महड विषबाधा प्रकरण

20 Jun 2018 22:52:59




तिसऱ्या दिवशी २४ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू, १९ गंभीर


खोपोली : सोमवारी अष्टविनायक क्षेत्र महड येथील वास्तूशांतीच्या जेवणावळीतून झालेल्या अन्नविषबाधेमुळे तीन चिमुकल्यांना आपला प्राण गमवावे लागले व तब्बल ८८ जणांना विषबाधा झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. मंगळवारी प्रभारी जिल्हाधिकारी अभय यावलकर सोबत विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी तसेच विविध रुग्णालयांत जाऊन विचारपूस केली. बुधवारी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार विविध रुग्णालयात २४ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी १९ रुग्ण अतिदक्षता विभागांत व्हेंटिलेटरवर असून त्यापैकी ३ रुग्णांची स्थिती अतिगंभीर आहे.

 

महडच्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या तीन मुलांपैकी एकावर मंगळवारी संध्याकाळी तर भाऊ-बहीण असलेल्या दोघांवर बुधवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आ. प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत पनवेल येथील विविध रुग्णालयांत जाऊन सुरू असलेल्या उपचार व्यवस्थेची पाहणी केली. या घटनेबाबत खालापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून स्थानिक पोलीस सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास करीत असल्याचे सांगताना अन्न व औषधी विभाग व फॉरेन्सिक लॅबचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्याशिवाय कोणतेही अंतिम कारण स्पष्ट होणार नाही. त्यामुळे पुढील दोन तीन दिवस निश्चित माहिती मिळण्यासाठी लागतील, असे अधिकारी वर्ग सांगत आहे. पनवेल येथे उपचार घेत असलेले ३ रुग्ण अतिदक्षता विभागात असून तिघांची स्थिती अतिचिंताजनक असल्याचे समजते.

Powered By Sangraha 9.0