भारत-म्यानमारमधील संबंधात खोडा घालण्यासाठी हत्या?

    दिनांक  15-Jun-2018    

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या माहितीनुसार रोहिंग्या कट्टरवाद्यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये डझनभर हिंदूंच्या हत्या केल्या. अ‍ॅम्नेस्टीच्या म्हणण्यानुसार या हत्या कट्टरपंथी गट अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीने केल्या. म्यानमारच्या लष्करानेही असाच दावा केला होता. सध्या म्यानमारमध्ये जवळपास अडीच लाख तर कट्टरपंथीयांच्या तापामुळे त्रस्त असलेल्या रखाईन प्रांतात १० हजार हिंदू राहतात.
 

म्यानमारमध्ये गेल्या काही काळापासून रोहिंग्या मुसलमान व बौद्ध समुदायांत संघर्ष सुरू आहे. म्यानमार सरकारच्या मते रोहिंग्यातील जे लोक कट्टरपंथी व मूलतत्त्ववादी आहेत, त्यांची समस्या तुलनेत मोठी आहे तर रोहिंग्या मुसलमान या संघर्षाचा संबंध मानवाधिकार उल्लंघनाशी जोडतात. काही लोक याला दोन्ही धर्मातील सांस्कृतिक द्वंद्वदेखील मानतात, पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार ही समस्या दोन धर्मातली जशी आहे, तशीच तिला जागतिक राजकारणाचेही कोन आहेत. म्यानमारमध्ये बौद्ध-मुसलमान संघर्षामध्ये हिंदूंच्या सामूहिक हत्यांबद्दलचे तथ्य तर हैराण करणारे आहे. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या माहितीनुसार रोहिंग्या कट्टरवाद्यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये डझनभर हिंदूंच्या हत्या केल्या. अ‍ॅम्नेस्टीच्या म्हणण्यानुसार या हत्या कट्टरपंथी गट अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीने केल्या. म्यानमारच्या लष्करानेही असाच दावा केला होता. सध्या म्यानमारमध्ये जवळपास अडीच लाख तर कट्टरपंथीयांच्या तापामुळे त्रस्त असलेल्या रखाईन प्रांतात १० हजार हिंदू राहतात. रोहिंग्या साल्वेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी रखाईनमधल्या रिक्ता गावात राहणार्‍या हिंदूंना लक्ष्य केले, त्याचबरोबर फकिरा बाजार आणि चिआंगछारीमध्ये राहणार्‍या हिंदूंचीदेखील क्रूरपणे हत्या केली. रोहिंग्यांच्या अत्याचाराला कंटाळून कित्येक हिंदू कुटुंबांनी घरदार सोडून पलायनही केले. सध्या रखाईनची राजधानी सितवेमध्ये सुमारे ७०० हिंदू कुटुंबे एका सरकारी निर्वासित शिबिरामध्ये राहत आहेत, ज्यांची जबाबदारी म्यानमारच्या लष्करावर आहे.

 

म्यानमारमध्ये हिंदूंच्या हत्येमागे धार्मिक उन्माद तर आहेच, पण यात चीन आणि पाकिस्तानचेही हितसंबंध गुंतलेले असल्याचे लक्षात येते. हिंदूंच्या हत्या करून भारत आणि म्यानमारमधील मजबूत संबंधांमध्ये खोडा घालण्याचा हा कट आहे. यालाच दहशतवादाची वैश्विक कूटनीती म्हटले जाते, ज्याचा उपयोग वेळोवेळी जागतिक महासत्ता आपल्या फायद्यासाठी करत आल्या आहेत. म्यानमारचे स्थान भारत आणि चीनदरम्यान, एखाद्या भिंतीसारखे आहे. सोबतच दोन्ही देश संरक्षणासाठी एकमेकांवर अवलंबून आहेत. तसेच बौद्धबहुल म्यानमार आणि भारतामध्ये हजारो वर्षांपासूनचे सांस्कृतिक संबंध आहेत. भारतातल्या बौद्ध प्रचारकांनीच तिथे बौद्ध धर्माची स्थापना केली. हिंदू आणि बौद्धांमध्येही दृढ आध्यात्मिक संबंध आहेत, ज्यामुळे भारताच्या दृष्टीने म्यानमारचे आर्थिक, सामरिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक व रणनीतिक महत्त्व मोठे असल्याचे दिसते. त्याचबरोबर म्यानमार हा आसियान संघटनेचा एकमेव असा देश आहे, ज्याची सागरी व भूसीमा भारताशी जुळते. दुसरीकडे चीनने कोको बेटांवर आपले लष्करी तळ उभारण्याचा बेत आखला आहे. तसेच चीन म्यानमारला हळूहळू आर्थिक आणि सामरिकदृष्ट्या आपल्या जाळ्यात अडकविण्यासाठीदेखील प्रयत्न करत आहे, पण म्यानमारची भौगोलिक स्थिती भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. कारण म्यानमार भारताच्या लूक ईस्ट धोरणाचे प्रवेशद्वार आहे. याच धोरणानुसार भारताने मणिपूर-म्यानमार-थायलंड महामार्गाच्या निर्मितीचा दृढसंकल्प केला आहे. हा मार्ग भारताच्या मोरे या ठिकाणापासून थायलंडच्या माई सोटपर्यंत जाईल. याच्या साहाय्याने म्यानमारमधून भारत ते थायलंडपर्यंतचा प्रवास रस्तेमार्गाने करता येईल. एवढेच नव्हे तर दोन्ही देशांमध्ये गेल्या काही वर्षांपासून एकत्रित लष्करी सरावही होत आहे. ज्यामुळे पूर्वोत्तरातील चीन-पाकिस्तान-बांगलादेश समर्थित दहशतवादाला आळा घालण्यातही यश आले.

 

१९९५ सालचे ’गोल्डन बर्ड ऑपरेशन’ असो वा २०१५ सालचे म्यानमारच्या सीमेत घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात मिळालेले यश असो, हे म्यानमार आणि भारतामधील परस्पर सहकार्याचेच द्योतक आहे. दरम्यान, भारताच्या मिझोराम तथा म्यानमारच्या सितवे बंदराला जोडण्यासाठी कलादान मल्टी मॉडेल पारगमन योजनाही विकसित केली जात आहे. भारताने म्यानमारमध्ये रस्ते उभारणीसाठीही मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. आगामी काळात या सर्वच योजनांमुळे पूर्वोेत्तरात मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. भारत आणि म्यानमार सीमेच्या दोन्ही बाजूला नागा कुकी जनजातीची मोठी लोकसंख्या आहे, ज्यांच्यात सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध आहे. यासाठीच दोन्ही देशांमध्ये १६ किमीच्या क्षेत्रात मुक्त दळणवळण क्षेत्राची तरतूद आहे, पण रोहिंग्या घुसखोरांसाठीदेखील हा रस्ता अनुकूल मानला जातो. आपल्याला माहितीच असेल की, ८० च्या दशकात पाकिस्तानने खलिस्तानची आग भडकावून हिंदू आणि शिखांदरम्यान दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आता म्यानमारच्या बहाण्याने दोन्ही देशांत बौद्ध आणि हिंदू समुदायामध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जाहीरच आहे की, म्यानमारमध्ये प्रभावशाली असलेल्या रोहिंग्या साल्वेशन आर्मीने लष्कराशी युद्ध आणि संघर्षाच्या आडून हिंदूंना लक्ष्य केले आहे, ज्यामागे केवळ भारत आणि म्यानमारचे संबंध खराब व्हावे, एवढेच नव्हे तर बौद्ध आणि हिंदूंदरम्यानही धार्मिक उन्माद निर्माण व्हावा, हा उद्देश आहे. दरम्यान, म्यानमारमध्ये हिंदूंच्या सामूहिक हत्येचा प्रयत्न वैश्विक दहशतवादाच्या कूटनीतीचा भाग आहे, ज्यापासून देशाने सजग राहण्याची गरज आहे.