रा.स्व.संघ जनकल्याण समितीतर्फे वनवासी जोडप्यांचा सन्मान

14 Jun 2018 21:49:06



नाशिक : अधिक मासानिमित्त मंगळवारी दि.१२ जून रोजी आगळावेगळा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे घेण्यात आला. अधिक मासात जावयांना आमंत्रण देऊन सासुरवाडीला बोलावले जाते. त्यांना मानपान दिला जातो. अगदी त्याचप्रमाणे विविध पाड्यांतील वनवासी जोडप्यांना नाशिकला येण्याचे आमंत्रण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीने दिले.

 

हरसूल या तालुक्यातील २० पाड्यांतील ८० वनवासी जोडपी स्वखर्चाने नाशिकला आली. मंगळवारी सकाळी रामकुंडावर स्नान केल्यानंतर त्यांनी काळाराम मंदिर आणि नंतर कपालेश्वर मंदिरात दर्शन घेतले. शैनकाश्रमात या वनवासी बांधवांना भोजन देण्यात आले. गजानन महाराज संस्थानच्या वेणुदिदी यांनी उपस्थितांना आध्यात्मिक आणि सामाजिक मार्गदर्शन केले. अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांनीही या वनवासी जोडप्यांशी संवाद साधला. थेट वनवासी पाड्यावर जाऊन त्यांना दिलेले आमंत्रण, कार्यक्रमाला उपस्थित असलेली वनवासी जोडपी, त्यांचे मन:पूर्वक केलेले स्वागत, रामकुंडावरील पवित्र स्नान, काळाराम आणि कपालेश्वर मंदिरातील दर्शन, त्यांचे सहभोजन, आध्यात्मिक आणि सामाजिक मार्गदर्शन आणि वाण देऊन त्यांचा केलेला सन्मान यामुळे कार्यक्रम संस्मरणीय झाला.

Powered By Sangraha 9.0