मलाक्काची सामुद्रधुनी आणि भारतीय सागरी सुरक्षा

    दिनांक  16-Jun-2018   महासागरातील अंमली पदार्थांची तस्करी नियमितपणे होतच असते. आंतरराष्ट्रीय गुप्तवार्ता सहकार्य आणि संवेदक उपकरणे/साधनेच्या साहाय्याने तिच्यावर मात करता येऊ शकेल. महासागरी आव्हानांना आणि धोक्यांना तोंड देण्याकरिता अद्ययावत व्यूहरचना आवश्यक आहे. ती समुद्रातील धोक्यावर लक्ष ठेवून असावी.

 

डोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर हे तिन्ही देश मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या परिसरात आहेत. ही सामुद्रधुनी भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. नरेंद्र मोदी इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरच्या या देशांच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात भारत आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये १५ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. मुक्त, खुल्या व पारदर्शक नियमांवर आधारित शांततामय इंडो-पॅसिफिक भागाच्या अस्तित्वाची गरज आहे, असे भारत व इंडोनेशिया यांनी म्हटले आहे. सध्या पूर्व व दक्षिण चीन सागरात चीनची दादागिरी सुरू असल्याने दोन्ही आशियाई देशांनी प्रथमच सादर केलेल्या संयुक्त निवेदनात या उल्लेखाला विशेष महत्त्व आहे. दोन्ही देशांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात संयुक्त सागरी सहकार्य तसेच सुरक्षामुक्त, खुल्या, पारदर्शक, नियमबद्ध तसेच शांततामय भरभराटीचा इंडो-पॅसिफिक भाग यावर भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये नौदल, माहिती-तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, सागरी व्यापार आणि सुरक्षा, नौदल, सायबर सुरक्षा, अवैध तस्करी, प्रशासन व्यवस्थापन आणि आर्थिक सहयोग यावर आठ करार करण्यात आले आहेत. मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या चिंचोळ्या पट्ट्यातून जगात सर्वाधिक सागरी व्यापार होतो. या परिसरात काही दुर्घटना घडली, तर चीन आणि जपानचा पश्चिम आशिया, आफ्रिका आणि युरोपशी संबंध तुटू शकतो. हा भाग आपल्या अंदमान-निकोबार द्वीपसमूहापासून फार जवळ आहे. याचे अनेक फायदे (चिनी व्यापार थांबवण्याचे) आणि काही धोके (दहशतवादी, चाचेगिरी, स्मगलिंग अवैध मासेमारी) पण आहेत.

 

चाचेगिरी, दहशतवाद आणि इस्लामी दहशतवादी गट

 

जगातील दहशतवादी गट, अल-कायदा, लष्कर-ए-तोयबा आणि जेमाह-इस्लामिया हे हिंदी महासागरात वावरलेले आहेत. महासागरी दळणवळणाच्या धोक्यात चाचेगिरी सर्वात वरच्या स्थानी आहे. चाचेगिरीचा जन्म मलाक्काच्या सामुद्रधुनीत आणि एडनच्या आखातात झाला. जहाजांवरील हल्ल्यांची वर्गवारी किरकोळ आणि मोठे हल्ले अशी केली जाऊ शकते. किरकोळ हल्ल्यांत बंदरातील वा नांगरित असतानाचे हल्ले समाविष्ट असतात. यात जहाजावरील उपकरणे, खलाशांचे सामान चोरी होऊ शकते. दुसऱ्या टोकास मोठ्या हल्ल्यांत जहाज ताब्यात घेणे, खंडणीकरिता खलाशांना पळवून नेणे आणि हिंसक हल्ल्यांचा समावेश होतो.

 

चाच्यांची कार्यपद्धती

 

हल्ली चाचे हे गतिमान नावांवर स्वार झालेले प्रशिक्षित योद्धे असतात. उपग्रह दूरध्वनी, जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली, स्वयंचलित शस्त्रे, बोटीविरोधी तोफा आणि स्फोटकांनी ते सुसज्ज असतात. चाचेगिरी आणि दहशतवाद आता परस्परांत गुंतले आहेत. आजचे चाचे महासागरी दहशतवादी आहेत. लक्ष्य केलेल्या जहाजाभोवती ते छोट्या नावांतून मशीनगन फायर करतात आणि त्यास थांबणे भाग पाडतात. चाच्यांपाशी उत्तम योजना तयार असते. जहाजांची हानी, मालाची हानी आणि वाढते विमा हप्ते यांची मिळून एकूण हानी आता दरसाल १६ अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. अनेक चाचे, विशेषत: पूर्व आशियातील चाचे; भ्रष्ट अधिकारी, बंदरातील कर्मचारी, भाडोत्री गुंड आणि लुटीची विल्हेवाट लावणारे व्यापारी यांची मिळून एक टोळीच बनलेली असते. कमी वेतनावर काम करणारे सुरक्षाकर्मीही या व्यवसायात प्रवेश करत आहेत. काही हल्ल्यांतही सहभागी होतात.

 

दहशतवाद्यांना चाचेगिरी हा अर्थपुरवठ्याचा एक समृद्ध स्त्रोतच वाटतो. इंडोनेशियाच्या गुप्तवार्तानुसार जेमाह-इस्लामिया, अल- कायदाशी संबंधित इंडोनेशियन दहशतवादी गट इत्यादींच्या पकडलेल्या ज्येष्ठ दहशतवाद्यांनी कबूल केले आहे की, त्यांनी मलाक्काच्या जलवाहतुकीवर हल्ला करण्याचा विचार केला होता. जगातील सर्वाधिक मूलतत्त्ववादी इस्लामिक गट, इंडोनेशियन फुटीरतावादी गट ‘फ्री असेह मुव्हमेंट’चे दहशतवादी; वाढत्या प्रमाणात जहाजे ताब्यात घेतात व खलाशांना ओलीस ठेवतात. वाटाघाटींतून सुमारे एक लाख डॉलर्स प्रती जहाज दराने प्राप्त होणारी खंडणी; नंतर इंडोनेशियन सरकारविरोधातील कारवाया सुरू ठेवण्यासाठी शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी वापरली जाते आहे.

 

हिजबोल्लाह, जेमाह-इस्लामिया, द पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन जनरल कमांड यांसारखे दहशतवादी गट महासागरी सामर्थ्य विकसित करत आहे. अल-कायदा आणि संबंधित संघटना स्वत:च्या ताब्यात पळवलेली जहाजे बाळगतात. ती पुन्हा रंगवून, नव्याने नावे देऊन, खोट्या कागदपत्रांच्या आधारे वावरतात. त्यातील खलाशी खोटी पात्रता प्रमाणपत्रे बाळगतात. स्फोटकं भरलेली बोट आणून धडकवण्याचे प्रकार एखाद्या मोठ्या बंदरात ते हे कृत्य करू शकतात. चाचेगिरी आणि दहशतवादी यातील हे मेतकूट, ऊर्जा बाजाराकरिता धोकादायक ठरू शकते. कारण, जगातील सर्वाधिक तेल व वायू जगातील चाचेसंसर्गित पाण्यातूनच वाहून नेले जाते. पुरवठ्यातील व्यत्ययाचा आघात तेलाच्या किंमतींवर होतो.

 

महासागरी सामर्थ्य असलेले दहशतवादी गट

 

पैसा, धर्मामुळे भारतीय गटांना मदत करणाऱ्या; भारतातील आणि भोवतालच्या दहशतवादी गटांचे नेमके सामर्थ्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अल-कायदाकडे थोडेसे नाविक सामर्थ्य आहे. अब्द-अल-रहीम-अल-नशिरी हा अल-कायदाचा नाविक तज्ज्ञ होता. इंडोनेशियातील जेमिआह-इस्लामियाचा अल-कायदासोबत संपर्क आहे. त्यांना महासागरी हल्ल्यांचे व आत्मघातकी स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षणही लाभलेले असू शकेल. २००३ मध्ये सिंगापूरच्या अधिकाऱ्यांनी जेमिआह इस्लामियाचा, चांगी नौतळातील यू.एस. जहाजांवरील हल्ला उधळून लावला होता. जेमिआह-इस्लामियाच्या दहशतवाद्यांनी जलप्रवाहाच्या सर्वात अरुंद भागात, आत्मघातकी बोटींचा जहाजांवर हल्ला करण्याचे निश्चित केले होते. बांगलादेशवासी हुजी (सुमारे १५ हजार दहशतवादी) ही पाकिस्तानची शाखा आहे. हुजी ईशान्य भारतातील बंडखोर गटांना जोडली आहे आणि ईशान्य भारतात दीर्घ काळापासून शस्त्रास्त्रांचा प्रमुख स्त्रोत आहे. अवैध शस्त्रास्त्रांचे मोठे साठे तिने समुद्रातून पाठवलेले आहेत आणि बांगलादेशी बंदरांतून उतरवून, ते भारतातील बंडखोर गटांना विकण्यात आले होते.

 

‘मोरो इस्लामिक लिबरेशन फ्रंट फिलिपाईन्स’ भोवतालच्या पाण्यात सक्रिय आहे. अबू सय्यद ग्रुपकडे महासागरी सामर्थ्य आहे. फेब्रुवारी २००४ मधील मनिला खाडीत सुपर फेरीवर टाकलेल्या स्फोटकांस हा गट जबाबदार होता. मलाक्काच्या सामुद्रधुनीत होणारी चाचेगिरी काही वेळ बंगालच्या उपसागरातही होत होती. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीकरिता हिंदी महासागर सोयीचा ठरू पाहत आहे. शस्त्रास्त्रांची अवैध वाहतूक, मानवी आणि अंमली पदार्थांचा अवैध व्यापार याबाबतच्या सर्वाधिक घटना येथील पाण्यात होत आहेत.

 

प्रादेशिक महासागरी सुरक्षा पुढाकार (रिजनल मेरिटाईम सिक्युरिटी इनिशिएटिव्ह) आवश्यक

 

इंडोनेशियन नौदल, जे महासागरी दहशतवादाचा सामना करत आहे, ते कालबाह्य झाले आहे आणि त्याच्याकडे विस्तृत किनाऱ्यावर गस्त घालण्यासाठी अपुऱ्या युद्धनौका व संसाधने आहेत. मलेशियाची स्थितीही फारशी बरी नाही. आशियाकडे प्रस्थान करणाऱ्या वाहतुकीची सुरक्षा सांभाळणारे हे दोन देश ते करण्यास असमर्थ आहेत.

 

या नौदलांचे सामर्थ्य वाढवण्याचा प्रकल्प फारच दीर्घ कालावधीचा. या सामुद्रधुनीतील सुरक्षा अमेरिका सांभाळणार नाही. चीन, भारत, जपान आणि दक्षिण कोरिया यासारख्या देशांचा संपूर्ण तेलपुरवठा मध्य पूर्वेतून होत असतो. म्हणून महासागरी सुरक्षेकरिताचा त्यांचा सहभाग वाढण्यास भरपूर वाव आहे. सामुद्रधुनींची गस्त घालण्याकरिता बहुराष्ट्रीय बले उभी करणे हा एक चांगला पर्याय आहे.

 

आशियाई राष्ट्रांनी कर्मचारी प्रशिक्षण, आर्थिक मदत, तंत्रज्ञान कुमक आणि महासागरी निगराणीतल्या मदतीद्वारे सामर्थ्य वाढवणे सुरू केलेले आहे. मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या सुरक्षितता आणि सुरक्षेकरिता जपान व भारत यांनी आर्थिक मदत देण्याचे ठरवले आहे. अमेरिकेने महासागरी निगराणीकरिता इंडोनेशियाला रडार देऊ केले आहेत. जपानने मलेशिया आणि इंडोनेशियाला त्यांचे गस्ती सामर्थ्य वाढविण्याकरिता लहान जहाजे रवाना केली आहेत.

 

सागरी सुरक्षेच्या संबंधित उपाययोजना

 

आपण महासागरी सामर्थ्य असलेले आशियातील दहशतवादी गट, जलशाखा, चाचेगिरी यांच्या क्षमतेचा नियमितपणे अंदाज घ्यावा. त्यांच्या कार्यपद्धतीनुसार, प्रतिबंधात्मक उपाय तयार/निर्माण करावे लागतात. सुरक्षा दलांकडूनचे, डावपेचात्मक (टॅक्टिकल) आणि आपत्कालीन व्यवस्थापन प्रतिसाद, तयार/निर्माण केले जाऊ शकतील. आपल्या बंदरांतील आणि किनाऱ्यावरील; कठीण प्रसंग (काँटिन्जन्सीज)/अपघात/घातपात इत्यादींची रंगीत तालीम करून, प्रतिसाद तयार केले जाऊ शकतील.

 

महासागरातील अंमली पदार्थांची तस्करी नियमितपणे होतच असते. आंतरराष्ट्रीय गुप्तवार्ता सहकार्य आणि संवेदक उपकरणे/साधनेच्या साहाय्याने तिच्यावर मात करता येऊ शकेल. महासागरी आव्हानांना आणि धोक्यांना तोंड देण्याकरिता अद्ययावत व्यूहरचना आवश्यक आहे. ती समुद्रातील धोक्यावर लक्ष ठेवून असावी. प्रभावी गुप्तवार्तांकन यंत्रणा असावी आणि विश्वसनीय सशस्त्र प्रतिसाद दिला जावा. यामध्ये इंडोनेशियन, मलेशिया, सिंगापूर व इतर आशियाई देशांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.