माणुसकीचे झरे

02 Jun 2018 12:23:25
 

 
 
गर्दीतून बाहेर पडून लांब कुठेतरी भटकायला जावं. तिथे अचानक कुठेतरी माणसं भेटावीत. अगदी अनपेक्षित रित्या. माणसंच ती, खरीखुरी, माणसासारखं वागणारी. माणुसकी वरची श्रद्धा अजूनच वाढवणारी.
 
उबुंतु मधली प्रार्थना किती सोपी आहे ना. "हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे." किती छोटी अन साधी अपेक्षा आहे माणसाकडून. खरं तर अनेक माणसं ही अपेक्षा पूर्ण करत असतात, तेही गाजावाजा न करता. आपल्याला दृष्टी हवी पाहण्याची. नुकतेच मनाली च्या ट्रिप वरून परत आलोय. ट्रीप मध्ये अनुभवलेल्या दोन घटना काही मनातून जाणार नाहीयेत.
 
मनालीत पाहण्यासारखी जी काही स्थळे आहेत त्यातील एक वसिष्ठ मंदिर. महर्षी वसिष्ठांनी येथे तपश्चर्या केली होती असे सांगतात. लाकडी बांधकाम असलेले हे मंदिर हिमालय पर्वतात अतिशय निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे. येथे पर्वतातून येणाऱ्या गंधकयुक्त गरम पाण्याचे कुंड आहे. तेथे आंघोळी आटोपून आम्ही मंदिराबाहेर उभे असतानाच एकदम आरडाओरडा झाला. कुणा पर्यटक महिलेची पर्स चोरीला गेली होती. आम्ही आमच्याकडे असलेल्या बॅगा सांभाळून एका बाजूला उभे राहिलो. काही वेळाने आमच्या गाडीच्या पार्किंगकडे निघालो. कार ने थोडे अंतर कापले तोच लक्षात आले, कॅमेरा दिसत नाहीये. गाडीत शोधले पण कॅमेरा कुठेही नव्हता. चर्चा सुरू झाली, कोणीतरी कॅमेरा लांबवला. उद्विग्न अवस्थेत गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवण्याची सूचना केली. सर्वांनी मिळून सगळा घटनाक्रम पुन्हा आठवला. चप्पल स्टँड वरून चपला घेईपर्यंत कॅमेरा आमच्याकडे होता असा निष्कर्ष निघाला. म्हणजे चप्पल स्टँड जवळच्या गर्दीतूनच कुणीतरी तो लांबवला असण्याची शक्यता होती. निराशेतच वाहनापासून अर्ध्या किमीचा चढ चढून पुन्हा मंदिराकडे निघालो. कॅमेरा मिळेल का? शक्यता कमीच. आत्तापर्यंत काढलेले सगळे फोटो जाणार. कॅमेरा चोरीला गेला हीच घटना या ट्रीप मध्ये लक्षात राहणार बहुदा. विचार करतच मंदीर गाठले. बाहेर कुणी संशयास्पद व्यक्ती दिसते का हे बघायला नजर फिरवली. पण कुणीच दिसले नाही. कशाला थांबेल तो? लगेच पसार झाला असणार. पुन्हा मनात चिडचिड. विचार करतच आत चप्पल स्टँड कडे गेलो. पाहतो तो कोपऱ्यात कॅमेरा ठेवलेला. तेथील बाईला विनंती केली. बाईने आम्हाला ओळखले आणि कोपऱ्यात ठेवलेला कॅमेरा हसतच माझ्याकडे दिला. प्रचंड आनंद झालेल्या मला तिचे आभार कसे मानावे सुचत नव्हते. तिने बक्षिसी घ्यायला चक्क नकार दिला. म्हटली, समोरच्या बाकावर तुमच्यापैकी कुणीतरी विसरून गेले होते. मी माझ्याजवळ ठेवून घेतला, परत आल्यावर देता यावा म्हणून. खिशात हात घालून जेवढ्या नोटा हाताला लागतील तेवढ्या काढून तिच्या हातात दिल्या. पुन्हा पुन्हा धन्यवाद म्हणत आम्ही परत निघालो.. हसतच.
 
दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास सुरू झाला. दिल्लीला परत येत असताना वाटेत अंबाला शहरात गाडीचे काही काम करायचे म्हणून ड्रायव्हर ने गाडी गॅरेज ला थांबवली. थोडा वेळ असल्याने उन्हात उभे राहून काय करायचे हा प्रश्न होता. अशावेळी लहान मुले बोअर होतंय, उकडतंय म्हणून जास्तच वैतागतात. तेवढ्यात मुलांना सायकल रिक्षा दिसली. मग मागणी झाली, आम्हाला सायकल रिक्षाची सवारी करायची. सायकल रिक्षा चालकाला थांबवून सांगितले, मुलांना एक चक्कर मारण्याची इच्छा आहे. पुढच्या चौकापर्यंत नेऊन परत आणणार का? काय होतील ते पैसे देऊ. हसून हो उत्तर आल्याबरोबर बालमंडळी पटापटा रिक्षात बसली. चालकाने एका बाजूला चौकापर्यंत रिक्षा नेऊन परत आणली, तरी बालमंडळी काही उतरायचे नाव घेईनात. चालकाने सुदधा हसत रिक्षा दुसऱ्या बाजूला नेली. जवळपास एक किमीची फेरी केल्यावर रिक्षा परत आली.
 
'कितने पैसे हुए भैय्या?' नक्कीच जास्त पैसे मागणार या अपेक्षेने विचारलेला प्रश्न
 
'कुछ नही'. क्लीन बोल्ड करत त्याचे उत्तर
 
'अरे नही, बताओ.'
 
'वैसे भी मेरी आज छुट्टी थी, कुछ काम था इसलीये बाहर निकला. इन बच्चोंके चेहरेपर खुशी देख ली बस. मुझे भाडा नही चाहिये."
आग्रह करून त्याला पैसे दिले आणि आमच्या कार कडे निघालो.
 
कुठून समाधान आणतात ही माणसं? एका बाजूला चोऱ्या करून आयते मिळवणारी व्यक्ती जिथे आहे तिथेच एक गरीब बाई चप्पल स्टँड वर काम करून कॅमेरा प्रामाणिकपणे परत करते. एक गरीब सायकल रिक्षावाला जो मुलांना दिलेला आनंद पैशापेक्षा जास्त महत्वाचा मानून भाडं नाकारतो.
 
अजूनही अशी माणसं जगात संख्येने जास्त आहेत, म्हणून जग चाललंय नाही का?
 
 
 
 
 
भूषण मेंडकी
 
Powered By Sangraha 9.0