बीड-लातूर विधानपरिषदेत भाजप सुरेश धस विजयी

    दिनांक  12-Jun-2018

राष्ट्रवादी पुरस्कृत अशोक जगदाळे यांचा अवघ्या चाळीस मतांनी परभाव 
बीड : गेल्या १५ दिवसांपासून प्रलंबित असलेल्या उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकाचे निकाल अखेर आज जाहीर झाले असून अमरावती आणि चंद्रपूरनंतर आता लातूर-बीडची जागा देखील भाजपच्या खात्यात जमा झाली आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांच्या ही प्रतिष्ठेचा मुद्दा बनलेल्या या निवडणुकीत भाजपच्या सुरेश धस यांनी बाजी मारली असून राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांचा निर्णायक पराभव केला आहे. त्यामुळे बीड-लातूरमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


लातूर-बीड विधानपरिषदेतील १० अपात्र नगरसेवकांच्या मतांवर औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंतर आज सकाळी या जागेवरील मतदानाची मोजणी सुरु करण्यात आली. पाच टेबलांवर एकाच फेरीत ही मतमोजणी करण्यात आली होती. यामध्ये या १० अपात्र नगरसेवकांची मते देखील ग्राह्य धरण्यात आली होती. या मतमोजणीमध्ये सुरुवातीला जगदाळे हे आघाडीवर होते. परंतु सर्व टेबलांवरची मते एकत्र केल्यानंतर धस यांनी ४० मतांची निर्णायक आघाडी घेतली व त्यानंतर थोड्या वेळात धस यांना विजयी घोषित करण्यात आले. धस यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान जगदाळे यांनी मात्र फेरमतमोजणी करण्याची मागणी केली आहे. तसेच यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचेही म्हटले आहे.

धनंजय मुंडेना धक्का

दरम्यान ही निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. भाजपचे नेते आणि पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती समजले जाणारे रमेश कराड हे निवडणुकांच्या काही काळ अगोदर राष्ट्रवादीमध्ये सामील झाले होते. कराड यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा दावा अनेक जण करत होते. यानंतर राष्ट्रवादीकडून कराड यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. परंतु ऐनवेळी कराड यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी आणि धनंजय मुंडे यांची चांगलीच गोची झाली. त्यामुळे नाईलाजाने ऐनवेळी राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार असलेल्या जगदाळे यांना आपला पाठींबा जाहीर केला होता. परंतु जगदाळे यांचा देखील पराभव झाल्यामुळे मुंडेंसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

 
गेल्या महिन्यातील २१ तारखेला राज्यातील सहा विधान परिषद जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. मात्र यातील फक्त पाचच जागांचे निकाल त्यांनतरच्या २४ तारखेला जाहीर करण्यात आले होते. लातूर-बीडमधील १० नगरसेवकांना राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी अपात्र घोषित केल्यामुळे त्यांची मते ग्राह्य धरली जावी का नाहीत ? या प्रश्नामुळे लातूर बीड जागेचा निकाल पुढे ढकलण्यात आला होता. यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर ती १० मते ग्राह्य धरून मतमोजणी करण्यात आली.