नाशिकमध्ये पडला पैशांचा पाऊस!

19 Jun 2018 23:05:19



नाशिक : सिडकोतील विजयनगर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून तब्बल पाचपट रक्कम ग्राहकांना मिळत असल्याने पैशांचा पाऊस पडत असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. काल (दि. १८) बँकेने चार वाजता एटीएममध्ये पाच लाख रुपयांची रक्कम भरली. यानंतर ग्राहकांनी एटीएममधून रक्कम काढण्यास सुरुवात केली असता एटीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ग्राहकांना पाच पट रक्कम मिळत होती. यात एका ग्राहकाने दोन हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना दहा हजार रुपये एटीएममधून प्राप्त झाले. याची बातमी परिसरात समजताच ग्राहकांनी रक्कम काढण्यासाठी गर्दी केली. या वेळी अमोल गोलाईत हा एटीएममधून चार हजार रुपये काढावयास आला असता त्याला वीस हजार रुपये मिळाले. गोलाईत याने घटनेची माहिती बँकेला दिली. बँकेचे सहायक व्यवस्थापक प्रवीण भिसे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एटीएम बंद करण्यात आले. मात्र या चार तासांत सुमारे दोन लाखापेक्षा जास्त रक्कम ग्राहकांनी काढल्याचे निदर्शनास आले आहे.

 

रक्कम वसूल करणार!

 

एटीएममध्ये असलेल्या सीसी टीव्ही फुटेज तसेच ज्या खात्यावरून रक्कम काढण्यात आली, ती माहिती घेऊन रक्कम वसूल केली जाणार आहे.

 
प्रवीण भिसे, सहायक व्यवस्थापक
Powered By Sangraha 9.0