‘शी जिनपिंग थॉट्स’

    दिनांक  22-Jun-2018    

जिनपिंग खरंतर माओच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करीत आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण, राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकालावरील मऱ्यादा उठवून जिनपिंग हे एकप्रकारे चीनचे आजीवन राष्ट्राध्यक्षच म्हणूनच आपली पुढील राजकीय वाटचाल करतील, हे निश्चित.

 

माध्यमजगताच्या अभ्यासात नेहमीच ‘हायपरडर्मिक नीडल थिअरी’चे उदाहरण दिले जाते. एका वाक्यात या सिद्धांताविषयी सांगायचे झाल्यास, माध्यमांमधील शब्द अन् शब्द वाचकांच्या, दर्शकांच्या जसे इंजेक्शन टोचते, त्याप्रमाणे मनात खोलवर रुजतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या स्वभावातून, वर्तणुकीतून स्पष्टपणे जाणवतो. साधारण १९३०-४० च्या काळातील हा सिद्धांत हॉलीवूडपटांचा अमेरिकेतील प्रेक्षकांवर होणाऱ्या परिणामांसंदर्भात खरं तर वापरला गेला. तो काळ मुद्रित माध्यमांच्याही विकसनाचा असल्यामुळे या सिद्धांताला सुरुवातीला तज्ज्ञांनीही दुजोरा दिला पण, औद्योगिक क्रांती आणि नंतर माध्यम क्षेत्रात झालेल्या आमूलाग्र बदलाने या सिद्धांताला छेद दिला पण, तरीही हाच सिद्धांत काही अंशी माहिती, तत्त्वज्ञानाच्या प्रचार-प्रसारालाही लागू पडतोच. एखादी बाब दुसऱ्याच्या मनात ठासून उतरवायची असेल तर त्या गोष्टीची रीतसर ‘इंजेक्शन्स’ सुरुवातीपासूनच द्यावी लागतात. चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांनीही त्यांचे, त्यांच्या पक्षाचे आणि एकूणच चीनच्या उद्धारासाठीचे सर्वस्पर्शी विचार ‘शी जिनपिंग थॉट्स’ या नावाने विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा सपाटाच लावला. हे कमी की काय म्हणून, जिनपिंग यांचे नाव, त्यांचे विचार यांना थेट चीनच्या संविधानातही अंकीत करणारा क्रांतिकारी बदलही चिनी सरकारने लगोलग करून घेतला. चीनचे राष्ट्रपिता माओ झेडाँग यांच्यानंतर हयात असताना चीनच्या संविधानात आपल्या नाव आणि विचारांचे प्रतिबिंब पाडणारे जिनपिंग दुसरे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. १९७७ साली डेंग झिओपिंग यांचेही नाव मरणोत्तर संविधानात उल्लेखित करण्यात आले होते आणि त्यानंतर आता शी जिनपिंग.

 

जिनपिंग खरंतर माओच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करीत आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण, राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकालावरील मऱ्यादा उठवून जिनपिंग हे एकप्रकारे चीनचे आजीवन राष्ट्राध्यक्षच म्हणूनच आपली पुढील राजकीय वाटचाल करतील, हे निश्चित. सत्ताशक्तीचे शस्त्र आणि त्याला विचारसरणीची धार देऊन जिनपिंग यांनी आगामी काळात चीनची महाशक्तीकडे वाटचाल सुरू करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे केवळ प्रशासकीय पातळीवर हे राष्ट्रोत्थानाचे, नवनिर्मितीचे ध्येय मऱ्यादित न ठेवता, जिनपिंग यांनी शास्त्रोक्तपणे त्याचा प्रचार-प्रसार अगदी शालेय पातळीपासून सुरू केला आहे. जेणेकरून आगामी पिढी ही त्याच साच्यात घडेल आणि कम्युनिस्ट सरकारच्या ध्येय-धोरणांची सरसकट कुठलाही विरोध न करता मुकाट्याने अंमलबजावणी केली जाईल.

 

याचाच परिपाक म्हणून शी जिनपिंग यांचे जीवनाच्या सर्वच क्षेत्रातील विचार चीनच्या रस्तोरस्ती ठळक लाल होर्डिंग्जवर आवर्जून झळकताना दिसतात. इतकेच काय, जिनपिंग यांच्या विचारांना संग्रहालयाच्या माध्यमातूनही केवळ चिनी नागरिकांपर्यंतच नाही, पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचाही हेतू साध्य केला जाईल. त्यांचे विचार रीतसर साहित्यातून, इंटरनेटवरून चिनी जनतेपर्यंत पोहोचतील, याचीही अगदी विशेष काळजी घेतली जाते. जिनपिंग यांचे विचार हे रीतसर शालेय, महाविद्यालयीन अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्याची लाल किमयाही या कम्युनिस्ट सरकारने लीलया साधली आहे. त्यामुळे आपल्या हयातीतच जिनपिंग कम्युनिस्ट पक्षाच्या विचारमूल्यांचा कैवार घेऊन जग जिंकण्याच्या शर्यतीत पूर्ण दमानिशी उतरलेले दिसतात. त्यामुळे जिनपिंग यांच्या चिनी महाशक्तीच्या महत्त्वाकांक्षा अजिबात लपून राहिलेल्या नाहीत. त्यासाठी साम-दाम-दंड-भेदाचे सर्व मार्ग जिनपिंग यांनी खुले ठेवले आहेत. चिनी गतवैभवाच्या पुनर्प्राप्तीसाठी आणि चीनचा जागतिक दबदबा निर्माण करण्यासाठी जिनपिंग अमेरिकेलाही शिंगावर घ्यायला तयार आहेत. जिनपिंग यांनी चीनच्या तरुणांना उद्देशून दिलेला एक संदेश त्यांच्या मनातील विचारांची वाट स्पष्ट करणारा आहे. ते म्हणतात, “शर्टाची बटणं लावताना सुरुवातीलाच जास्त काळजी घ्यावी लागते. कारण, सुरुवातीलाच बटणांचा क्रम चुकला की, पुढचे सगळेच गणित कोलमडते.”