प्रिय 90's... एक खास पत्र.. #Worldmusicday

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018   
Total Views |

 
 
प्रिय 90's, 
खरं तर आपलं नातंच सगळ्यात जुनं आहे. कारण तुझ्याच काळात माझा जन्म झाला. आणि तुझीच गाणी ऐकत आम्ही मोठे झालो. नुकताच टी.व्ही आला होता, सगळ्या घरांमध्ये नसायचा, पण आमच्याकडे होता. त्यामुळे अनेकदा तुझी गाणी ऐकली आहेत. आणि आता जेव्हा ती गाणी 'जुनी गाणी' झाली ना तेव्हा जाम आठवण येते त्यांची बघ.
 
सोनू निगम, शान, उदित नारायण, कुमार सानू, जतिन-ललित शंकर महादेवन हे सगळे आजही वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून दिसतात, मात्र त्यावेळची गाणी गाणारे ते सर्व गायक अजून डोळ्यासमोर तसेच येतात. ए.आर. रेहमान, एस.पी. बालासुब्रमण्यम असू देत किंवा अभिजीत भट्टाचार्य, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल, अलका याग्निक, उषा उथ्थप, विनोद राठौर, साधना सरगम, बाबुल सुप्रियो, हरिहरन बापरे... कित्ती नावं आठवली बघ तुझी आठवण काढताच...
 
 
 
माझं आयुष्य गाण्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आणि त्यातून माझ्या मोबाईल मध्ये, लॅपटॉपमध्ये असलेली गाण्यांची प्लेलिस्ट केवळ तुझ्या गाण्यांनी भरली आहे. बॉम्बे चित्रपटातील "हम्मा हम्मा" गाण्यावर मी आजही फिदा आहे, आणि "कहना ही क्या, तूही रे.." त्याच काळात आलेल्या रोजा चित्रपटातील "छोटी सी आशा, रोजा जानेमन आई गं".. ए आर. रहमान आणि हरिहरन ही जोडी काय भन्नाट होती नाही..
 
 
 
 
 
त्यावेळी आलेल्या "माचिस" चित्रपटातील "चप्पा चप्पा चरखा चले" हे गाणं आजंही कुठेही लागलं ही मी हातची कामं सोडून ते बघायला बसते. "हम आपके हैं कौन, मैंने प्यार किया, जो जीता वही सिकंदर, ताल" किती नावं घेऊ मी? नावं कमी पडतील. पण त्या काळात असलेले कलाकार आणि अजरामर झालेल्या कलाकृती परत कधीच येऊ शकणार नाहीत.
शाहरुख- काजोल, सलमान- माधुरी, अनिल कपूर - माधुरी अशा जोड्या नक्कीच हिट झाल्या मात्र त्या हिट होण्यामागे तुझा हातभार मोठा होता. तुझ्याकाळात आलेल्या संगीतामुळेच "दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, वन टू का फोर" या चित्रपटांमधील संगीत खूप प्रसिद्ध झालं.
 
 
 
 
"हम दिल दे चुके सनम" मधील "अलबेला साजन आयो रे".. आजही शास्त्रीय संगीत प्रेमींचं आवडतं आहे. तर "रंगीला " चित्रपटातील "रंगीला रे, हाय रामा ये क्या हुआ" आजही आमच्या सारख्या 90's kids च्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणतात. प्रेमात पडल्यावर आजही आधी "सरफरोश" मधील 'होश वालों को खबर क्या' याच ओळी ओठांवर येतात. "दिल से "मधील 'जिया जले जाँ जले..' तील तेलगु भाषेतील शब्द म्हणण्याच्या आम्ही आजही प्रयत्नात आहोत. आणि सतत चुकीचं म्हणून सुद्धा आम्हाला ते गाणं प्रचंड आवडतं.
 
 
 
आजही आमचा स्वातंत्र्य दिन किंवा गणतंत्र दिन "बॉर्डर" चित्रपटातील 'संदेसे आते हैं' गाण्याशिवाय साजरा होतच नाही माहितीये. परवाच दादाचा जुना वॉकमन सापडला. त्यामध्ये तुझ्याच गाण्यांची कॅसेटही सापडली, खास तयार केली होती, आवडत्या गाण्यांची. काय खजिना हाती लागला माझ्या. कित्ती खुश झाले मी.
 
 
 
बकेट लिस्ट बघितला नुकताच त्यातली माधुरी बघितली आणि का माहित नाही 'धक धक' करणाऱ्या माधुरीची आठवण आली, तिला कित्ती मिस करतो आम्ही. कारण... तुझ्यामुळे तिला अशी गाणी मिळाली ज्यांच्यामुळे ती प्रसिद्ध झाली. सोनू निगमच्या गाण्यांवर माझं विशेष प्रेम आहे. त्याचं दिल से रे लागलं ना.. की आजही माझ्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य येतं.
 
कसा रे तू.. आलास आणि गेलास.. आम्ही मोठं होई पर्यंत निघूनही गेलास. आता तुझ्या आठवणीच उरल्या आहेत. कित्येक लोकांच्या पहिल्या प्रेमाचा तू साक्षी आहेस, तुझ्याच गाण्यांनी तर त्यांचं प्रेम फुललं, कित्येक लोकांची मैत्री तुझ्यामुळे झाली कॅसेट्स ची देवाण घेवाण करत.. तुझं स्थान आमच्या आयुष्यात खूप खूप खास आहे, आणि नेहमीच राहील.
 
आजही,खूप आनंदी असू देत, थकलेले असू देत, मनस्ताप झालेला असू देत, राग आलेला असू देत, किंवा रडायला येऊ देत, मदतीला तुझीच गाणी असतात रे..
 
आज जागतिक संगीत दिवस म्हणजेच World music day आहे. आजच्या दिवशी मनापासून तुझे आभार मानायचे आहेत. तुझ्या संगीतामुळे आमचं आयुष्य खरंच खूप सोपं आणि सुंदर झालं आहे.. आमच्या सोबत असाच रहा... सदैव..
तुझीच...
90's Girl.. :)
 
 
 
- निहारिका पोळ 
@@AUTHORINFO_V1@@