पाकिस्तानसह भारतीय उपखंडात योग दिन उत्साहात साजरा

    दिनांक  21-Jun-2018

 
आज चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जग योग करताना दिसले. त्यात पाकिस्तानसारखा देश देखील मागे राहिलेला नाही. तेथे 'योग दिन' रमझाननंतर त्वरित साजरा केला जाणारा सर्वात मोठा कार्यक्रम ठरला आहे. दरम्यान भारतीय दूतावासातर्फे इस्लामाबादमध्ये योग दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात अनेकांनी सहभाग घेतला आहे.
 
 
आरोग्य चांगले राहावे म्हणून योग दिवस साजरा करण्यासाठी भारतीय राजदूत यांनी पाकिस्तानी नागरिक, अधिकारी या सर्वांना आमंत्रण दिले होते. त्यात १०० विशेष अतिथींनी आपला सहभाग नोंदवला आहे. कॅप्टन जे. पी. कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडल्याचे वृत्त भारतीय दूतवासातर्फे देण्यात आले आहे. पाकिस्तानात इस्लामाबाद सोबतच लाहोर, कराचीमध्ये देखील योग दिनाचे कार्यक्रम पार पडले आहेत.
 
 
पाकिस्तानसह भारतीय उपखंडातील इतर देशांत देखील योग दिनाचा कार्यक्रम पार पडला आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथील बंगाबंधू राष्ट्रीय मैदानात सुमारे १० हजार नागरिकांच्या उपस्थितीत योग दिन साजरा केला गेला.
 
 
अफगाणीस्तान येथील काबुलमध्ये देखील योग दिवस उत्साहात पार पडल्याचे वृत्त आले आहे. सुमारे ३०० नागरिक आणि अधिकाऱ्यांनी यात आपला सहभाग नोंदवला आहे. याचबरोबर नेपाळमध्ये जनकापूर येथे तेथील राज्यपाल रत्नेश्वरलाल कायस्थ आणि तेथील मुख्यमंत्री लालाबाबू राऊत यांच्या उपस्थितीत योग दिनाचा कार्यक्रम पार पडला आहे. याचबरोबर भूतानमध्ये देखील उत्साहात योग दिन साजरा झाला आहे. थीम्पू शहराच्या नेहरू-वांगचुक सांस्कृतिक केंद्र येथे हा कार्यक्रम पार पडला आहे.