वरळी-बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची धुरा टाटाकडे

01 Jun 2018 23:04:59



मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या बीडीडी चाळीचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाठी आवश्यक असणारी निविदा सादर करण्यामध्ये टाटा कंपनी अग्रेसर ठरली आहे. त्यामुळे या कंपनीची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या नायगाव आणि ना. म. जोशी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. एप्रिल २०१७ मध्ये या चाळीच्या पुनर्विकासासाठी जागतिक स्तरावर निविदा मागवण्यात आल्या होत्या. दोन चिनी व लेबनॉनच्या कंपनीच्या निविदांची तांत्रिक पातळीवर छाननी सुरू असताना शापूरजी पालनजी या कंपनीने निविदांबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणीत शापूरजी पालनजी कंपनीला निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. म्हाडाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मागील काही महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. निविदा सादर करताना सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी आल्याचा दावा शापूरजी पालनी कंपनीने केला होता; पण इतर कंपन्यांना निविदा सादर करताना कोणतीही अडचण आली नाही, याकडे म्हाडा व संबंधित सॉफ्टवेअर कंपनीने न्यायालयाचे लक्ष वेधले. सर्वोच्च न्यायालयाने म्हाडाचे म्हणणे ग्राह्य धरले. त्यामुळे शापूरजी पालनजी कंपनीला निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, हे स्पष्ट झाले.

Powered By Sangraha 9.0