आडणे भिनार मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे

    दिनांक  12-Jun-2018 

खानिवडे : वसई तालुक्यातील पूर्व भागात गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत खराब स्थितीत असलेल्या रस्त्याचे काम चालू झाले असून खडीकरण झाल्यानंतर डांबरीकरण करणे चालू आहे. मात्र, रस्त्याचे झालेले हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्याला कारणही तसेच आहे. या मार्गावरून वाहतूक करणारा एक ट्रक डांबरीकरणाच्या कडेचा रस्ता खचल्याने उलटला. ही घटना ताजी असताना काही तासांच्या अंतराने सदर रस्त्यावरून जाणारा दुसरा एक ट्रक रोडवरच रुतल्याने येथील नागरिक रस्त्याच्या कामाबद्दल करत असलेल्या आरोपाला पुष्टी मिळत आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या भालिवली निंबवली मार्गातील सदर रस्ता मागील दोन वर्षांपासून खराबच होता. त्या मार्गाची मलमपट्टी करण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, होत असलेले हे काम सुमार दर्जाचे असल्याचा येथील नागरिक आरोप करत आहेत.
 
 

रस्त्याचे काम कुठेही खराब किंवा निकृष्ट दर्जाचे झाले नसून येथून वाहतूक करणारी भारयुक्त वाहने ही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून म्हणजेच क्षमतेपेक्षा कैक पट अधिक भार घेऊन वाहतूक करत असल्याने व रस्त्याला साईड पट्टी नसल्याने सदर हायवा उलटला. सदर अंतर्गत रस्त्याची क्षमता १० ते १५ टन वजनी वाहतुकीची असताना ३० ते ५० टन भार घेऊन वाहने चालत असतील तर रस्ता टिकेल कसा?

-पोट ठेकेदार, चेतन नाईक.