कट्टरवाद्यांचा पगडीवर राग

    दिनांक  13-Jun-2018   

 

 
शीख समुदायासाठी अभिमानाचा, जीवाभावाचा आणि महत्त्वाचा विषय म्हणजे डोक्यावर वाढवलेले केस आणि त्यावर असलेली पगडी. पण या वाढवलेल्या केस आणि पगडीमुळेच पाकिस्तानमधील शीख समुदायाला भीतीच्या सावटाखाली, जीव मुठीत धरून जगावे लागत असल्याच्या धक्कादायक घटना घडल्याचे नुकतेच उघड झाले. वाढवलेले केस व त्यावरील पगडीमुळे पाकिस्तानच्या पेशावरमध्ये धर्मांध कट्टरपंथी आणि धर्मप्रेमी शीख बांधव यांच्यात संघर्ष सुरू असून, आतापर्यंत याची झळ हजारो शीख बांधवांना बसल्याची माहिती समोर आली आहे.
 

पेशावरमधील परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून तर एवढी गंभीर झाली की, शीख समुदायाच्या लोकांना कट्टरवाद्यांच्या अत्याचार, दडपशाही व दंडेलीला वैतागून, देशातल्याच अन्य भागांत पलायन करावे लागले. आतापर्यंत इथल्या ३० हजार शीख बांधवांपैकी सुमारे ६० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी पलायन केले असून, पाकिस्तानातल्याच अन्य भागात आश्रय घेतला आहे. आपला संघर्ष धर्मासाठीच असल्याचे आणि आपण अधर्माच्या विरोधात असल्याचे सांगणाऱ्या कट्टरवाद्यांनी काही दिवसांपूर्वी इथे हैदोस घालत, एका शीख धर्मगुरुचीही गोळ्या घालून हत्या केली. या सर्वच प्रकारामुळे इथल्या शीख समुदायाची अवस्था बिकट झाल्याचे लक्षात येते. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार इथली स्थिती अशी झाली आहे की, इथे राहणाऱ्या शीख समुदायाला आपली ओळख लपवण्यासाठी केस कापून, पगडी काढावी लागत आहे.

 

२० वर्षीय पालदीप सिंह याने याबद्दल सांगितले की, माझा स्वतःच्या धर्मावर अतूट विश्वास आहे, पण मी मरू इच्छित नाही. यासाठी मी केस कापले व पगडी घालणे सोडून दिले. कट्टरवाद्यांच्या हल्ल्यांवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानमधील शीख समुदायाचे प्रवक्ते बाबा गुरपाल सिंह यांनी आरोप केला की, येथे शिखांचा ठरवून नरसंहार केला जात आहे. गुरपाल सिंह यांच्या आरोपावरुन हे प्रकरण अधिकच गंभीर असल्याचे आणि त्यांचा इशारा थेट शीख वंशविच्छेदाकडेच असल्याचे म्हणावे लागेल. पाकिस्तानमधील शीख समुदायासाठी कार्य करणाऱ्या शीख कौन्सिलच्या सदस्याने सांगितले की, आमच्या समुदायाचा केवळ आम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे दिसतो, म्हणूनच संहार केला जातो. यावरून इथल्या कट्टरवाद्यांना शिखांचे मुसलमान नसणे चांगलेच खुपत असून, त्याची शिक्षा म्हणून त्यांचा जीवच घेण्याचा अमानुष खेळ खेळला जात असल्याचे दिसते. हा प्रकार भयानक असून, याकडे जागतिक समुदायाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. कौन्सिलचे अन्य एक सदस्य बलबीर सिंह यांनी तर आपल्या डोक्यावरील पगडीकडे इशारा करत म्हटले की, 'ही' तुम्हाला सहजासहजी त्यांची शिकार बनवते.' शीख सुमदायातील काही लोकांचे असेही म्हणणे आहे की, तालिबान ही दहशतवादी संघटना अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांची हत्या करत आहे आणि त्यांचे म्हणणे हे खरे असल्याचे काही घटनांवरून पटते.

 

एकीकडे तालिबान आणि कट्टरपंथी धर्मांधांनी शीख समुदायाला जगणे असह्य केले असतानाच दुसरीकडे स्थानिक पोलिसांकडूनही शीख व हिंदू समुदायालाच लक्ष्य केले जाते. २०१६ साली पाकिस्तान-तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे खासदार आणि शीखसमुदायाचे नेते सोरन सिंह यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हत्येची जबाबदारी तालिबानने घेतलीदेखील, तथापि तालिबानने त्यांच्या हत्येची जबाबदारी घेऊनही स्थानिक पोलिसांनी आपला शीख व हिंदू समुदायात फूट पाडण्याचा कावा करत, त्यांच्या हत्येच्या आरोपावरून सोरन सिंह यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि अल्पसंख्याक हिंदू नेते बलदेव कुमार यांनाच अटक केली. त्यानंतर जवळपास दोन वर्ष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी चालली. शेवटी पुराव्यांअभावी न्यायालयाने बलदेव कुमार यांना निर्दोष मुक्त केले आणि अशा प्रकारे स्थानिक पोलिसांचा शीख व हिंदू समुदायात संघर्ष भडकावण्याचा डाव हाणून पाडला गेला.

 

पेशावरमध्ये हे सगळे घडत असताना पाकिस्तान सरकारनेही झोपेचेच सोंग घेतल्याचे त्याच्या शांत बसण्याच्या वृत्तीवरुन दिसून येते. स्थानिक माध्यमात आलेल्या वृत्तांनुसार पाकिस्तान सरकार गेल्या कित्येक वर्षांपासून कट्टरवाद्यांच्या उपद्रवाने त्रस्त असलेल्या शीख समुदायाला पाठिंबा आणि संरक्षणाची गरज असल्याची गोष्ट नजरेआड करत आहे. त्याचमुळे त्यांना पेशावरमधून पलायन करावे लागत आहे.

 

पेशावरमधील शीख समुदायावरील हल्ले, अत्याचार आणि अडचणींचा पाढा इथेच संपत नाही. इथल्या शीख समुदायासाठी तर मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीचीदेखील व्यवस्था नाही. खैबर पख्तुनख्वा सरकारने स्मशानाच्या उभारणीसाठी गेल्यावर्षी आर्थिक निधी दिला होता, पण अजूनही त्याचे काम सुरू झालेले नाही. इतकेच नाही, तर आता स्मशानासाठी अधिकृत केलेली जागा खासगी बँक, मंगल कार्यालये व खासगी कंपन्यांना दिली जात आहे. एकूणच या सर्वच प्रकरणांवरून पेशावरमधील शीख समुदाय वाईट स्थितीत जीव जगत असल्याचेच स्पष्ट होते.