकांना पुरेसा वेळ देण्यात आला होता आता कारवाई होणार आहे. त्यामुळे प्लास्टीकच्या पिशव्या, कटलरी, थर्माकोल याचा वापर करु नका असे नागरीकांना आवाहन आहे. मुंबईकरांनी प्लास्टीकच्या पिशवी बद्दल खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. बाजारात जाताना ते कापडी पिशवी घेऊन जात आहेत. घरातील प्लास्टीक प्लास्टिक संकलन केंद्रात जाऊन जमा करा.

निधी चौधरी, उपायुक्त, मुंबई महापालिका

 

ठाणे मपाच्यावतीने प्लास्टीक संकलनासाठी वाहनांची व्यवस्था
 

ठाणे : महाराष्ट्रातील प्लास्टीक बंदीला शनिवारपासून जोमाने सुरुवात झाली. बंदीचे पडसाद जागोजागी पाहायला मिळत होते. एकीकडे प्लास्टीक बंदीला उत्सुफर्त प्रतिसाद करणारे नागरिक पाहायला मिळत असताना दुसरीकडे गैरसोईने त्रस्त झालेले नागरिक दबक्या आजावात आपली नाराजी व्यक्त करत होते. प्लास्टीक बंदीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका देखील सज्ज झाली आहे. पालिकेचे प्रदुषण नियंत्रण कक्ष, घनकचरा व्यवस्थापन विभाग आदी विभाग प्लास्टीक बंदी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दिसले. ठाणे महानगरपालिकेच्यावतीने प्लास्टीक संकलन वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर एक व्हाट्सअॅप क्रमांकदेखील नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आला होता. जवळपास दोनशेहून अधिक हाऊसिंग सोसायट्यांमधून पहिल्या दिवशी अडीच टन प्लास्टीक संकलित करण्यात आले तर पहिल्याच दिवशी प्लास्टीक वापरणाऱ्यांना दंड करुन ९५ हजारांचा महसूल गोळा करण्यात आला. पहिल्या दिवशी नेमक्या कुठल्या प्लास्टीकला बंदी आहे याबाबत नागरिक संभ्रमात होते. दंड वसुलीची मोहीम सुरु झाल्याबरोबर दुपारनंतर नागरिकांनी त्यांच्याकडे असलेले सर्व प्रकारचे प्लास्टीक पालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या प्लास्टीक संकलन केंद्रात आणून देण्यास सुरुवात केली. बाजारपेठेतील दुकानदारांनी नावं छापलेल्या पिशव्या देखील दुपारनंतर फेकायला सुरुवात केली. त्यामुळे २ टनाहून अधिक प्लास्टीक महापालिकेच्या संकलनात जमा झाले. प्लास्टीक बंदीच्या निर्णयामुळे आज शहरातील सर्वच भंगारवाल्यांची दुकाने हाऊसफुल झालेली दिसत होती. अनेक सोसायट्यांमध्ये नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या सफाई कामगारांकडून त्यांचे घर प्लास्टीकमुक्त करुन घेतले. त्यामुळे हा सगळा प्लास्टीकचा कचरा सफाई कामगारांच्या माध्यमातून भंगारवाल्यांच्या दुकानात पोहचला. प्लास्टीक बंदीमुळे अचानक आलेल्या प्लास्टीक कचऱ्याच्या साठ्याने भंगार उद्योगातील प्लास्टीक कचऱ्याचे दर ५ रुपयांवरुन ३ रुपयांपर्यंत घसरले. एकूणात प्लास्टीकबंदीचा पहिला दिवस अत्यंत यशस्वी ठरला. परंतु अचानक आलेल्या या बंदीचे ‘साईड इफेक्ट’ उद्यापासून पाहायला मिळणार आहेत.

 

प्लास्टीकबंदी शहरात राबवत असताना बंदी असलेले प्लास्टीक नागरिकांना सहजरित्या पुनर्प्रक्रियेसाठी संकलन केंद्रांमध्ये पाठवता यावे म्हणून ठाणे महानगरपालिका सर्वदृष्टीने सज्ज झाली आहे. केवळ संकलन न करता बंद झालेल्या प्लास्टीकवर शास्त्रशुद्ध प्रक्रिया करण्यालाठी महानगरपालिका आग्रही असून त्यादृष्टीने ठाणे महापालिका काम करत आहे. नागरिकांचा प्रतिसाद देखील आमचा उत्साह वाढणावणारा आहे. हा प्रतिसाद पाहता प्लास्टीकमुक्त ठाणे होण्यात नक्कीच गती मिळेल.

मनीषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण अधिकारी

 

प्लास्टिक, थर्माकोलबंदी विरूद्ध भिवंडी महापालिकेची धडक कारवाई सुरू
 

भिवंडी : महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी नागरीकांना आणि व्यावसायिक संस्थांना जाहिर आवाहन करणारे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र प्लास्टिक अधिसूचनेनुसार बंदी करण्यात आलेले घटक म्हणजे सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल व प्लास्टिक पासून बनविण्यात येणाऱ्या आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या ताट, कप, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडी वगैरे हॉटेल्स्मध्ये अन्न पदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिकचे भांडे व वाटी, स्ट्रॉ, नॉन विवर, पॉली प्रॉपलीन बॅग्ज्, द्रव पदार्थ साठविण्यात येणारे प्लास्टिक पाऊच, कप, अन्न पदार्थ, धान्य इत्यादी साठविण्यासाठी पॅकेजिंगसाठी वापरलेले प्लास्टिक व प्लास्टिक वेस्टन सजावटीसाठी प्लास्टिक व थर्माकॉलच्या वापरास बंदी असणार आहे. नमूद घटकांचे पुन:चक्रीकरण /संकलनासाठी प्रभागात प्लास्टिक संकलन केंद्रे सूरू करण्यात आली आहे. दरम्यान, बंदी करण्यात आलेले घटक संकलनाकरीता महापालिकेस सहकार्य करावे असे, आवाहन आयुक्त मनोहर हिरे यांनी केले आहे.

 

प्लास्टिक बंदी बाबत आरोग्य विभागाला धडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. व्यापारी किंवा रहिवाशी यांनी बंदीचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे याची नोंद घ्यावी. भिवंडी शहर स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी त्याचप्रमाणे पर्यावरणाचा समतोल राखण्याकामी व्यापारी, नागरिक, महापालिका प्रशासन आदिंच्या संयुक्त प्रयत्नाने प्लास्टिकच्या समूळ उच्चाटणासाठी आपल्या सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा असल्याची भावना महापौर जावेद दळवी यांनी व्यक्त केली. भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रात दैनंदिन ३५० मेट्रीक टन कचरा निर्माण होत असून त्यात १०% प्लास्टिक कचऱ्याचा समावेश असतो. दरम्यान, प्लास्टिक बंदीमुळे यापुढे निश्चितपणे आळा बसणार आहे, अशी माहिती आरोग्य व स्वच्छता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी दिली. कापड निर्मिती उद्योगामुळे यंत्रमाग कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा निघतो. कापड निर्मितीसाठी लागणारे यार्न प्लास्किमध्ये गुंडाळलेले असतात. यार्नचे काम झाले की प्लास्टिक कचरा फेकला जातो. नाले, गटारात पडून पाण्याचा निचरा व्यवस्थीत होत नाही शिवाय सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो असेही त्या म्हणाल्या. प्रभाग समिती क्रमांक १ चे प्रभाग अधिकारी बाळाराम जाधव यांनी आपल्या सहकारी पथकासह कचेरीपाडा, गैबीनगर, नागावरोड, शांतीनगर रोड, खंडूपाडा आदी भागांमध्ये गस्तीदरम्यान छोटे व्यापाऱ्यांकडे प्लास्टिक पिशव्या सापडल्या. एकूण ५ व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी ५०० प्रमाणे २५०० रूपये दंडाची रक्कम आणि प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.

 

भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रातील लहान मोठे व्यापारी आणि रहिवाशांनी प्लास्टिक बंदी यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करावे. देशात स्वच्छतेच्या बाबत चौथ्या क्रमांकाचा नावलौक महापालिकेला मिळाला त्याचे सर्वत्र कौतुक सुद्धा झाले. चौथ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

जावेद दळवी, महापौर

 

प्लास्टीक बंदीसाठी पनवेल मनपा नव्या जोमाने कामाला
 

पनवेल : प्लास्टिक बंदीबाबत पनवेल महानगर पालिका पूर्वीपासूनच चर्चेत होती. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालणारी राज्यातील पहिली महानगरपालिका होण्याचा मान पनवेल महानगरपालिकेने मिळविला होता. २ ऑक्टोबर २०१७ रोजी पालिकेने किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीवर आणि वापरावर संपूर्ण बंदी घातली होती. प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्या दुकानदार, फेरीवाल्यांवर वचक ठेवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने यापूर्वीही विशेष मोहीम राबवत अनेक ठिकाणी कारवाई करत तीन टनांपेक्षा जास्त प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या होत्या. तसेच लाखो रुपयांचा दंड वसूल केला होता. त्यामुळे राज्यसरकारने राज्याबाहेर घातलेल्या प्लास्टिक बंदीला पनवेल महानगरपालिका पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. यावेळी ‘दै. मुंबई तरुण भारत’ने पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. पनवेल महानगरपालिकेने यापूर्वीच पालिका परिक्षेत्रात सरसकट प्लास्टिक बंदी लागू केली आहे. राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास पालिका पुन्हा नव्या जोमाने तयार झाल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

 

यापूर्वी आम्ही प्लास्टिक बंदीसाठी विविध योजना राबवल्या होत्या. पालिकेने यापूर्वी नागरिकांना कापडी बॅगा वाटून जनजागृती केली होती. यापुढेही नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. प्लास्टिक वापरताना कोणी आढळल्यास त्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे त्यामुळे नागरिकांनी संपूर्णपणे प्लास्टिक बंदी करण्यास सहकार्य करावे.

डॉ. कविता चौतमोल, महापौर, पनवेल मनपा

 

प्लास्टिक बंदीसाठी नवी मुंबईकडून व्हॉट्सअॅप क्रमांक
 

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेने प्लास्टीक बंदीसंदर्भात सूचना जाहीर केली असून कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ८ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. प्लास्टिक बंदीचे उल्लंघन केल्यास या समित्या कायदेशीर कारवाई करतील. तसेच प्लास्टिक बंदीविषयी जनजागृतीचेही कार्य या समित्या करणार आहेत. प्लास्टिक बंदीसाठी पालिकेकडून प्लास्टिक संकलन केंद्रही उभारण्यात आले आहेत. जेणेकरून प्रत्येक नागरिकाने आपल्याकडीक प्लास्टिक या केंद्रात जमा करता येतील. या संकलन केंद्रांची संख्या ९ असून टोल फ्री क्रमांकाची सुविधाही पालिकेकडून देण्यात आली आहे. तसेच व्हॉट्सऍप क्रमांक देऊन लोकांना संपर्क करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. विशिष्ट रहिवासी संस्थेने प्लास्टिक गोळा केले असेल तर ते घेऊन जाण्यासाठीही पालिका सहकार्य करण्यास तयार आहे. दरम्यान, प्लास्टीक बंदीसाठी मुदतवाढ होती तो पर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या प्लास्टिक बंदी धोरणात लवचिकता होती. मात्र, आता राज्यशासनाचा निर्णय झाल्यामुळे त्याची आम्ही कडक अंमलबजावणी करणार आहोत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना प्लास्टीक न वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, कठोर अंमलबजावणीसाठी आम्ही पथके स्थापन केली आहेत. आणि प्लास्टिकदेखील जप्त केली असल्याची प्रतिक्रिया नवी मुंबई मनपाचे महापौर जयवंत सुतार यांनी दिली.

 

भविष्यात अधिक पथके तयार करून धोरणाची अंमलबजावणी महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच, नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जाहीरात, पथनाट्य, आणि विविध साधनांचा उपयोग करुन आवाहन करण्यावर आमचा भर असणार आहे. कागदी पिशव्या निर्मितीसाठी आम्ही महिला बचतगटांना प्रोत्साहन देणार आहेात.

जयवंत सुतार, महापौर, नवी मुंबई महानगर पालिका

 

प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी पालिकेची पथके तैनात

 

नाशिक : प्लास्टिक बंदी जाहीर झाल्यानंतर नाशिक मनपाने कारवाई सुरु केली होतीच. यापूर्वीदेखील बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल नाशिक मनपाने कारवाई केली होतीच. सध्या याबाबत सहा विभागात सहा पथके कार्यरत केली असून प्रत्येक पथकात पाच कर्मचारी असतात, अशी माहिती नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी ‘दै. मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली. विशेषतः नाशिकमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली कायद्याची काटेकोर अमलबजावणी केली जात आहे. प्लास्टिकबंदीनंतर नाशिकमध्ये पहिली कारवाई करण्यात आली होती. तेव्हा संबंधित व्यावसायिकाला ५ हजारांचा दंड महापालिकेने ठोठावला होता.

 

नाशिकरोड परिसरातील व्यावसायिक देवानंद गंगणानी यांच्या दुकानात प्लास्टिक कॅरीबॅग ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या आढळून आल्यामुळे कारवाई केली असल्याचे कारण महापालिकेने दिले होते. प्लास्टीक बंदीबाबतची अधिकृत घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली असून २३ जूनपासून त्याबाबत अधिक काटेकोर राहण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे महापालिकेने प्लास्टिक बंदी प्रकरणी कारवाईचा धडाका सुरु केला आहे. २३ रोजी मनपाला सुटी असली पथकाद्वारे कारवाई सुरु राहणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी सांगितले. याबाबत छोट्या मोठ्या दंडात्मक कारवाया सुरु असल्या तरी एका ठिकाणी २५ हजार इतका दंड वसूल केला होता, अशी माहिती देखील बोर्डे यांनी दिली. प्लास्टीकच्या वाढत्या वापरावर चिंता व्यक्त करत उच्च न्यायालयाने प्लास्टीकबंदीच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला होता. तर, राज्य सरकारने ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत प्लास्टिकबंदी कायद्यानुसार कुणावरही कठोर कारवाई करु नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

 

२३ जून पासून पुन्हा कारवाई करण्यास सुरुवात होणार आहे. नागरिकांनी आपल्या जवळील बंद करण्यात आलेले प्लास्टिक किंवा प्लास्टीकच्या बाटल्या स्थानिक प्रशासनाकडे जमा करण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या होत्या. त्याबाबत कारवाई केली जात आहे.

किशोर बोर्डे, अतिरिक्त आयुक्त, नाशिक मनपा

 

शासन निर्णयाची कल्याण डोंबिवलीतही अमलबजावणी

 

डोंबिवली : राज्यात सर्वत्र प्लास्टिक बंदी लागू केली असून त्याची अमलबजावणी कल्याण डोंबिवलीतही जोमाने सुरु झाली आहे. शनिवारी दिवसभरात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्यावतीने ८ ते १० किलो प्लास्टिक जप्त केले असून संबंधितांना ४० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सरकारने जरी आता प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असला तरी कल्याण-डोंबिवली मनपाने १५ जुलै २०१७ पासून प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला होता. मात्र त्याची अमलबजावणी योग्य प्रकारे न झाल्याने प्लास्टिकचा भरणा दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यामध्ये दिसत होता. गेल्या वर्षी पालिकने जाहीर केलेल्या प्लास्टिक बंदीची चर्चा झाली, पण याविरोधात कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. दरम्यान, प्लास्टीक बंदीच्या निर्णयानंतर पालिकेने प्लास्टिक गोळा करण्यासठी संकलन केंद्र सुरू केली असून कल्याणमधील आधारवाडी अग्निशमण दलाशेजारी, सुभाष मैदान, बेतूरकर पाड्यावरील सुभाष मैदान, कल्याण पश्चिमेत ओक हायस्कूलजवळ, पारनाका, डोंबिवली पूर्वेत समतोल इकोवर्कर्स, गांधी रोड येथे हळबे व्यायाम शाळा, डोंबिवली पश्चिम येथे जल उदंचन केंद्र कोपर, तर सोनारपाड्यात मातोश्री ट्रस्ट येथे ही संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत.
 

प्लास्टिक बंदी मोहिमे अंतर्गत आज महापालिके मार्फत वसूल केलेल्या दंडाची रक्कम खालील प्रमाणे

क प्रभाग - १०००० I ब प्रभाग - ५००० I फ प्रभाग - १५००० I ड प्रभाग - ५००० I आय प्रभाग - ५००० I ग प्रभाग - ५००० I जे प्रभाग - ५०००

एकूण वसूल रक्कम रु.५००००

 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत प्लास्टीक बंदीविरोधात जोरदार कारवाई सुरू असून व्यापाऱ्यांनवर करावाई करत १० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. याद्वारे सुमारे ४० हजार दंड वसूल केला आहे.

धनाजी तोरस्कर, उपायुक्त, घन कचपा व्यवस्थापन

Powered By Sangraha 9.0