पालघर जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट गडद

    दिनांक  21-Jun-2018
खानिवडे : मृगात वरुणराजाने अवकृपा केल्याने त्यानंतर दमदार हजेरी लावणाऱ्या पावसात शेतकऱ्यांनी भात पेरण्या केल्या आहेत. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाची एकही सर न कोसळल्याने पाण्याअभावी बळीराजापुढे दुबार पेरणीचे संकट समोर उभे ठाकले आहे. कारण कडक उन्हं पडत असल्याने तयार झालेले भाताचे रोप करपण्याची शक्यता या भागात दिसून येत आहे. त्यामुळे पाऊस केव्हा सुरू होईल यासाठी पेरणी केलेल्या बळीराजाने आकाशी डोळे लावले आहेत.

 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार दि. ९ ते ११ जून या दरम्यान मुसळधार पावसाची वर्तवलेली शक्यता धूसर होऊन दि.१५ व १६ जूनला पालघर जिल्ह्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुढेही वेळेवर चांगला पाऊस बरसेल, या आशेवर पेरणीसाठी लागणारे ट्रॅक्टर, बी-बियाणे, बीजकरणासाठी लागणारी औषधे, पावडर संकरित बियाणे यांची जुळवाजुळव करून घेत पेरणी केली. चालू वर्षी बी-बियाणे, खते, औषधे, औजारे यांच्या वाढलेल्या किमतीसह शेत नांगरणीसाठी लागणारे ट्रॅक्टर यांचे भाडेदर मागच्या वर्षाच्या तुलनेत ५ ते १० टक्के जास्त असतानाही वरुण राजाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण गेले ४ ते ५ दिवस एकही सर न कोसळविणारा वरूण राजा रुसल्याने व येत्या दोन दिवसांत पावसाची हीच स्थिती राहिल्यास शेतात नुकतेच उभारणी घेत असलेले भात रोप करपण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आकाशाकडे बघण्याची वेळ खरिपाच्या सुरुवातीलाच आली आहे.