वृक्षाच्छादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर

14 Jun 2018 21:42:32

 

 
नाशिक : वनवृक्षाच्छादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून राज्यात २७३ चौरस किलोमीटर क्षेत्राने वन विस्तारित झाले असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. नाशिक विभागातील १३ कोटी वृक्ष लागवड आणि संगोपनाचे नियोजन यासाठी पूर्वतयारी बैठक आज झाली. त्याची माहिती देताना ते बोलत होते. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आ.देवयानी फरांदे उपस्थित होते. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी,वन विभागाचे अधिकारी आणि मनपा अधिकारी उपस्थित होते.
 

टेकड्यांचे हरितीकरण, स्व.उत्तमराव पाटील जैव विविधता उद्यानाची निर्मिती, रस्ते, कालवे, रेल्वे यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड, विभागीय स्तरावर हायटेक नर्सरी निर्मिती, पाणथळे, सरोवरे आदि ठिकाणी जैव विविधता व्यवस्थापन आदि विषय या बैठकीत हाताळण्यात आले. बांबू टी पी फ्री करण्याच्या योजनेमुळे राज्यातील बांबूचे क्षेत्र ४४६२ चौरस किमी ने विस्तारित झाले आहे. अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली.

 

आज नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ नाशिकमध्ये होते. त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा केला आहे, याबाबत विचारता मुनगंटीवार यांनी सांगितले, एखाद्याने गुन्हा केला आहे की नाही हे न्यायालय ठरविणार की नेते ठरविणार? असा सवाल प्रश्नकर्त्यास केला.

 

खडसे पक्ष सोडणार नाहीत

 
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडणार असल्याचे चित्र असल्याचे पत्रकारांनी विचारले असता खडसे हे माझ्यापेक्षा ज्येष्ठ नेते असून ’जिना यहा मरना यहा’ हीच त्यांची भूमिका राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर ओबीसी प्रश्नावर देखील नेत्यांचे काही म्हणणे नसून ओबीसी समाजाला न्याय मिळावा अशी आम्हा सर्वांचीच भूमिका आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0