काबुलमध्ये एकाच दिवसात दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले

    दिनांक  11-Jun-2018


काबुल :
अफगाणिस्तानमध्ये होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत निघाले असून आज एका दिवसात अफगाणिस्तानमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत. यातील एक हल्ला अफगाण मंत्रालयाबाहेर झाला असून या हल्ल्यांमध्ये एकूण २६ नागरिकांचा मृत्यु झाला आहे. तसेच ३५ जण गंभीररीत्या जखमी झाले असून मृतांमध्ये मोठ्या प्रमाणात सैनिकांचा समावेश आहे. दरम्यान हल्ल्यांची जबाबदारी तालिबानने घेतली आहे.

आज सकाळी तालिबान्यांनी सर्वात प्रथम जलालाबाद येथे तैनात असलेल्या अफगाण लष्कराच्या एका तुकडीवर हल्ला केला. यामध्ये एकूण १५ सैनिकांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीररीत्या जखमी झाले. या हल्ल्याची बातमी देशभर पसरत असतानाच राजधानी काबुलमधील ग्रामीण विकास मंत्रालयाच्या इमारतीबाहेर तालिबान्यांनी दुसरा अतिरेकी हल्ला केला. यामध्ये मंत्रालयाच्या बाहेर अतिरेक्यांकडून आत्मघातकी हल्ल्यामार्फत स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात एकूण ११ नागरिकांचा मृत्यू झाला तर ३१ जण जखमी झाले.


दरम्यान या दोन्ही हल्ल्यानंतर अफगाण सरकारकडून नागरिकांच्या मदतीसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. अफगाण राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी या हल्ल्यांचा निषेध केला असून मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. तसेच नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत पुरवली जावे, असे देखील आदेश त्यांनी दिले आहेत.