नव्या पनामा पेपर्समध्ये भारतीयांची नावे

21 Jun 2018 21:50:55



अंडरवर्ल्ड डॉनची पत्नी ते उद्योगपतींचा समावेश

नवी दिल्‍ली : पनामा पेपर्सने आता पुन्हा समोर आणलेल्या दस्तऐवजांमध्ये विदेशात काळा पैसा ठेवणार्‍या भारतीय ‘धनकुबेरा’ची नावे उघड केली आहेत. दोन वर्षांपूर्वी पनामा येथील कायदेविषयक सेवा देणारी कंपनी मोरसाक फॉन्सेकाने, काळा पैसा सुरक्षित ठेवणार्‍या देशांमध्ये भारतासह जगभरातील उद्योगपतींनी आपला काळा पैसा लपविल्याची माहिती उघडकीस आणल्यावर जगभरात खळबळ माजली होती.

नव्या नावांचा शोध घेण्यासाठी इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टने १२ लाखांपेक्षा जास्त नव्या दस्तावेजांची तपासणी केली. यामध्ये किमान १२ हजार दस्तावेज भारतीयांशी संबंधित आहेत, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. दोन वर्षांपूर्वी मोरसाक फॉन्सेकाच्या दस्तऐवजांमध्ये ५०० भारतीयांची नावे होती. पनामा पेपर्समध्ये नाव असलेल्या ४२६ भारतीयांच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने मल्टी एजन्सी ग्रुप स्थापन केला. या चौकशीदरम्यान सुमारे नऊ हजार कोटींच्या काळ्या धनाचा शोध लागला आहे, असे वृत्तही या वृत्तसंस्थेने दिले आहे. पनामा पेपर्सने यापूर्वी काळा पैसा सुरक्षित ठेवणार्‍या देशांमध्ये काही भारतीयांनी गुंतवणूक केल्याचा आरोप यादीत नावे असलेल्या भारतीयांनी फेटाळला होता. मात्र, आता नव्याने जाहीर केलेल्या यादीमुळे या आरोपाला बळ मिळत आहे. नव्या दस्तावेजांनुसार ब्रिटनमधील कंपनी मार्डी ग्रेस होल्डिंगचे मालक लोकेश शर्मा यांनी पनामा पेपर्स लीक झाल्यावर कंपनीमधील हिस्सा ३० पटीने वाढविला आहे.

भारतातील दिग्गज : पीव्हीआऱ सिनेमाचे मालक अजय बिजली, एअरटेलचे सुनील मित्तल यांचे पुत्र कवीन मित्तल, एशियन पेंट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्‍विन दाणी यांचे पुत्र जलज दाणी, सन ग्रुपचे प्रमुख नंदलाल खेमका यांचे पुत्र शिव विक्रम खेमका.

Powered By Sangraha 9.0