अंदाज पावसाचा वाटे खरा असावा...

13 Jun 2018 08:36:10

 

 

यंदा पाऊस उत्तम असणार, अशी सुखवार्ता ऐन उन्हाच्या तडाख्यात ऐकून गार गार वाटलं होतं सार्‍यांनाच. एप्रिलच्या दुसर्‍याच आठवड्यात या वार्ता येणे सुरू झाले होते. स्कायमॅट, अॅक्यू वेदरपासून सार्‍याच विदेशी संस्थांनी हा अंदाज वर्तविला होता. त्याच्या पाठोपाठ मग आपल्या भारतीय हवामान खात्यानेही तोच अंदाज वर्तविला. काय आहे की, पावसाचा अंदाजच असतो अन्‌ तो खराही ठरू शकतो. बहुतांशवेळा तो खोटाच ठरत असतो. त्याचे दाखले अगदी तारीखवारही देता येतात. मागच्या वर्षी, ऑगस्टच्या 21 तारेखपासून पाऊस दणक्यात कोसळणार, असे म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र पाऊस आलाच नाही. झक्कपैकी ऊन पडले होते. आताही 7 ते 10 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. मुंबईत ‘26 जुलै’ पुन्हा होणार, असे सांगण्यात आले होते. आताही ते येणार, पावसाने मुंबापुरी धुवून निघणार, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. मुंबईत 9 आणि 10 ला तर काही वेळ ऊन होते.

प्रत्यक्षात हवामानाचा अंदाज वर्तविणारी यंत्रणा अत्यंत सक्षम असायला हवी. मात्र, त्याची संभावना अजूनही ‘असायला हवी’ या सदरात होते. हवामान म्हणजे केवळ पाऊस नाही, हेही समजून घेतले जायला हवे. जसे पर्यावरण म्हणजे जंगल, झाडे अन्‌ वन्यप्राणी असेच समजले जाते. मानव हादेखील पर्यावरणाचा एक भाग आहे, असे आपण समजतच नाही. आपण मानवी समूहाला पर्यावरणाच्या बाहेरचाच समजून सार्‍याच खेळ्या खेळत असतो. तसेच हे हवामानाचेही. हवामान म्हणजे केवळ पर्जन्यमान नव्हे. पावसाचा अंदाज मात्र कुडमुड्या ज्योतिषापासून गारपगारी या जमातीपर्यंत सारेच वर्तवीत असतात. कावळ्यांनी त्यांची घरटी कुठे बांधली अन्‌ मोरांनी त्यांच्या रहिवासाची दिशा कुठल्या मार्गाने वळविली आहे, तिथवर कसल्याही पद्धतीने पावसाचा अंदाज लावला जात असतो. शेती हा निसर्गाचाच एक भाग वाटत होता त्या काळात तर जनावरांनी एका दिशेला माना वर करून हुंगायला सुरुवात केली की, आर्द्रता तिकडून यायला सुरुवात झाली आहे, असे समजून पाऊस आता येणारच, हे सांगितले जायचे. तसा तो यायचाही. भटक्या जमातीमधील ज्येष्ठांना/ प्रौढांना तर ही नैसर्गिक समजच असते, असा अनुभव येत असतो. ‘‘आमची आजी तर पाऊस येणार की नाही, हे नक्की सांगू शकायची.’’ असा दावा अनेक जण करतात. त्या संदर्भातल्या आठवणीही सांगतात. हे आडाखे आहेत. पर्जन्यमान सामान्य होते तोवर ते खरेही ठरायचे.

आताचा पाऊस हा सामान्य नाही. त्यावर अनेक गोष्टींचा अधिभार आहे. त्यात माणसाच्या अनैसर्गिक जीवनशैलीचा प्रभाव तर खूप मोठा आहे. आपण निसर्गाच्या अगदी विरुद्ध वागायचे ठरवूनच टाकले आहे. आपले निसर्गाशी युद्धच आहे, असे समजून सतत त्यात विजयी होण्यासाठी आपण आक्रमक वागत असतो. ऋतूंच्या वेगळे वातावरण आम्ही आमच्या घरात निर्माण करत असतो. अगदी आभाळाखाली वावरतानाही ऋतू असेल त्यापेक्षा विरुद्ध वातावरण आम्ही आमच्यासाठी तयार करत असतो. त्याला आम्ही ‘एअर कंडिशिंनग’ म्हणतो. ऋतूंच्या तापापासून संरक्षण केले जायला हवे. त्याची सोय निसर्गच करत असतो. आम्ही मात्र त्याच्याही पलीकडे जातो. उन्हाळ्यात शारीरिक उष्णतेची पातळी वाढू नये यासाठी अनेक उपाय आहेत. आम्ही मात्र खोलीचे तापमानच बाहेरच्या तापमानापेक्षा अत्यंत कमी करून बसलो असतो. हिवाळ्यात आम्ही हिटर लावत असतो. त्यामुळे आता पावसाचा नीट अंदाज येण्याचा सहावा सेन्स आम्ही गमावून बसलो आहोत. तरीही अशा अनेक गावठी विधा अजूनही टिकून आहेत. काही ठिकाणी त्यांना श्रद्धेचे स्थान आहे. कुठे घट मांडणी केली जाते, पंचांगांच्या साहाय्याने पावसाचे भाकीत केले जाते. नक्षत्र कुठले, त्याचे गण कुठले, वाहन कुठले यावरून पाऊस कसा पडणार, हे सांगितले जाते.

परंपरागत आणि अत्याधुनिक अशी साधने आहेत, त्यावरून पावसाचा अंदाज लावला जातो. पावसाचा अंदाज लावणे हा आमचा छंद आहे आणि ती आमची गरजही आहे. कारण पावसावर आमचे अर्थकारण कसे राहील, हे ठरत असते. मान्सूनवर शेती कशी होणार, हे ठरते आणि त्यावरून मग ग्रामीण अर्थव्यवस्था कशी राहणार, हेही नक्की होत असते. आता आमची अत्याधुनिक म्हणतात ती साधनेही नेमकी नाहीत. परंपरागत साधनांची शुचिता संपत आलेली आहे. कारण आमच्या नैसर्गिक निष्ठांपासून आम्ही कधीचेच ढळलो आहोत. खासगी संस्थांकडे पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणा नाहीत. वार्‍याची दिशा, वेग आणि हवेचा दाब हे उपग्रहावरून येणारे संदर्भ त्यांच्याकडे नसतात.

खरेतर हे सारेच गणिती समीकरणांवरून ठरत असते आणि बहुतांश वेळा ते खोटेच ठरते. यंदा आता संपूर्ण राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे, असे सांगण्यात येत आहे. मात्र, हा पाऊस मान्सूनचा नसावा, असे वाटते आहे. कारण वादळी वारे आणि इतक्या सोसाट्याने मान्सूनपूर्वच पाऊस येत असतो. मृगात असा पाऊस येत नाही. नैर्ऋत्य मौसमी वारे हे नाहीत. दरवर्षी नैर्ऋत्य मौसमी वार्‍यांनी सुरुवात होत असते आणि वारे ईशान्येकडे जाताना परतीचा पाऊस येत असतो. यंदा नेमके त्याच्या उलट होत आहेे. मात्र, पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मग शेतकरी पेरणीला लागले आहेत. पावसाचा अंदजा फसला की मग ग्लोबल वॉर्मिंगचे कारण दिले जाते. वातावरणात बदल झाला आहे आणि तो केवळ वातावरणातच झाला आहे असे नाही. आधी तो माणसाच्या वर्तणुकीत झाला आहे. त्याच्या जीवनशैलीत, जीवननिष्ठांमध्ये तो आधी झाला. त्याचा परिणाम म्हणून तो वातावरणात बदल झाला. आमच्या गरजाही आम्ही कृत्रिम करून टाकल्या आणि मग त्या भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कृत्रिम साधने निर्माण केली. आधी आम्ही निसर्गाचे दोहन केले आणि मग आता निसर्ग चिरडूनच टाकला आहे.

आता पेरण्या काही ठिकाणी झाल्या आहेत. जे काय कोंब वर आले असतील, येतील, त्यांना आता पाऊस हवा आहे आणि तो येत्या सात दिवसांत येणार नाही, असा अंदाज आहे. काही ठिकाणी पाणी साचले आहे. विहिरींनाही पाणी आले आहे. आता पिके वाचवायची असतील, तर त्यांना अगदी ओलावाच हवा आहे. त्यासाठी मग हातपंपांनी पाणी फवारता येईल. आजूबाजूला साचलेल्या पाण्याचा वापर त्यासाठी केला जाऊ शकतो. मुळात पावसाचा अंदाज वर्तविणारी यंत्रणा अचूक हवी. त्यासाठी ग्राऊंड वेदर सेंसर्सप्रत्येक गावात लावले जायला हवेत. खरेतर प्रत्येक गावात शाळा हे काम करू शकते. आता प्रत्येक गावात इंटरनेट आले आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना ही यंत्रणा कशी हाताळाची हे शिकविले, तर सहज हाताळता येईल अशी ही यंत्रणा आहे. उपग्रहांना ती माहिती नीट पुरविली गेली, तर पावसाचे अंदाज अचूक ठरतील अन्‌ किमान शेतीचे नुकसान होणार नाही. हवाई वाहतुकीसाठी हवामानाचा अंदाज कधीच चुकत नाही. ती यंत्रणा शेतकर्‍यांसाठी का नसते? पर्जन्यमापक यंत्र तर प्रत्येक गावात नव्हे तर प्रत्येक शेतकर्‍याकडेच असायला हवे! ग्राम पंचायतींजवळ ही यंत्रे असतात, मात्र बहुतांश गावांत ती कार्यरत नसतातच.

प्रशासकीय यंत्रणा जागरूक नसणे, हा आता चर्चेचाही विषय राहिलेला नाही. यंदा आधीच शेतकरी हवालदिल आहे. चार वर्षांच्या दुष्काळानंतर तो नव्या मोसमाला सामोरा जातो आहे. रबीच्या हंगामातील पिकांना अद्याप नीट खरेदी नाही. चणा खरेदी तर बंदच करण्यात आली आहे. हा देश उद्योगपतींच्या नावाने ओळखला जावा, इतकी पकड बड्या उद्योगपतींनी घेतली आहे. त्यांना शेती संपवायचीच आहे आणि साराच माल बाहेरून मागवायचा आहे, अशी एक अभ्यासपूर्ण तक्रार केली जाते. एकुणात, शेतीबद्दल असलेली उदासीनता पाहिली की त्यात तथ्य आहे का, असे वाटू लागते. एक मात्र नक्की की, अंदाज चुकवीत का होईना, पाऊस अद्यापही येतो आणि मग उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा बसत असतात त्या खाली बसतात. समस्या कायमच असतात; पण पाऊस आल्याने मुबलक पाणी आहे, असा सुखावह गैरसमज पसरतो आणि प्रशासकीय यंत्रणा सुस्त होतात. गावचे तोडून शहराला पाणी पुरविले जात असते आणि मग अशी सुखवस्तू मंडळीच ‘अंदाज पावसाचा वाटे खरा असावा...’ असे म्हणू लागतात.

Powered By Sangraha 9.0