लायन्स क्लब करणार वनवासी महिलांच्या विकासासाठी काम

13 Jun 2018 21:19:12

 
नाशिक : 'शहरी भागातील महिलांप्रमाणेच ग्रामीण भागातील आणि वनवासी महिलांच्या विकासासाठी ’लायन्स क्लब’च्या माध्यमातून कार्य केले जाईल,” असे प्रतिपादन क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी केले आहे. ’लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट’चा पदग्रहण समारंभाप्रसंगी वानखेडे बोलत होते. हा समारंभ माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष एमजेएफ डॉ. राजू मनवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत बालाजी लॉन्स, गंगापूर रोड येथे पार पडला. यावेळी सचिव जयोम व्यास व खजिनदार डी. एस. पिंगळे यांनीदेखील पदभार स्वीकारला. सोबतच इतर नूतन सदस्यांनी शपथ घेत सदस्यत्व स्वीकारले. माजी जिल्हा प्रशासक एमजेएफ विनोद कपूर यांनी नवीन कार्यकारिणीस शपथ दिली.
 

प्रतिवर्षी ’लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट’च्या वतीने लोकसेवेसाठी विविध उपक्रम राबविले जातात. हीच परंपरा पुढे नेत, यावर्षी महिला विकास आणि त्यांचे आरोग्य यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यात घर काम करण्याऱ्या सुमारे एक हजार महिलांसाठी नियमित आरोग्य शिबिर, वनवासी आणि झोपडपट्टी भागात सॅनिटरी नॅपकिनचे वाटप, स्वयं रोजगारासाठी शिलाई मशीनचे वाटप, स्तनांचा कर्करोग रोखण्यासाठी आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. सोबतच पर्यावरणसंवर्धन, प्रदूषणमुक्ती, अवयवदान, ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर काम करणार असल्याची माहिती वानखेडे यांनी यावेळी दिली. या कामाची ‘ब्ल्यू प्रिंट’ त्यांनी यावेळी सादर केली. यामध्ये पर्यावरणसंवर्धनासाठी कागदाचा वापर पूर्णपणे बंद करण्यासाठी विशेष भर दिला जाणार आहे. प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषणनियंत्रक यंत्र बसविणे हा या वर्षातील मोठा आणि महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. क्लबच्या वतीने या वर्षात विविध विषयांवर कार्यशाळा, शिबिरे, व्याख्याने घेतली जाणार आहेत. समाजात मधुमेहाचा वाढता धोका लक्षात घेता लोकांमध्ये या विषयावर जागृती मोहीमदेखील राबविली जाणार आहे. सोबतच स्वच्छ भारत अभियान, सूर्य नमस्कार, डोळे तपासणी आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

 

यावेळी मावळते अध्यक्ष के. डी. पाटील यांनी यांनी मागील वर्षी राबविण्यात आलेल्या सामाजिक कार्यांचा अहवाल याप्रसंगी सादर केला. कार्यक्रमास विनय बिरारी, एमजेएफ, विलासराव पाटील, उद्धव अहिरे, सुनील निकुंभ, मंगेश शेंडे, लक्ष्मण लांडगे, रवींद्र दुसाने, विलास बिरारी, उदय कोठावदे, कैलास पवार, सतीश मालुंडे, ’अशोका विल्डकॉन’चे व्यवस्थापकीय संचालक अशोक कटारिया, ’खाबिया ग्रुप’चे आणि नाशिक सायकलिस्ट अध्यक्ष प्रवीण खाबिया आदींसह क्लबचे सदस्य उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0