जम्मू-काश्मीरबाबत भाजपच्या निर्णयावर विरोधकांची टिका

19 Jun 2018 16:45:50

 
 

जम्मू-काश्मीरच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय भाजपने आज अचानक जाहीर केल्यामुळे मोठाच राजकीय भूकंप झाला आहे. राज्याच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आह. मात्र भाजपच्या या निर्णयावर देशभरातून तीव्र राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. भाजपने आपल्या सोयीनुसार या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप केला जात आहे. देशभरात नुकत्याच पाहायला मिळालेल्या विरोधी आघाडीतील जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भाजपच्या या निर्णयावर तोंडसुख घेतले आहे. एकीकडे भाजप समर्थकांनी मात्र या निर्णयाचे तोंडभरून स्वागत केल्याचे दिसत आहे तर दुसरीकडे भाजप विरोधकांना हा निर्णय चांगलाच झोंबल्याचे दिसत आहे.
 
 
जे झाले ते योग्यच झाले : गुलाम नबी आझाद
 
देशातील प्रमुख विरोधी पक्ष व जम्मू-काश्मीरमधील दुसऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षानेही भाजपच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व एकेकाळचे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी या निर्णयावर टिका केली आहे. जम्मू काश्मीरचे सर्वाधिक नुकसान भाजप-पीडीपी सरकारच्या काळात झाल्याचा आरोप त्यांनी केला. ज्यांनी जम्मू-काश्मीरला विरोध करत आपला पक्ष उभा केला त्यांना राज्यात सरकार कसे चालवता येईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे एका अर्थाने जे झाले ते बरेच झाले असे मत आझाद यांनी व्यक्त केले. त्याचवेळी काँग्रेस पीडीपीसोबत कोणतेही सरकार स्थापन करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी घडल्या प्रकारावर अतिशय संयत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या ट्वीटर खात्यावर त्यांनी केवळ ‘आणि अशा प्रकारे सरकार संपुष्टात आले आहे’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
 
 
 
दुसरीकडे सध्या स्वतः वादग्रस्तपणे संपावर असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील यानिमित्ताने भाजपवर तोंडसुख घेतले आहे. राज्याची पूर्ण वाट लावल्यानंतर आता भाजप सत्तेतून बाहेर पडत आहे अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे. तसेच नोटाबदलीमुळे काश्मीरमधील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडल्याचा दावा भाजपने केला होता, आता त्याचे काय झाले असा सवालही उपस्थित केला आहे.
 
 
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही भाजपच्या या निर्णयाचे जबाबदारी झटकणारा निर्णय म्हणून वर्णन केले आहे. पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत याविषयी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. काश्मीरमध्ये केंद्र सरकार आणि पीडीपी-भाजपचे युती सरकार शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले. यातून स्वत:ला वाचवण्यासाठी भाजपाने काश्मीरमध्ये सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे असा आरोप मलिक यांनी केला आहे.
 
 
 
 
 
मेहबूबा मुफ्तींचे राजकारण संपले - ओवेसी
 
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन अर्थात एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीदेखील या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. मुळात भाजप व पीडीपी ही युतीच अभद्र होती त्यामुळे ती टिकणार नव्हतीच असे ओवेसी म्हणाले. भाजपसोबत युती केल्यामुळे काय होते हे पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सला आता कळले असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर मेहबूबा मुफ्ती यांच्याबद्दल मला कोणतीही सहानुभूती नसल्याचेही त्यांनी सांगितले. मेहबूबा मुफ्ती यांचे काश्मीर खोऱ्यातील राजकारण आता समाप्त झाले असून नजिकच्या काळात त्यांना कोणतेही राजकीय भवितव्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
 
एकीकडे या सर्व विरोधी प्रतिक्रिया येत असताना दुसरीकडे हिंदुत्त्ववादी नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांनी मात्र भाजपच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. भाजपने हा निर्णय जरा उशीराच घेतला पण तरीही याचे स्वागत आहे असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या तीन वर्षांत अडीच हजार नागरिक आणि सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे आता केंद्र सरकार सैन्याला राज्यात खुली सूट देईल अशी आशा तोगडिया यांनी व्यक्त केली आहे.
 
 
 
केवळ विरोधकच नाही तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांनीही भाजपच्या या निर्णयावर तोंडसुख घेतले आहे. आपला ५२वा वर्धापन दिन साजरा करणाऱ्या शिवसेनेनेही आपल्या मेळाव्यात भाजपवर टिका केली आहे. जम्मू काश्मीर सरकार नालायक आहे हे कळायला तीन वर्ष आणि ६०० सैनिकांचे बळी का जावे लागतात असा सवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0