कचरावाहक प्रवाह...

    दिनांक  18-Jun-2018   नद्यांच्या किनारी प्रदेशात मानवाने मोठमोठ्या औद्योगिक वसाहती वसवल्या, मोठमोठ्या कंपन्या उभारल्या. पण, त्यातले सर्वच अनावश्यक, रासायनिक घटक त्याने जी नदी लाखो जीवांना जगवते, त्यातच सोडायला सुरुवात केली. यामुळेच त्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला आणि त्या नद्या प्रदूषित झाल्या.

 
जगभरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून प्रत्येकजण त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्नरत आहे. एका बाजूला जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर दरवर्षी हजारोंच्या संख्येने जाणाऱ्या पर्यटकांमुळे प्लास्टिकच्या कचऱ्याचे ढीग साचल्याचे दृष्टीस पडते, तर दुसरीकडे सागरी प्रदूषणातही सातत्याने वाढ होत आहे. निसर्गावर, पर्यावरणावर आक्रमण करून त्याला उद्ध्वस्त करणारा एकमेव जीव म्हणून माणसाचेच नाव घेतले जाते. सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट असो वा जगभरातील समुद्र वा कोणतेही निसर्गरम्य ठिकाण, तिथे जाऊन कचरा करणारा माणूसच असतो. त्यामुळे कचऱ्याचा पुरता बंदोबस्त करायचा असेल तर माणसाला आपल्या सवयी तर बदलाव्या लागतीलच, पण कचऱ्याचा शंभर टक्के पुनर्वापरही करावा लागेल. सोबतच कंपन्यातील रसायने, सांडपाणी, विघटन न होणारे पदार्थ यांवरही आळा घालण्याच्या दिशेने व्यापक स्तरावर पावले उचलावी लागतील.
 

दरवर्षी समुद्रात ८० लाख टन कचरा वाहून येतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, जगातील दहा नद्या समुद्रातील प्रदूषणाला सर्वाधिक जबाबदार असल्याचे समोर आले आहे. समुद्रातील प्रदूषणाला जबाबदार असलेल्या नद्यांमध्ये चीनच्या यांगत्से नदीचा पहिला क्रमांक असून, त्यानंतर भारतातली गंगा नदी दुसऱ्या, तर सिंधू नदी सहाव्या क्रमांकावर आहे. समुद्रात जो प्लास्टिक कचरा आढळून येत आहे, त्यातील जवळपास ९० टक्के कचरा या १० नद्यांमधूनच वाहून येतो. विशेष म्हणजे, यातील दहा पैकी आठ नद्या आशिया खंडातील आहेत. यात चीनच्या यांगत्से, येलो, पर्ल, मिकांग, है ही आणि एमर (रशियातूनही वाहते) या नद्यांचा समावेश आहे. आफ्रिकेतल्या नाईल व नायजर आणि भारतातल्या गंगा व सिंधू (पाकिस्तानातूनही वाहते) या नद्यांचाही यामध्ये समावेश आहे. समुद्रातील कचऱ्यासाठी या दहा नद्या जरी जबाबदार असल्या तरी त्या नद्यांमध्ये कचरा टाकणारा माणूसच सर्वस्वी दोषी. नद्यांच्या किनारी प्रदेशात मानवाने मोठमोठ्या औद्योगिक वसाहती वसवल्या, मोठमोठ्या कंपन्या उभारल्या. पण, त्यातले सर्वच अनावश्यक, रासायनिक घटक त्याने जी नदी लाखो जीवांना जगवते, त्यातच सोडायला सुरुवात केली. यामुळेच त्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला आणि त्या नद्या प्रदूषित झाल्या.

 

संशोधक डॉ. क्रिश्चन स्कीमिट नद्यांमधील कचऱ्याबद्दल सांगतात की, “अधिकाधिक कचरा नद्यांच्या किनाऱ्यांमुळेच होतो. ज्याची विल्हेवाट लावली जात नाही, असा कचरा वाहून समुद्रात येऊन मिसळतो.” म्हणजेच, विल्हेवाट न लावण्याजोगा कचरा माणूसच नद्यांमध्ये टाकत असतो. या अभ्यासातून असेही समोर आले की, मोठ्या नद्यांच्या प्रति घनमीटर पाण्यात जेवढा कचरा असतो, तेवढा छोट्या नद्यांमध्ये नसतो. साहजिकच आहे, मोठ्या नद्यांच्या जवळच सर्वाधिक लोकसंख्या व उद्योग आढळतात आणि त्यातूनच सर्वाधिक कचराही निर्माण होतो, जो त्या नद्यांमध्येच टाकला जातो. आशियातल्या सर्वात लांब आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या यांगत्से नदीच्या जवळपास चीनची एक तृतीयांश म्हणजे ५० कोटी जनता राहते. ही जनता त्या नदीलगत असलेल्या मोठ्या शहरांमुळे, उद्योगधंद्यांमुळे, रोजगारामुळेच राहते. त्याचमुळे हीच नदी समुद्रातल्या कचऱ्याला सर्वाधिक जबाबदार ठरते. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाचे प्रमुख एरिक सोलहेम यांच्या मते, “चीनमध्ये जगातला सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण होतो. चीनने स्वतःला जगाचा कारखाना म्हणून उभे केले आहे. जिथे निरनिराळ्या वस्तूंचे उत्पादन केले जाते आणि जगाच्या बाजारात त्याची विक्री केली जाते.” या वस्तू इलेक्ट्रॉनिक व प्लास्टिकचा सर्वाधिक वापर केलेल्या असतात. त्याचमुळे जगाचा कारखाना असलेल्या या देशात वस्तूंच्या निर्मितीनंतर उरलेल्या कच्च्या मालातून सर्वाधिक प्लास्टिक कचरा तयार होतो.

 

भारतातील गंगा नदीही समुद्रातल्या कचऱ्याला जबाबदार असल्याचे या संशोधनातून पुढे आले. गंगा नदीतला कचरा, तिचे प्रदूषण ही चिंतेची बाब आहेच. गंगेतले प्रदूषण नष्ट होऊन ती स्वच्छ, निर्मळ व्हावी यासाठी प्रयत्नही केले जात आहेतच. त्यामुळे आगामी काळात गंगा नदी स्वच्छ होऊन तिच्यातून वाहून जाणारा कचरादेखील कमी होईल, असे म्हणण्यास नक्कीच वाव आहे.