शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : चंदना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018   
Total Views |

 
 
एक छोटंसं गाव, त्यात एक टुमदार घर, घनदाट झाडी, हिरवळ आणि गावाची मजा. विचार करुनच कित्ती छान वाटतं नाही. हे सगळं तुम्हाला अनुभवायला मिळेल या लघुपटात. या लघुपटाचं नाव त्यातील प्रमुख नायिकेच्या नावावर आहे. तिचं नाव आहे, चंदना. एक अत्यंत हुशार मुलगी. अभ्यासात पहिल्या क्रमांकावर. तिची छोटी बहीण चंद्रा, आणि आई. हेच काय ते तिचं विश्व. चंदना खरं तर खूप दिसायलाही खूप सुंदर. त्यामुळे वयात आल्यावर तिच्यासाठी तिच्या आईची काळजी देखील साहजिकच आहे. अशा या चंदनाचा शिक्षणासाठी केलेला संघर्ष म्हणजे हा लघुपट.
 
आजही गावाकडे मुलींच्या शिक्षणासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. आई वडील सुरुवाती पासूनच तिच्या लग्नासाठी पैसा साठवतात, मात्र तिच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची त्यांची तयारी नसते. अशा परिस्थितीत एका कष्टाळू एकट्या आईने तिच्या दोन्ही मुलींना शिकवण्याचा निर्णय घेतला, प्रसंगी गावकऱ्यांना झुगारून ती त्यांच्या शिक्षणासाठी उभी राहिली आणि त्यामुळे निर्माण झाली चंदना. मात्र शेवटी ती वयात आल्यानंतर तिच्या रुपामुळे तिने पुढे शहरात शिक्षण घेऊ नये असे तिच्या आईचे मत होते, आणि इथेच या लघुपटाला वेगळे वळण मिळते. चंदनाला शिकायचे असते, आणि तिच्या आईला तिचे लग्न करायचे असते. दुसऱ्या दिवशी चंदनाला बघायला मुलगा देखील येणार असतो. आई सकाळी उठून बघते तर काय? चंदना घरात नाही? अरे देवा.... ही घर सोडून गेली का काय? चंदनाची आई घाबरते.. हाका मारते, चंद्रा गावभर शोधते मात्र चंदना काही सापडत नाही.. पुढे काय होतं? चंदना परत येते? तिला शिक्षणाची संधी मिळते? का तिचं लग्न होतं? जाणून घेण्यासाठी नक्कीच बघा हा लघुपट.
 
 
 
 
या लघुपटाची सुरुवात सुंदर अशा एका पार्श्वसंगीतापासून होते. ते संगीत ऐकूनच आपल्याला पुढील लघुपट बघण्याची इच्छा नक्कीच होते. गावाची हिरवळ, पावसाळी वातावरण आणि सुंदर दृश्य आपलं लक्ष नक्कीच आकर्षित करतात. त्यातून यामध्ये काम करणारे सर्वच कलाकार नवीन आहेत, त्यांचा अभिनय ताजा तवाना वाटतो, त्यामुळे बघण्यास आणखी उत्सुकता निर्माण होते.
 
या लघुपटाला यूट्यूबवर २६ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. सागरिका दास यांनी दिग्दर्शित केलेल्या या लघुपटात अश्विनी गिरी, मीरा जोशी आणि सुखदा बोरकर यांनी मुख्य भूमिका निभावल्या आहेत. एकदा तरी अवश्य बघावा असा हा लघुपट आहे.
 
- निहारिका पोळ
@@AUTHORINFO_V1@@