संवैधानिक देशभक्ती

    दिनांक  13-Jun-2018   

 
प्रणव मुखर्जी यांच्या नागपूर भाषणावर अपेक्षेप्रमाणे टीका-टिप्पणी, अभिप्राय, भाष्य, यांचा पाऊस पडलेला आहे. ते अपेक्षित होते, कारण अनपेक्षितपणे प्रणवदा संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग समारोपासाठी नागपूरला गेले होते. त्यांचे जाणे अनेकांना अनपेक्षित असल्यामुळे धक्कादायक होते. धक्का बसल्यामुळे धक्कादायक विधाने किंवा लेखन येणे अपेक्षितच होते. उदा- एका राजनेत्याने म्हटले, ‘२०१९ साली प्रणवदा यांचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे आणले जाईल. मोदींना पर्याय म्हणून त्यांच्या नावाचा विचार केला जाईल.’ धक्का बसल्यानंतर सूतावरून स्वर्गालादेखील जाता येते, हे मला माहीत नव्हते. या राजनेत्याने सूतावरून स्वर्गाला कसे जाता येते, हे दाखवून दिले. अनेकजणांनी तसे अर्थ काढलेले आहेत. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या संपादकीयात हा विषय आलेला आहे. दिल्लीच्या एका प्राध्यापकाने नेटवरील लेखात हेच म्हटले आहे. धक्का बसल्यानंतर कल्पनाविलास सुरू होतो. पूर्वी माझी अशी समजूत होती की, नशापान केल्यानंतर कल्पनाविलास सुरू होतो. हा समज खोटा ठरला आहे.
 

देशातील एखादा मान्यवर संघाच्या व्यासपीठावर आल्यामुळे संघाची प्रतिष्ठा वाढते, या म्हणण्याला आता काही अर्थ नाही. डॉक्टरांनी जेव्हा संघ सुरू केला तेव्हा संघाचे काम नेमके काय आहे, हे समजून सांगण्यासाठी समाजातील थोरामोठ्यांना डॉक्टरजी बोलवत असत. संघाचे काम जनमान्य होण्यासाठी तेव्हा ते आवश्यक होते. आता संघाचा प्रचारक देशाचा पंतप्रधान आहे. दुसरा स्वयंसेवक देशाचा राष्ट्रपती आहे. एकवीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांपैकी बहुतेक सगळे संघस्वयंसेवक आहेत. राज्यांच्या राज्यपालांची संख्या त्याहून जास्त आहे. आता संघाला प्रतिष्ठा मिळविण्यासाठी कुठल्याही कुबडीची गरज नाही.

 

संघाला समाजापासून वेगळे पाडण्याचा प्रयत्न या देशात झाला. प्रथम गांधी खूनाचा त्यासाठी वापर करण्यात आला. या डावात काही काळ समाज फसला. जशा नव्या पिढ्या येत गेल्या, तशा संघाविषयीच्या धारणा बदलत गेल्या. संघकार्यकर्त्यांनी त्याग, तपस्या, सेवा आणि चारित्र्यबळावर समाजाचा विश्वास संपादन केला. दिवसेंदिवस हा विश्वास वाढत चालला आहे. त्याचा परिणाम भाजपावर मिळणाऱ्या मतांवर होतो. भाजपाला सत्तेवर बसविण्यासाठी जसे संघाचे काम नाही तसे कोणत्याही राजकीय पक्षाचा विरोध करणे हेदेखील संघाचे काम नाही. संघाला संपूर्ण समाजाचे संघटन करायचे आहे, समाजातील विशिष्ट जातींचे किंवा विशिष्ट पंथ संप्रदायाचे संघटन करायचे नाही. हळूहळू समाज हे स्वीकारीत चाललेला आहे. ज्या मंडळींनी संघाला समाजापासून वेगळा करण्याचा प्रयत्न केला तेच सर्व आता समाजापासून दूर जात चाललेले आहेत. संघाला एकाकी पाडण्याऐवजी ही सर्व मंडळी आता स्वतःच एकाकी पडत चालली आहेत. आपण एकाकी का पडत चाललो आहोत, याचे विश्लेषण ते फारसे करीत नाहीत. जी सवय लागली आहे त्याप्रमाणे संघ आणि संघविचारधारेला शिव्या देण्याचे काम ते न थकता आणि न थांबता करीत राहतात. समाजावर याचा उलटा परिणाम होतो. समाज संघाचे चांगले रूप पाहतो. त्यामुळे संघाला शिव्या देणारे त्यांच्या वाणीनेच दूषित होत जातात आणि ते एकाकी पडत जातात. हे एकाकीपण त्यांना सध्या खूप जाणवू लागलेले आहे. समाजाने संघाला जर या गतीने स्वीकारले तर आपले काय होणार? आपली दुकाने कशी चालणार? आपल्या पोटापाण्याचे काय होणार? ही चिंता त्यांना स्वस्थ बसू देत नाही. म्हणून प्रणवदांच्या नागपूरला जाण्याचा विषय त्यांनी प्रमाणाबाहेर मोठा केलेला आहे.

 

नागपूरच्या संघकार्यक्रमात प्रणवदा यांनी केलेले भाषण संघाच्या विद्वेषासाठीच ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना पचनी पडलेले नाही. या नावात अग्रस्थानी मणिशंकर अय्यर यांचे नाव घ्यावे लागते. प्रणवदांच्या भाषणावर त्यांचा लेख आला. तसा तो वाचण्याची काही गरज होती, असे नाही. कारण काही जणांचे लेखन ते न वाचतादेखील आपल्याला समजू शकतात. महाराष्ट्रातील काही संपादकांचा त्यात समावेश करायला हरकत नाही. त्यांच्या लेखाचे शीर्षक वाचावे, लेखात काय असेल ते आपल्याला समजते. त्यामुळे वेळ वाया जात नाही. मणिशंकर अय्यर यांनी लेखात संघाला जेवढ्या लाथा मारता येतील तेवढ्या मारून घेतल्या आहेत आणि प्रणवदांना जेवढ्या टपल्या मारता येतील तेवढ्या मारून घेतल्या आहेत. अशा सगळ्या लेखनाची किंमत लाकडाच्या भुशाएवढीदेखील नसते. लाकडाचा भुसा जाळून उष्णता निर्माण करता येते. या लिखाणाचा त्यासाठी देखील उपयोग नाही.

 

प्रणवदांनी हेच भाषण जर अन्य कुठल्या व्यासपीठावर केले असते, तर एक भाषण म्हणून त्याची जुजबी नोंद झाली असती. माध्यमांनी त्याची दखलही घेतली नसती. प्रणवदांचे हे भाषण कोणत्याही व्यासपीठावर करता येणारे भाषण आहे. हे संघाच्या व्यासपीठावर भाषण झाले, पण भाषणात संघाचा उल्लेख नाही. संघविचारधारेचा उल्लेख नाही. डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरूजी यांचादेखील उल्लेख नाही. संघाच्या विचारधारेवर टीका नाही, त्याची स्तुतीदेखील नाही. संघाच्या शिस्तीबद्दल आणि चारित्र्यनिर्मितीबद्दलदेखील काहीही उल्लेख नाही, हिंदू शब्द नाही. हिंदू संस्कृती असादेखील शब्द नाही. असे नकारात्मक विषय आणखी दाखविता येतील.

 

तरीदेखील, एक संघस्वयंसेवक म्हणून मला हे भाषण उत्तम बौद्धिकवर्ग वाटला. संघात बौद्धिकवर्ग याचा विशिष्ट अर्थ होतो. ज्या भाषणात संघविचार मांडला गेलेला आहे, त्याला बौद्धिकवर्ग म्हणतात. प्रणवदांनी आपल्या भाषणात संघाचा विचार मांडला. त्यांची भाषा संघाची भाषा नाही. मांडणी संघपद्धतीची नाही. त्यांची भाषा काँग्रेस संस्कृतीत जीवन घालविलेल्या एका ज्येष्ठ आणि वयोवृद्ध राजनेत्याची आहे. ही भाषा, काँग्रेसनी स्वातंत्र्यासाठी जी राष्ट्रीय चळवळ चालविली, त्या चळवळीतून आलेली भाषा आहे. स्वातंत्र्यापूर्वीची काँग्रेस ही राजकीय काँग्रेस पार्टी नव्हती. ती राष्ट्रीय काँग्रेस पार्टी होती. तिच्या नावातील राष्ट्रीय शब्दाला तेव्हा तय्यबजी नावाच्या मुस्लिम नेत्याने तेव्हाच आक्षेप घेतलेला होता. काँग्रेसच्या नेत्यांची तेव्हा ही धारणा होती की आपण एक प्राचीन राष्ट्र आहोत आणि आपली चळवळ राष्ट्रीय पुर्नरूत्थानाची आहे.

 

हा राष्ट्रीय विचार कोणता? हे प्रणवदा यांनी नागपूरच्या आपल्या वैचारिक भाषणात अनेक प्रकारचे दाखले देऊन स्पष्ट केले. राष्ट्र, राष्ट्रीयता, देशभक्ती, यांच्या व्याख्या देऊन त्यांनी भाषणाला सुरूवात केली. सुरूवातीलाच त्यांनी राष्ट्र विषय का घेतला असावा? मला वाटते त्याचे कारण असे की, संघाचे काम राजकीय नसून राष्ट्रीय आहे. राष्ट्राचा विचार करणारे आहे. म्हणून राष्ट्राचा विचार कोणता? राष्ट्रीयता कशात आहे? देशभक्तीची आजची परिभाषा कोणती? हे प्रणवदांनी सांगण्याचा प्रयत्न केला. श्रीगुरूजी म्हणत असत की, जे जे कोणी आपल्या प्राचीन राष्ट्रचा प्रामाणिकपणे विचार करतात, ते सामान्यतः आपल्यासारखाच विषय मांडतात. प्रणवदांचे भाषण याचे उत्तम उदाहरण आहे. एका भूभागात भाषा, संस्कृती, यांच्या आधारे राहणाऱ्या जनसमुदयाला राष्ट्र म्हणतात. आपण या राष्ट्राचे घटक आहोत, इतरांपेक्षा आपले वेगळेपण अनेक गोष्टींत आहे, ही भावना जेव्हा प्रबळ होते, तेव्हा तिला राष्ट्रवाद म्हणतात आणि राष्ट्राच्या संस्कृती, सभ्यता, भूप्रदेश, संस्था, याविषयीचा अभिमान याला देशभक्ती म्हणतात. प्रणवदांच्या म्हणण्याचा सामान्यतः हा अर्थ होतो.

 

वसुधैव कुटुंबकम् यावर आधारित आमचा राष्ट्रवाद आहे. ‘सर्वे भवन्तु सुखिनि, सर्वे सन्तु निरामयाि,’ अशी आमची इच्छा असते. सर्वसमावेशकता, सहअस्तित्त्व, बहुविधता, सहिष्णुता, ही आमची वैशिष्ट्ये आहेत. कोणत्याही प्रकारे आमचा राष्ट्रवाद, धार्मिक, प्रादेशिक अथवा बंदिस्त विचारधारांच्या आधारे त्याचप्रमाणे विद्वेष आणि असहिष्णुता याद्वारे जर मांडण्याचा प्रयत्न झाला तर, आमची राष्ट्रीय आत्मियता मलीन होईल. जे काही वेगळेपण दिसते ते वरवरचे आहे, आपण वेगवेगळी ओळख असणारे सांस्कृतिक घटक आहोत, ज्यांचा इतिहास समान आहे. वाङ्मय समान आहे आणि सभ्यतादेखील समान आहे.

 

थोर इतिहासतज्ज्ञ व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो, 'भारतात खोलवरची सांस्कृतिक एकता आहे.' प्रणवदांनी आपल्या भाषणात हा राष्ट्रवाद हजारो वर्षाच्या आपल्या इतिहासातून कशा प्रकारे विकसित झाला, हे सांगितले. मौर्य काळापासून, इंग्रज काळापर्यंतचा ऐतिहासिक आढावा घेतला आणि आधुनिक काळात काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीतून राष्ट्रवाद कसा पुढे आला, हे सांगताना त्यांनी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पं. नेहरू, सरदार वल्लभाई पटेल, यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शेवटी ते राज्यघटना या विषयावर आले. तेव्हा ते म्हणाले, '१९५० साली राज्यघटनेचा अंमल सुरू झाला. ही आमची राज्यघटना, 'केवळ कायद्याची कलमे नसून ती भारताच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाची सनद (मॅग्ना कार्टा) आहे. आमच्या राज्यघटनेतून राष्ट्रवादाचा उदय होतो. भारतीय राष्ट्रवाद ही संवैधानिक देशभक्ती आहे. ज्यात आमच्या विविधतेची जपवणूक स्वतःला सुधारण्याची क्षमता आणि दुसऱ्यांपासून शिकण्याची तयारी असे विषय येतात.'

 

प्रणवदांच्या सर्व भाषणातील Constitutional Patriotism हा शब्दप्रयोग मला फार महत्त्वाचा वाटतो. संवैधानिक देशभक्ती असा त्याचा मराठीत अर्थ होतो. या शब्दाचा उच्चार करेपर्यंत त्यांचे भाषण पूर्णपणे संघाची विचारसरणी मांडणारेच भाषण आहे. ज्यांची हयात संघात गेली, त्यांना या भाषणामध्ये आतापर्यंत संघात न ऐकलेले असे काही आढळणार नाही. शब्दप्रयोग कदाचित वेगळे असतील, परंतु त्यामागचा भाव काही वेगळा नाही. वेगळेपण जर कोणते असेल तर ते प्रणव मुखर्जींच्या मुखातून भाषण आले, हेच वेगळेपण आहे. यापेक्षा वेगळे भाषण करणे त्यांना सहज शक्य होते. संघाला उपदेश करणेही सहज शक्य होते किंवा संघविचारधारा देशाला मारक आहे, असेही म्हणू शकत होते. अशा प्रकारचे त्यांनी जर भाषण केले असते तर, त्यांची आज झाली त्याच्यापेक्षा शंभरपट अधिक प्रसिद्धी झाली असती. परंतु ते त्या मार्गाने गेले नाहीत. त्यांनी सकारात्मक आणि भावात्मक विचार मांडण्याचा प्रयत्न केला. तो का केला असावा? मला असे वाटते की, तो त्यांनी विचारपूर्वक केलेला आहे. त्यांना हे सांगायचे असावे की, संघ म्हणून तुम्ही राष्ट्राचा जो विचार करता तो विचार आणि मी काँग्रेस संस्कृतीत वाढलेला जो विचार करतो तो त्यात विलक्षण साम्य आहे. त्यात संघर्ष नाही, त्यात वेगळेपणा नाही. कम्युनिस्ट लोक राष्ट्र, राष्ट्रीयता, देशभक्ती, वगैरे मानत नाहीत. तसे आमचे नाही. काँग्रेसला या देशाची प्राचीन संस्कृती, प्राचीन जीवनमूल्ये, आणि प्राचीन वैभवकाळ याविषयी आस्था आहे. या सर्वांतूनच आमचा आजचा राष्ट्रवाद उदयाला आलेला आहे. प्रणवदांना हे सांगायचे असेल की, ते सांगण्याची आमची परिभाषा वेगळी आहे. आधुनिक काळात सर्व देशाला त्याच्या विविधतेसहित, मग त्या भाषिक असोत, की धार्मिक असोत, एकत्र ठेवायचे असेल तर ते सर्वमान्य संविधानाने होऊ शकते.

 

म्हणून त्यांनी अत्यंत विचारपूर्वक Constitutional Patriotism या शब्दाचा वापर केलेला आहे. काय त्याचा अर्थ होतो? आमची देशभक्ती जातीमूलक, उपासना धर्ममूलक, वंशमूलक, अथवा इतर कोणत्याही गोष्टीवर आधारित असता कामा नयेत. तिची मुळे संविधानात असली पाहिजेत. हे संविधान काय आहे, हे त्यांनी सांगितलेले नाही. ते आपल्याला समजून घ्यावे लागते. आणि त्यातून संविधानमूलक देशभक्ती किंवा राष्ट्रवाद कसा काय निर्माण होतो याचा विचार करावा लागतो. आपले हे संविधान स्वातंत्र्य आंदोलनाचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणून आपल्यापुढे येते. या स्वातंत्र्य आंदोलनात जातीमुक्त समाज, अस्पृश्यतामुक्त समाज, उपासना स्वातंत्र्य असलेला समाज, विविधतेचा सन्मान करणारा समाज, जागतिक भातृभाव मनात ठेवणारा समाज, ही सर्व जीवनमूल्ये आलेली आहेत. त्याचे प्रतिबिंब आपल्या संविधानात दिसते. आपले संविधान सहमतीने तयार झालेले आहे. ही सहमती वर दिलेल्या सर्व बाबतीतील आहे, तिला राष्ट्रीय सहमती म्हणतात. देशभक्ती म्हणजे या संविधान सहमतीवर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून सर्व व्यवहार करणे होय. मग हे व्यवहार सामाजिक असोत की राजकीय असोत. संविधानमूलक देशभक्ती याचा अर्थ असा करावा लागतो.

 

जेव्हा आपण संघविचारधारेचा विचार करतो तेव्हा संघाच्या कामाचा मूलाधारच जातीपातीविरहित समाज, अस्पृश्यतामुक्त समाज, विविधतेची जपणूक करून त्यात एकता शोधणारा समाज आहे, हे लक्षात येते. प्रणवदा यांच्या भाषणापूर्वी सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे भाषण झाले. मोहनजींनी अनेकता ही भारताची ओळख आहे. भाषा, संप्रदाय यांची विविधता, वेगळ्या राजकीय विचारसरणी फार पूर्वीपासून आहेत. आपली विविधता जपत, दुसऱ्यांच्या विविधतेचे स्वागत करीत, सन्मान करीत, मिळून मिसळून राहायचे आहे. भारतात जन्मलेले सर्वच आमचे आहेत. आपण सर्वांनी मिळून भारताला गौरव प्राप्त करून देण्यासाठी झटले पाहिजे.

 

संघाला हिंदू समाज संघटीत करायचा आहे, दुसऱ्यावर आक्रमण करण्यासाठी नाही, तर सर्व जगातील मानवांना सुखाचा मार्ग दाखविण्यासाठी करायचा आहे. वसुधैव कुटुंबकम् हा संघाचा जीवनमंत्र आहे. नागपूरच्या कार्यक्रमात जे व्यक्तिगत गीत झाले, त्याचे शब्द होते,

‘वसुंधरा परिवार हमारा हिंदू का यह विशाल चिंतन, इस वैश्विक जीवन दर्शन से मानवजाती होगी पावन’

गेली कैक दशके हे गीत संघस्वयंसेवक गातात. याचा अर्थ असा झाला की, प्रणवदा जो राष्ट्रवाद सांगतात आणि त्याला संविधानाचा आधार घेतात, तो विषय संघस्वयंसवेक आपल्या रोजच्या जीवनात जगतच असतो. त्याला या विषयावर भाषण देता येणार नाही किंवा आपण आपल्या संघजीवनात संविधानाचा आत्माच जगत असतो, हे ही त्याला आकलन होते असे नाही. परंतु ही वास्तविकता आहे.

 

यातून एक जी वास्तविकता समोर येते, ती मांडून या लेखाचा समारोप करतो. वास्तविकता अशी आहे की, प्रणवदा यांनी मांडलेला काँग्रेसचा राष्ट्रीय विचार आणि याच कार्यक्रमात मोहनजी भागवत यांनी मांडलेला संघाचा राष्ट्रीय विचार याच्या आत्मतत्त्वात काही अंतर नाही. भाषेत अंतर आहे, अभिव्यक्तीत अंतर आहे, आशयात अंतर नाही. तरीदेखील समाजजीवनात संघ आणि काँग्रेस ही प्रचंड दरी आहे. देशाला ती चांगली नाही आणि राष्ट्रालादेखील ती चांगली नाही. भाजपा आणि काँग्रेसमधील राजकीय स्पर्धा सत्तेसाठी आहे. लोकशाहीत ती चालू राहणार. त्या दोघांचे मिलन होणे संसदीय लोकशाहीत शक्य नाही. ते दोघेही एकमेकांच्या उकाळ्यापाकाळ्या काढत बसणार. पण या दोघांपेक्षाही राष्ट्र मोठे आहे. या दोघांपेक्षाही राष्ट्रीय विचार मोठा आहे. राजकीय हाणामारीत अनेक वेळा राष्ट्रीय विचार मागे पडतो, त्यावर अंधाराचे ढग गोळा होतात. प्रणवदांनी हे अंधाराचे ढग दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. बाकी कुणी कसलाही विचार करो, पण ज्यांना राष्ट्राचा विचार करायचा आहे आणि राष्ट्राच्या वैश्विक ध्येयवादाचा विचार करायचा आहे, त्यांनी प्रणवदांच्या भाषणाचा गंभीर विचार करून आपल्या मांडणीमध्ये तो विषय कसा आणता येईल, याचे चिंतन केले पाहिजे.