खोदलेल्या रस्त्यांमुळे अपघातांची शक्यता

17 Jun 2018 21:05:21



टिटवाळा : येथील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमधील झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी खोदण्यात आलेले रस्त्यांवरील खड्डे अनेक दिवस उलटूनही न बुजवल्याने या ठिकाणी रस्त्यावरून वाहतूक करणार्‍या वाहनांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

टिटवाळा पूर्वेकडील स्टेशनकडून आंबिवलीकडे जाणार्‍या मार्गावर असलेल्या रवींद्र आर्केड, पॉवर हाऊस, माताजी मंदिर या ठिकाणी पावसाळ्याअगोदर पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने दुरुस्तीच्या कामासाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले होते. मात्र अनेक दिवस झाले तरीही हे खड्डे उघड्या अवस्थेत असल्याने खोदलेल्या खड्यात येथून येणार्‍या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच त्यातून काढलेल्या मातीमुळे चिखल झाल्याने दुचाकी घसरण्याचीही शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वीच काम झाल्यानंतर हे खड्डे बुजवणे अपेक्षित असतानाही याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. एखादा अपघात किंवा दुर्घटना झाल्यानंतरच यावर उपाययोजना होईल का?, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

Powered By Sangraha 9.0