निसर्गकोपाची किंमत...

    दिनांक  19-Jun-2018    

भारतीय वातावरण सुदैवाने इतर काही देशांच्या तुलनेत सौम्य आणि सहनशीलच म्हणावे लागेल. अगदी असहनीय उकाडा नाही, सातत्याने अतिवृष्टी नाही किंवा अंगावर बोचणाऱ्या थंड-कोरड्या वाऱ्यांचा मारा नाही. पण, गेल्या काही वर्षांच्या वातावरणीय आलेखावर नजर टाकता, भारतीय हवामान, पर्जन्यमानातही आमूलाग्र बदल झालेले आढळतात. अतिवृष्टीमुळे अक्राळविक्राळ रूप धारण करून पूरपरिस्थिती निर्माण करणाऱ्या नद्या असो वा सूर्यालाही झाकोळणारी धुळीची वादळं, भारतातही नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढलेली दिसते. जेव्हा जेव्हा निसर्गाचा असा कहर कोसळतो, तेव्हा मनुष्यहानी बरोबरच अपरिमित वित्तहानीही होते. ही वित्तहानी केवळ संबंधित राज्याची आर्थिक घडीच विस्कटत नाही, तर देशाच्या उत्पन्नावरही त्याचा नकारात्मक परिणाम जाणवतोच. अशाच नैसर्गिक आपत्तींमुळे भारताला दरवर्षी साधारण ८० अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागत असल्याचा अधिकृत आकडा जागतिक बँकेने जाहीर केला आहे.

 

२.३ ट्रिलियन डॉलरच्या आपल्या अर्थव्यवस्थेत ८० अब्ज डॉलर्सच्या नुकसानाचा आकडा नगण्य निश्चितच नाही. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, २०१८ मध्ये भारतातील १६ राज्यांत वादळांमुळे आजतागायत ५०० जणांना आपले जीव गमवावे लागले. शिवाय, पाच हजार घरे जमीनदोस्त झाली, हजारो जनावरे मृत्युमुखी पडली आणि शेतपिकाचेही प्रचंड नुकसान झाले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या राज्यांना या नुकसानीची सर्वाधिक झळ सोसावी लागली. त्यातच राजधानी दिल्लीची हवा इतकी प्रदूषित की, मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत केवळ एक दिवस तेथील हवेतील दर्जा समाधानकारक असल्याचे आढळून आले. त्यातच केजरीवालांमुळे दिल्लीतील राजकीय अस्थैर्याची परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. तेव्हा, ढासळलेल्या नैसर्गिक आणि राजकीय परिस्थितीचा परिणाम एकूणच व्यापार-व्यवहारांवर प्रकर्षाने जाणवतो. ठप्प पडलेली मालवाहतूक, प्रवासी वाहतूक, त्यामुळे मनुष्यबळाचा अभाव, रखडलेली कामे याचा थेट परिणाम नुकसानीच्या आकडेवारींतून अब्जावधींच्या तोट्यांत प्रतिबिंबित होतो. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती रोखणे पूर्णत: आपल्या हातात नसले तरी त्याच्या धोक्याची पूर्वसूचना तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम केल्यास मनुष्यहानी, वित्तहानी निश्चितच कमी होऊ शकेल.

 

हॉस्पिटल आणि स्टेडियम

 

एखाद्या दुर्धर आजारातून आपली मुक्तता होईल किंवा नाही, याची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही. आयुष्याच्या प्रत्येक श्वासाची किंमत माणूस मरणपंथाला टेकला की उमगते, असे म्हणूनच म्हणत असावेत कदाचित. कारण, आपण ‘आज आहोत, उद्या कदाचित नसू’ ही भावनाच मुळात मनाला पोखरून जाते. बॉलीवूडचा अभिनेता इरफान खान याच्यावरही अशीच दुर्दैवी वेळ ओढवली. मार्च महिन्यात इरफानला कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले आणि बॉलीवूडसह इरफानचे जगभरातील चाहतेही हळहळले. मधल्या काळात इरफानने ट्विटरवरून याबाबत चाहत्यांशी संवादही साधला. त्यांच्या दुवा मागितल्या आणि पुढील उपचारासाठी इरफान लंडनला रवाना झाला.

 

इरफानलाही कर्करोगाविषयी कळल्यावर निराशेने त्याच्या मनाचा कोपरा अन् कोपरा व्यापला. सगळीकडे इरफानला फक्त अंधार आणि लाचारी दिसू लागली. आयुष्याला एकाएकी ब्रेक लागल्याचे इरफानला वाटले पण, त्याने धीर खचू दिला नाही. परिस्थितीसमोर हारही मानली नाही. एका पत्रात इरफानने त्याच्या भावनांना अशी अगदी वाट मोकळी करून दिली. इथे सांगायचा मुद्दा हाच की, हिमांशू रॉय, भय्यूजी महाराजांसारख्या सुप्रसिद्ध व्यक्तींच्या आत्महत्येच्या मन विषण्ण करणाऱ्या घटनांनंतर इरफानने मात्र जीवनप्रवासाच्या शेवटाचा मार्ग न निवडता, त्यावर यशस्वीपणे मात करण्याचा निर्णय घेतला.

 

इरफानचे भावनिक पत्र खरं तर त्याची, त्याच्या कुटुंबीयांची त्याला या अवस्थेत पाहून काय अवस्था झाली असेल, याची जाणीव करून देण्यासाठी पुरेसे आहेच. पण, इरफानने हॉस्पिटल आणि स्टेडियमचे दिलेले एक उदाहरण खरंच विचार करायला प्रवृत्त करते. लंडनमधील ज्या हॉस्पिटलमध्ये इरफानवर उपचार सुरू आहेत, त्याच्या अगदी समोर आहे क्रिकेटच्या पंढरीचे लॉर्ड्स मैदान. इरफानला हॉस्पिटलच्या बाल्कनीमधून स्टेडियमही दिसते. तो म्हणतो, “हॉस्पिटल काय किंवा स्टेडियम काय, दोन्ही ठिकाणी प्रकर्षाने जाणवते ती अनिश्चितता. हॉस्पिटलमध्ये उपचारांनंतर रुग्ण जगेल की नाही याचा ठाव नाही आणि स्टेडियममध्ये कोणता संघ जिंकेल, याचीही शाश्वती नाही. पण, मध्ये आहे केवळ रस्ता.” त्यातून इरफानला जगण्याची एक नवीन ऊर्मी, दिशा सापडली. आपलं आयुष्य हा एक खेळ आहे आणि तो आपल्याला जिंकायचाच आहे, या जिद्दीने इरफान उभा राहिला, तो पुन्हा जगण्यासाठी. कर्करोगातून मुक्तीच्या या परखड पुनर्जन्मासाठी...