प्रमोशन एके प्रमोशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2018   
Total Views |

 
 
एखादा नवीन चित्रपट येणार हे आपल्याला कसं कळतं? नवीन चित्रपटाविषयी आपल्या मनात उत्सुकता कशी निर्माण होते? आणि मी हा चित्रपट बघणारच हे आपल्याला कसं जाणवतं? या सर्व प्रश्नांचं केवळ एकच उत्तर आहे, ते म्हणजे चित्रपटांचं प्रमोशन. चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त होते. या न त्या रुपाने आपल्यासमोर सतत त्या चित्रपटाविषयी काही ना काही येत असल्याकारणाने देखील आपल्या मनात त्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण होते. एकूण काय तर चित्रपट सृष्टीत एखाद्या चित्रपटाच्या यशामागे सगळ्यात महत्वाचे काही असेल, तर ते म्हणजे "प्रमोशन".

 
 
 
प्रमोशनचे खास ट्रेंड्स :

खरं तर प्रमोशनच्या वेगवेगळ्या ट्रेंड्सची सुरुवात हिंदी सिनेसृष्टीतून झाली. गेल्या काही काळात या प्रमोशनच्या वेळवेगळ्या ट्रेंड्समध्ये वाढ झाली आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत नुकत्याच आलेल्या 'पॅडमॅन' या चित्रपटासाठी केवळ अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना किंवा राधिका आपटेच नाही तर संपूर्ण सिनेसृष्टीने आणि त्यांच्यामुळेच सामान्य माणसांनी देखील पॅड्स हातात घेवून फोटो काढून या चित्रपटाचे प्रमोशन केले. तसेच 'लिपस्टिक अंडर माय बुर्खा' या चित्रपटाच्या प्रमोशनची कथा देखील अशीच. पद्मावत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दीपिका पादुकोणने स्वत:च्या इंस्टाग्रामवर नागरिकांना "घूमर" गाण्यावर त्यांनी केलेले व्हिडियोज पाठविण्याचे आवाहन केले होते. तसेच या व्हिडियोज पैकी काही ठराविक व्हिडियोजना तिने आपल्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवर देखील स्थान दिले होते. एकूण गेल्या काही काळात चित्रपट, प्रमोशन आणि त्याचे ट्रेंड्स याविषयी भरपूरकाही इंटरनेटवर बघायला मिळत आहे. 
 
एक उत्तम चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोमोशन गरजेचं असतं. सध्या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी टीमकडून ट्रेलर लाँच, चित्रपटांतील गाणी, मुलाखती या पद्धतीने तर प्रमोशन केलंच जातं मात्र चाहत्यांकडून देखील आता असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. आता हळू हळू मराठी चित्रपटसृष्टीत देखील चित्रपटांच्या प्रमोशनचा ट्रेंड बदलला आहे. यामध्ये "चला हवा येऊ द्या" सारख्या कार्यक्रमांमधून किंवा मालिकांमधून प्रमोशन करणे हे तर झालेच त्या शिवाय ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील विविध प्रकाराने हे प्रमोशन करण्यात येत आहेत. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे "फाफे" हा चित्रपट. " तो येतोय टॉक्क.." असे म्हणत अंकुश चौधरी, मिथिला पालकर, अमृता खानविलकर या सारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी या चित्रपटाचे प्रमोशन आपापल्या सोशल मीडिया अकाउंट वरुन केले.

 
 
 
१८ मे ला येणाऱ्या 'रेडू' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देखील सर्व मराठी सिनेसृष्टी कामाला लागली आहे. 'रेडू म्हणजे काय?' असे म्हणत मराठी सिनेसृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकार उदाहरणार्थ प्रिया बापट, भाऊ कदम, अमेय वाघ यांनी या चित्रपटाविषयी चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे.

 
 
११ मे ला प्रदर्शित होणारा स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगावकर यांचा "रणांगण" देखील ह्याला अपवाद नाही. स्वप्नीलचे चाहते नेहेमी काही आगळंवेगळं करत असतात. रणांगण साठी चाहत्यांमध्ये एकंच चढाओढ लागली. "रणांगण Warrior" अशी एक स्पर्धा घेतली गेली. त्यात सर्व चाहत्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. सुरुवातीला २ जणांमध्ये ही स्पर्धा झाली. त्यात अभिनंदन गायकवाड याने एका दिवसात लाठीकाठी शिकली तर सुकन्या सावंत हिने एका दिवसात बासरी शिकून सादरीकरण केले. मयुरी मेश्राम ने बेसिक कराटे शिकून सादर केले, दिशा घाग हिने एका छायाचित्रातून दैनंदिन जीवनातील रणांगण दाखवले.

 
 
ह्यानंतर जी पुढची फेरी झाली त्यात काही स्पर्धकांना लघू चित्रपट केले आणि काहींनी चित्रपटातील संवादांवर memes तयार केले. श्रेया कुंभार, दिशा घाग ह्यांनी सुंदर आणि गमतीशीर memes बनवून मनं जिंकली. मयूर कोरे, हर्षदा झेंडे, सुकन्या सवांत ह्यांनी रणांगण विषयावर उत्कृष्ट लघू चित्रपट केले.

अशी स्पर्धेला रंगत चढत गेली आणि अंतिम फेरीसाठी हर्षदा झेंडे, सुकन्या सावंत, श्रेया कुंभार आणि दिशा घाग ह्यांची निवड झाली. हा टास्क भन्नाट होता, अगदी out of the box! स्पर्धकांना रणांगण चा ट्रेलर recreate करायचा होता. स्पर्धकांनी जिद्दीने हे टास्क पण पूर्ण केले. स्वप्निलच्या एका चाहत्याने तर "एवेंजर्स"च्या धरतीवर रणांगणचे पोस्टर करुन मीम तयार केले.
 
 
आता देखील एकाच दिवशी रिलीझ होणऱ्या चित्रपटांमध्ये स्पर्धा ही असतेच. मात्र सिनेसृष्टीतील कलाकार एका परिवाराप्रमाणे एक मेकांच्या चित्रपटांचे प्रमोशन करताना दिसून येत आहेत, तर या शिवाय अनेक चित्रपटांच्या प्रमोशनसाठी विविध स्पर्धा घेण्यात आलेल्या देखील दिसून आल्या आहेत.

समाज माध्यमांवरून आज मोठ्यातील मोठा सेलिब्रिटी सामान्य माणसांपर्यंत आणि सामान्य माणूस सेलिब्रिटींपर्यंत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत सामान्य प्रेक्षक देखील या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी असतात. त्यांनी केलेले मीम्स असू देत, विविध पोस्ट्स असू देत, ट्रेलर किंवा गाणं शेअर करणं असू देत किंवा अगदीच साधी कमेंट असू देत. पण चाहत्यांमुळे चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात प्रमोशन होते यात वादच नाही.

चला हवा येऊ द्या, एंटरटेंमेंट की रात, बिग बॉस, द कपिल शर्मा शो, किंवा मालिकांमध्ये करण्यात आलेले "स्पेशल अपिअरंस" या माध्यमांमधून देखील आजकाल मोठ्या प्रमाणात सिनेमाचे प्रमोशन करण्यात येते. यामुळे त्या चित्रपटाविषयी माहिती अगदी घराघरांमध्ये पोहोचते. सामान्य माणसाच्या घरांमधून मनापर्यंत उतरण्यासाठी करण्यात आलेला हा खटाटोप.

असे म्हणतात चित्रपटाचे प्रमोशन जितके चांगले होईल तितकाच तो चित्रपट 'हिट' होणार. हे खरे देखील आहे. त्यासाठी आता चित्रपटाची संपू्र्ण टीम वेगवेगळी शक्कल लढवडते आणि प्रमोशनचे वेगवेगळे मार्ग शोधून काढते. खरं तर चित्रपट हिट होण्यासाठी तो प्रदर्शित होण्यापूर्वी अशा प्रकारच्या प्रमोशनची खरंच गरज असते, मात्र चित्रपट हिट होण्यामागे प्रमोशनसोबतच त्या चित्रपटात नेमकं काय आहे हे सगळ्यात महत्वाचं असतं. असं म्हणतात ना "Content is the king." ते चित्रपटांविषयी देखील खरेच आहे.

आधी हा प्रकार इतका प्रचलित नव्हता, मात्र आता चित्रपटांची आपसातील प्रतिस्पर्धा बघता याची गरज भासली आणि साधारण दशकापूर्वी याचे चलन वाढले. आणि कुणाचे प्रमोशन जास्त चांगले अशी प्रतिस्पर्धा देखील व्हायला लागली. यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका होती छोट्या पडद्याची. सामान्य माणसांना घरातून सिनेमागृहांपर्यंत खेचून आणण्यासाठी चित्रपटांना छोट्या पडद्याचा विचार करणे भाग पडले आणि म्हणूनच 'द कपिल शर्मा' सारखे कार्यक्रम उदयास आले आणि स्वत: 'किंग खान' ला आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी टी.व्हीचा आसरा घ्यावा लागला. त्यामुळे केवळ ' नाम ही काफी है ' असे पुरेसे राहिले नाही, आणि मोठ्यातील मोठ्या कलाकाराला देखील आपापल्या चित्रपटांचे प्रमोशन करावे लागले.

 
 
 
टी.व्ही. वरून आता हे प्रमोशन्स यूट्यूब आणि मोबाइलकडे सरकले आहेत. त्यामागचे मोठे कारण म्हणजे आताची तरुण पिढी टी.व्ही पेक्षा जास्त इंटरनेटचा वापर करते. त्यामुळे आता तर वेब सीरिजच्या माध्यमातून देखील चित्रपटांचे प्रमोशन करण्यात येते. पुढील काळात चित्रपटांच्या गेम्स प्रमाणेच 'अॅप्स' देखील निघाल्या तर यात नवल वाटायला नको.

अनेकदा चित्रपटाचे प्रमोशन खूप भारी असते, मात्र चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाही, त्याचे कारण देखील "Content is the king" असेच आहे. आजचा प्रेक्षक फोन्स प्रमाणेच "स्मार्ट" झाला आहे. त्यामुळे तो प्रमोशन सकटच आधी त्या चित्रपटाचे रिव्ह्यूज बघतो, माहिती काढतो आणि मगच चित्रपट बघण्याचा निर्णय घेतो.

त्यामुळे आता प्रेक्षकांना लक्षात घेता येत्याकाळात प्रमोशनचे आणखी कोणते ट्रेंड्स आपल्याला बघायला मिळणार हा मात्र खूपच उत्सुकतेचा विषय आहे.
- निहारिका पोळ
@@AUTHORINFO_V1@@