काऊिंचग : नैसर्गिक मोहाची विकृती

    दिनांक  09-May-2018   
गेल्या काही दिवसांत कास्टिंग काऊच या प्रकाराची चर्चा पुन्हा उफाळून आली. मागच्या वर्षीच्या डिसेंबरात हॉलिवूडमध्ये हा विषय उसळला. आपण आपल्या नैतिकतांचा डंभाचारच करत असतो. पाश्चात्यांच्या खुल्या वागण्याला स्वैर ठरवित असतो. तिकडे मात्र अशा काही विषयांना विलक्षण आरस्पानीपणानं भिडण्याची ताकद आहे. आमच्या नैतिकतेच्या कल्पना, त्यावरची विचार आणि कृती यांत फार म्हणजे फारच फरक आहे. आम्ही सार्वजनिक रीत्या फारच उच्च कोटीच्या विचारांचे प्रदर्शन करत असतो आणि एकांतात आम्ही स्वैर असतो, भ्रष्ट असतो. समाजाची खरी नैतिकता त्या समाजातील व्यक्तींच्या एकांतातील वर्तनावर ठरत असते. त्या पातळीवर आम्ही कुठे आहोत, हे ठरविण्याचे मापदंड म्हणजे काऊिंचग... ते आमच्या नैसर्गिक सहज प्रवृत्तीनं आलेलं आहे. मोह हादेखील नैसर्गिकच भाव आहे. खूप साहजिक आहे. सार्‍यांनाच मोह होत असतो. त्यातूनच भ्रष्टाचार आणि अनाचार जन्माला येतो. लाच म्हणून पैसा देण्याची कुणाचीच इच्छा नसते पण तरीही तो अगदी सहज आनंदाने देतो आहे, असेच दर्शवित असतो. कारण त्याला कापले कार्य साध्य करून घ्यायचे असते. नियमात बसवायचे असते. शासकीय वेळेच्या आधी ते करून घ्यायचे असते. सर्वांच्या आधी साध्य करायचे असते आणि मग म्हणून लाच दिली जाते. बर्‍याचदा ती घेणार्‍यापेक्षा देणार्‍याच्या बाजूनेच ऑफर केली जाते. लाच घेणे हा जसा मोह आहे तसाच तो देणेही आहेच... अनाचाराचेही तसेच आहे. कॉंप्रमाइज करविणार्‍या इतकेच करणाराही त्यासाठी उत्सूक असल्याशिवाय ते होत नाही. नैतिकतेच्या पातळीवरून खाली येण्यासाठी सारख्याच पायर्‍या दोघांनाही खाली यावे लागते. समपातळीवर आल्याशिवाय दोन व्यक्ती सारखा भोग घेऊच शकत नाहीत...
 
 
हॉलिवूडचा निर्माता हर्वी वाइन्स्टीन याच्यावर एलिसा मिलानो या तिकडच्या अभिनेत्रीने कास्टिंग काऊच म्हणजे यौन शोषणाचा आरोप केला. त्यानंतर जेनिफर लोपेझ, करा डेलिविंग्ने, ग्वैनेथ पेल्ट्रो अशा अनेक अभिनेत्रींनी तिला साथ दिली. हॉलिवूडच्या या शोमॅनची नंतर घसरण सुरू झाली. तिकडे अशा प्रकारांवरही खुली चर्चा होते. कुणाच्या दबक्यांत कुणी राहत नाही. दरवर्षीच्या ऑस्कर सोहळ्यांतही अशा काही प्रकरणांची भरपूर खिल्ली उडविली जाते आणि विकृतींवर प्रहार केले जातात. यावर्षीही लॉस एंजलिसच्या जिजस आणि जोशुआ या स्ट्रीट कलावंतांच्या जोडीने ऑस्कर सोहळ्याच्या स्ट्रीटवर हर्वी वाइन्स्टीन याचा सोनेरी पुतळा तयार केला होता, सोफ्यावर नाईट गाऊन घालून बसलेला. सोफा म्हणजे काऊच. कुण्या व्यक्तीला मोठे काम द्यायचे असेल तर निर्माता किंवा एखाद्या बड्या कंपनीचा मालक, कॉर्पोरेट बॉस त्याच्या आलिशान कक्षांत असलेल्या सोफ्याकडे निर्देश करून ‘ती’ मागणी सूचित करतो. कास्टिंग करण्यासाठी तशा संबंधांची मागणी करण्यासाठी काऊच म्हणजे सोफ्याकडे कटाक्ष टाकून मागणीचे सूचन केले जाते, म्हणून ते कास्टिंग काऊच... म्हणून हर्वीचा नाइट गाऊन घालून असलेला सोफ्यावर बसलेला पुतळा तयार करण्यात आला.
 
या प्रकरणानंतर तिकडे काय झाले? हलिसा मिलानो या नटीला नंतर कामे मिळणे बंद झाले. ती आता तिच्या अस्मितेची लढाई कोर्टात लढते आहे. सुरुवातीला ‘मी-टू’ म्हणत खूपसार्‍या जणी तिच्या पाठीशी उभ्या झाल्या, मात्र आता ती तिचा लढा एकटीच लढते आहे. तिने समोर येऊन लैंगिक शोषणावर खुलेपणाने आपली व्यथा मांडल्यावर जगांत ही लाटच आली आणि ‘मी- टू’ म्हणत जगांत तीन लाख महिलांनी त्यांच्यावर गुदरलेल्या प्रसंगांना वाट मोकळी करून दिली. त्या सार्‍याच काही चित्रपट क्षेत्राशी संबंधित नाहीत. अगदी घरगुती बायका, मुलीदेखील आहेत. काही धार्मिक संघटनांसाठी काम करणार्‍या आहेत. पूज्य स्वामींनी, मौलवींनी त्यांचं काऊिंचग केलंय्‌. काहींना शिक्षकांनी शोषित केलंय्‌. कला, क्रीडा, संस्कृती, शिक्षण, वैद्यक, कायदा, राजकारण, समाजकारण, व्यापार, कॉर्पोरेट, उद्योग, धर्म... अशा सर्वच क्षेत्रांत हे शोषण झालं आहे. मोठ्या प्रमाणात हे शोषण कुटुंबात झालेलं आहे. ज्या व्यक्तीवर कुणी संशयही घेऊ शकणार नाही, ज्या नात्यांच्या संदर्भात असला विचारही कुणी सहसा करत नाही अशांनीच हे कृत्य केले आहे. अर्थात हे कास्टिंग काऊच नाही; मात्र काऊिंचग तर आहेच.
 
आता पुन्हा शमा सिकदर, टिस्का चोपडा सारख्या नव्या नट्यांपासून सरोज खान, वर्षा उसगावकर, जाधव यांच्या सारख्या नट्या, रेणुका चौधरी सारखी राजकारणी स्त्री आणि शत्रुघ्न सिन्हा सारख्या राजकारणी अभिनेत्यानेही कास्टिंग काऊच होत असते, असे सांगून टाकले आहे. ते सर्वच क्षेत्रांत होते. आता त्याला हे उजागर नाव देण्यात आले. हॉलिवुडी नि:संकोचपणाने त्यावर चर्चाही सुरू झाली, मात्र फार पूर्वी हंसा वाडकर यांनी ‘सांगत्ये ऐका’ नावाने त्यांचे छोटेखानी आत्मचरित्र लिहिले, त्यात त्यांच्यावर गुदरलेल्या असल्या प्रसंगांबद्दल मोकळेपणाने लिहिले आहे. अरुणा इराणी यांच्याही आत्मपर लेखनात यावर त्या बोलल्या. हंसा वाडकर यांनी लिहिल्यावर त्या काळांत गजहब झाला होता, मात्र नंतर सारे दाबून टाकण्यात आले. कारण त्या क्षेत्रांचा आपला एक व्यवसायिक बिंदू असतो. तो अशा प्रकरणांनी ढळू नये म्हणून असली अनैतिक मढी झाकून फायद्याचे मंगलकार्य उरकून घ्यायचे असते. नेमके तेच धार्मिक क्षेत्रांतही होत होते. आध्यात्मिक बुवा-बाबांवर चालणारी दुकानदारी अबाधित राहावी आणि काही बड्या व्यक्तींचा काळा पैसा त्यांच्यामुळे पवित्र होत राहावा यासाठी या बाबांच्या लीलांकडे कानाडोळा करण्यात येत होता. मात्र, अगदीच डोक्यावर पाणी गेल्यावर अन्‌ हे बाबा-बापू उपयोगाचे राहिले नाहीत म्हणून त्यांना डोईवरून आदळण्यात आले. क्रीडा क्षेत्रांतही प्रशिक्षकांकडून कास्टिंग काऊच करण्यात येते. टेनिसच्या क्षेत्रांत त्याची मोठी चर्चा झाली. मोठ्या स्तरावरच्या सामन्यांत खेळण्याची संधी देण्यासाठी तसली ऑफर देण्यात आली, अशा तक्रारी करण्यात आल्या आहेतच आधी.
 
शिक्षण क्षेत्रांतही हे असे होते. अनेक विद्यापीठांत डॉक्टरेट करणार्‍या विद्यार्थिनींनी त्यांचे गाईड या पद्धतीची मागणी करतात, हे अनेकवार सिद्ध झाले आहे. नुकतेच नाईके या क्रीडा साहित्य निर्मात्या कंपनीत एका बड्या अधिकार्‍यावर तिथल्या काही महिला कर्मचार्‍यांनी यौन शोषणाचा आरोप केला होता. त्याच्यावर तातडीने कारवाई करण्यात आली. रेणुका चौधरी म्हणाल्या- संसदेतही कास्टिंग काऊच होते. राजकारण हे सार्वजनिक जीवनाच्या सर्वच क्षेत्राची भेळ असते. संगम असतो, असेही म्हणता येईल, त्यामुळे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात ज्या काय स्वीकृती आणि विकृती असतात त्या राजकारणांतही असतात. सी. एस. लक्ष्मी म्हणजेच ‘अम्बई’ या तामीळ लेखिका. त्यांचा दबदबा आहे. ‘तुटलेले पंख’ नावानं त्यांच्या एका कथासंग्रहाचा अनुवाद सविता दामले यांनी केला आहे. ‘सिरागुगुल मुरियुम’, ‘वेट्टीन मुलैयिल ओरू समयालारै’ आणि ‘काटील ओरू मान’ असे त्यांचे तीन कथासंग्रह आजवर प्रकाशित झाले आहेत. इंग्रजीतही त्यांनी भरपूर लिखाण केलं आहे. ‘पिकाडोर बूक ऑफ मॉडर्न इंडियन लिटरेचर’ या अॅन्थलॉजीत समावेश केल्या गेलेल्या त्या एकमेव तामीळ साहित्यिक आहेत. त्यांच्या काही कथा राजकारणात करिअर करू इच्छिणार्‍या स्त्रियांच्या यौन शोषणावर आहेत...
 
आर्थिक स्वरूपाचा तुडूंब व्यभिचार करून झाल्यावर कातडीच्या चलनाचा मोह पडतो. हा माज आहे. विकृती आहे. मात्र सार्‍याच क्षेत्रांत तो आहे. मात्र आता त्याची जिभेला चव सुटल्यागत चर्चा होते आहे, ती भीषण आहे. त्यामुळे एकुणातच स्त्रियांच्या सार्वजनिक जीवनातील वावरण्यावर आणि त्यांच्या यशाकडे संशयानेच पाहिले जाऊ शकते. यात पुरुषांच्या शुचितापूर्ण वागण्यावर आणि त्यांनी केलेल्या गुणवत्तेच्या निवडीकडेही खास अर्थाने पाहिले जाईल. जाते आहे. आपल्यावर झालेल्या अतिरेकाला वाचा नक्कीच फोडायला हवी पण स्त्रियांच्या सार्वजनिक जीवनाला धोका पोहोचणार नाही, या पातळीपर्यंतच ते व्हावे इतकेच!