पांडुरंग फुंडकर अनंतात विलीन

    दिनांक  01-Jun-2018

 
बुलढाणा : राज्याचे दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या पार्थिवावर आज बुलढाणा येथे त्यांच्या राहत्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये शासकीय इतमामात फुंडकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी राज्य सरकार आणि विधी मंडळातील सर्व नेते मंडळी देखील याठिकाणी उपस्थित होते.

काल दुपारी फुंडकर यांचे पार्थिव त्यांच्या खामगाव येथील निवास्थानी आणण्यात आलेले होते. यानंतर नागरिकांच्या दर्शनासाठी म्हणून त्यांचे पार्थिव निवास्थानी ठेवण्यात आले. यानंतर आज सकाळी ८ वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यामधून त्यांचे समर्थक त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आले होते. दुपारी ही अंत्ययात्रा सिद्धीविनायक टेक्निकल कॅम्पसच्या परिसरात आणली. याठिकाणी पुन्हा थोड्यावेळासाठी म्हणून फुंडकर यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याठिकाणी येऊन फुंडकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यानंतर फुंडकर यांना २१ फैरींची सलामी देण्यात आली व त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले.

'भाऊसाहेब यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, त्यांना न्याय देण्याकरीता सतत कार्य केले. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी भाऊसाहेबांनी संसद, विधान परिषद, विधान सभा आणि रस्त्यावर आंदोलनांच्या माध्यमातून रान पेटविले. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात शेती आणि शेतकरी हाच घटक केंद्रस्थानी राहीला. अशा शेतकऱ्यांच्या कैवारी असलेल्या नेतृत्वाला आज महाराष्ट्र मुकला आहे,' अशा भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्या.