
पालघर : पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील वाळवंडापैकी खडकी पाड्यातील कल्पेश जाधवने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या खडकी पाड्यात रस्त्याची सोय नसून, एसटी बसही जात नाही. या पाड्यात जाण्यासाठी ओहळातून कच्चा रस्ता पायवाट आहे. आदिवासी पाड्यात राहून, शेती करणारे कल्पेशचे आई-वडील निरक्षर असून, केवळ डोंगर उतारावरील जेमतेम दीड एकर शेती अशी काहीशी त्यांची बिकट परिस्थिती आहे. अशा परिस्थितून शिक्षणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कल्पेश जाधवने पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवा परीक्षेत यश संपादन केले आहे. इतकेच नाही, तर यंदा राज्यसेवा परीक्षेत कल्पेश जाधव हा उत्तीर्ण उमेदवारांमधील तो सर्वात कमी वयाचा उमेदवार ठरला. आता तो राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागात उपसंचालक म्हणून रुजू होणार आहे. म्हणून त्याच्या या यशामुळे आईवडिलांना तर आनंद झालाच, मात्र गावकर्यांनादेखील मोठा आनंद झाला आहे.
जव्हार तालुक्यातील वाळवंडापैकी खडकी पाड्यातील कल्पेश जाधवची घरची परिस्थिती तशी अगदी बेताचीच आहे. आईवडिल दोघेही निरक्षर असून, मोलमजुरी करून, आपला संसार चालवतात. त्यांचा दुसरा मुलगा म्हणजेच कल्पेशचा मोठा भाऊ हवालदार असून सेवेमध्ये त्याला जेमतेम तीन वर्षे झाली आहेत. कल्पेश जाधवचे शिक्षण वाळवंडापैकी खडकी पाडा येथे इयत्ता चौथीपर्यंत जि.प. शाळेत झाले. प्राथमिक शिक्षण वाळवंडा येथे झाले. आणि माध्यमिक शिक्षण कावळे आदिवासी आश्रम शाळेत असून, १२ वीपर्यंतचे शिक्षण बोर्डीच्या कनिष्ठ महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून घेतलेे. पुढील पदवीचे शिक्षण घेण्यासाठी कल्याण येथील आदिवासी वसतिगृहात राहून, कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयातून गणित विषय घेऊन पदवी घेतली आहे. पदवीच्या दुसर्या वर्षाला शिक्षण असताना एमपीएससी स्पर्धा परीक्षांची कास धरली आणि त्यांने कोणत्याही शिकवणीशिवाय केवळ युट्यूबवरचे व्हिडिओ पाहून, पूर्वपरीक्षेची तयारी केली. तसेच वृत्तपत्र वाचून स्पर्धा परीक्षा देऊन, पहिल्याच वर्षात यश मिळविले आहे. वयाच्या केवळ २१ व्या वर्षी त्याने हे यश मिळवले आहे.
कल्पेशच्या आई वडिलांच्या म्हणण्यानुसार कल्पेश जेव्हा घरी यायचा तेव्हा म्हणायचा की, ”मी जेव्हा साहेब होईन तेव्हाच बूट घालेन” म्हणायचा, तसेच त्याच्या घरची परिस्थिती अगदी बेताचीच साधे विट मातीचे घर, गावात रस्ता नाही, त्याच्या राहत्या घरी व्यवस्थित विजेची सोय नाही, घरच्या गरिबीमुळे कल्पेशला कोणतीही शिकवणी लावणे किंवा कोणाचे मार्गदर्शन घेणे त्याला शक्य नव्हते. मात्र कल्पेश म्हणायचा की, आई मी साहेबच होणार हे आमच्या मुलाने करून दाखविले. तो साहेब झाला असे आम्हाला मोठ्या मुलांने दुसर्यांकडे फोन लावून कळविले. कल्पेश जाधवच्या यशामुळे आता तो राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागात उपसंचालक म्हणून रुजू होणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
आदिवासी पाड्यातील कल्पेश जाधवने पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवा परीक्षेत यश संपादन करून, यंदा राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमध्ये तो सर्वात कमी वयाचा उमेदवार ठरला आहे. ”एमपीएससी म्हणजे काय हे आईवडिलांना माहितच नाही. परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे सकाळी सांगितल्यावरही त्यांना काही कळले नाही. अखेर सोप्या शब्दांत त्यांना ‘मी साहेब झालो’ एवढेच सांगितल्यावर ते आनंदित झाले. त्यानंतर ते मजुरीच्या कामाला निघूनही गेले”, असे कल्पेशने सांगितले. तेव्हा ते गावभर सांगत होते की, ”आमचा मुलगा साहेब झाला, म्हणून मात्र या अशिक्षित आईवडिलांना आजही माहिती नाही की आमचा मुलगा काय अधिकारी हे अजूनही त्यांना समजले नाही. मात्र आमचा मुलगा साहेब झाला हे नक्की.”