संघाच्या मानहानीवरून राहुल गांधी यांच्यावर न्यायालयात दोषारोप

    दिनांक  12-Jun-2018भिवंडी :
महात्मा गांधी यांची हत्या ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घडवून आणली होती, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भिवंडी न्यायालयात दोषारोप सिद्ध झाला आहे. राहुल गांधी यांनी बिनबुडाचे आरोप करत संघाला बदानाम करण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून न्यायालयाने भा.द.सं.च्या कलम ४९९ आणि ५०० नुसार राहुल गांधी यांना दोषी ठरवले आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी ही १० ऑगस्टला करण्यात येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.


दरम्यान राहुल गांधी मात्र आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. न्यायालयामध्ये गांधी यांना आपला गुन्हा मान्य आहे का ? अशा प्रश्न विचारला असता, गांधी यांनी तो नाकारला. यानंतर त्यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी या खटल्यासंबंधी दाखल केलेल्या याचिकेवर प्रश्न विचारला असता, तो देखील त्यांनी नाकारला. २०१५ मध्ये भिवंडी न्यायालयातील आपल्यावरील खटला रद्द केला जावा म्हणून राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु न्यायालयाने ती याचिका रद्द केली होती. याविषयी राहुल यांना विचारले असता ते देखील त्यांनी अमान्य केले. त्यामुळे कलम २९४ अंतगर्त कुंटे यांच्याकडून त्यांना एक नोटीस पाठवण्यात आली असून या संबंधीची पुढील सुनावणी १० ऑगस्ट करण्यात येणार आहे.
 
 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी भिवंडी येथील सभेत गांधी हत्येसाठी संघाला दोषी ठरवले होते. गांधी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर संघाचे भिवंडीमधील स्वयंसेवक राजेश कुंटे यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. यासाठी म्हणून न्यायालयाने अनेक वेळा राहुल गांधी यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. परंतु प्रत्येक वेळी त्यांनी तब्येतीची आणि पक्षाच्या कामाची सबब देत न्यायालयात उपस्थित राहणे टाळले होते.


यानंतर कुंटे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्य संबंधी केलेला दावा सिद्ध झाल्यानंतर  न्यायलयात राहुल गांधी यांच्या वकिलांना न्यायालयाने समज दिली होती व गांधी यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.  त्यामुळे आजच्या सुनावणीसाठी म्हणून ते न्यायालयात उपस्थित झाले होते. यावेळी राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपामध्ये कसल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे सांगत न्यायालयाने त्यांना दोषी घोषित केले व वरील कलमांतर्गत दोषारोपपत्र दाखल केले.