गरज रात्र निवारा केंद्रांची नूतनीकरणाचे काम लवकरच

14 Jun 2018 22:22:35



डोंबिवली : रात्रीच्या सुमारास बेघर, अनाथ तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी शहरात रात्र निवारा केंद्र उभारण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत, पण रात्र निवारा केंद्र तसेच पावसाळ्याच्या धर्तीवर तयार करण्यात येणारी संक्रमण शिबिराची बिकट अवस्था असल्याने ही सोयीची ठिकाणे गैरसोयीची ठरत आहेत.

या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत पांडुरंग वाडी येथे कडोंमपाने डिसेंबर २०११ पासून रात्र निवारा केंद्र सुरू केले. या तीन मजली इमारतीत ७५ ते शंभर जणांची राहण्याची क्षमता आहे, तरी उपयोगाविना ही वास्तू धूळ खात पडलेली आहे. या उपर रात्र निवारा केंद्रांचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी महापालिकेचे प्रयत्न कमी पडत असल्याची चर्चा मात्र जोर धरत आहे. अनेकांना शहरात निवारा केंद्र आहे, याची माहितीही नाही. पालिकेच्या वतीनेही त्याची पुरेशी जनजागृती न झाल्याने या सुविधेपासून बेघर वंचितच आहेत.

दरम्यान २००९ साली डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी येथे संक्रमण शिबीर पालिका प्रशासनाने अद्ययावत स्वरूपात बांधले, पण आज याची परिस्थिती बिकट आहे. पावसाळ्यात येथे नागरिकांचे पुनर्वसन करणे जिकिरीचे आहे. काही वर्षांपूर्वी पालिकेने हे केंद्र एका सेवाभावी संस्थेला चालविण्यासाठी दिले होते. यासाठी एक रुपया भाड्याने तीन वर्षांच्या कराराने चालविण्यासाठी देण्यात आले होते, पण या कंत्राटदाराने नागरिकांकडून भाडे वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. अखेर महापलिकेच्या देखरेखीअंतर्गत हे केंद्र सामजिक संस्थांना देत चालविण्यात आले. सद्यस्थितीला सामाजिक संस्थेचे कंत्राट पूर्ण झाले असून, नव्याने निविदा काढून हे कंत्राट देण्याचे काम करण्यात येणार आहे.

केंद्राला अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे, पण हे रात्र निवारा केंद्र चालविण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुरू आहे. शासन आदेशानुसार या रात्र निवारा केंद्राच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून, आचारसंहिता पूर्ण होताच हे काम करण्यात येईल व लवकरच बेघरांसाठी खुले करण्यात येईल, अशी माहिती समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर यांनी दिली.

Powered By Sangraha 9.0