ताहरिक-ए-तालिबानचा म्होरक्या ठार

    दिनांक  15-Jun-2018कुनार 
: ताहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मुल्ला फैजुल्ला याचा अमेरिकेकडून खात्मा केला आहे. अमेरिकेच्या सुरक्षा विभागाने याविषयी दावा केला असून गेल्या दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये फैजुल्लासह त्याचे पाच साथीदार मारले गेले आहेत. 

अफगाणिस्तान कुनार प्रांतामध्ये अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या सैनिकांकडून संयुक्त ही कारवाई करण्यात आली. यावेळी अमेरिकेने आपल्या ड्रोनच्या सहय्याने फैजुल्ला आणि त्याचे साथीदार लपून बसलेल्या जागेवर हल्ला चढवला. हल्ला झाल्यानंतर काही वेळाने अमेरिकन सैन्येने हल्ला केलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केल्यानंतर त्याठिकाणी काही मृतदेह आढळून आले. या मृतदेहातील एका मृतदेह हा फैजुल्लाचा असून या हल्ल्यात तो मारला गेल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.


कोण होता फैजुल्ला ?

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या ताहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेचा तो संस्थापक होता. या संघटनेला टीटीपी अथवा पाकिस्तान तालिबान म्हणून देखील ओळखले जाते. पाकिस्तानमध्ये शरीयावर आधारित एक इस्लामिक सत्ता स्थापण करणे हा हा फैजुल्ला आणि त्याच्या या संघटनेची महत्त्वकांक्षा होती. या महत्त्वकांक्षेतून फैजुल्लाने आतापर्यंत पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी कारवाया केलेल्या आहेत. यामध्ये त्याने एका लहान मुलांच्या शाळेमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला होता. ज्यामध्ये १३२ लहान मुलांचा मृत्यू झाला होता.