‘विधानसौध’च्या वाटेतील तीन अवघड जिल्हे..

    दिनांक  07-May-2018   
शिमोगा-चिकमंगळूरला खेटूनच असलेल्या दावणगिरी, चित्रदुर्ग आणि तुमकुर या जिल्ह्यांतील जनतेच्या मनाचा थांगपत्ता लावणं अवघड आहे. कारण या तीन जिल्ह्यांचा आजवरचा राजकीय प्रवासही तसाच आहे. संमिश्र आणि अनाकलनीय.

 

हिरवीगार शेतं, सुपारीच्या मोठमोठ्या बागा, तुंगा आणि भद्रा तसंच दोन्ही नद्यांच्या संगमानंतर झालेली ‘तुंगभद्रा’ आदी नद्यांच्या किनारी वसलेली छोटीछोटी गावं, हे सगळं मागे सोडत शिमोगा जिल्ह्यातून पूर्वेच्या दिशेने जाऊ लागलं की, येतो दावणगिरी जिल्हा. पुण्या-मुंबईत ‘दावणगिरी डोसा’नावाने अनेक दुकानं दिसतात. त्यातील दावणगिरी म्हणजे हेच. अवाढव्य पसरलेल्या कर्नाटक राज्याची उत्तर आणि दक्षिणेची सीमा निश्चित करणारा आणि उत्तर-दक्षिण कर्नाटकाच्या संस्कृतींचाही संगम झालेला जिल्हा म्हणजे दावणगिरी. मुंबईहून बंगळुरूला जाणारा राष्ट्रीय महामार्ग याच दावणगिरीतून पुढे चित्रदुर्ग, तुमकुरमार्गे बंगळुरूला जातो. या महामार्गाने बंगळुरूच्या दिशेने जाताना जसा उत्तर आणि दक्षिण कर्नाटकातील फरक जाणवू लागतो तसंच जर तुम्ही आधी शिमोगा-चिकमंगळूरला भेट देऊन आला असाल तर तुम्हाला पश्चिम आणि पूर्व कर्नाटकातील फरकही जाणवू लागतो. भौगोलिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक. दावणगिरी, चित्रदुर्ग हे कर्नाटकातील मागास जिल्ह्यांपैकी दोन जिल्हे. त्यापुढील तुमकुरवर बंगळुरूचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो जसा आपल्याकडील ठाणे, कल्याण-डोंबिवली किंवा विरारवर मुंबईचा जाणवतो. तुमकुरमार्गे याच महामार्गाने सरळ गेलं की अवघ्या तासाभरात तुम्ही बंगळुरूमध्ये पोहोचता.

दै. ‘मुंबई तरुण भारत’ तर्फे गेले काही दिवस प्रकाशित होत असलेल्या ‘रणसंग्राम कर्नाटकचा’ या लेखमालिकेत आपण नुकताच दक्षिण कन्नड, मंगळूर, उडुपी, शिमोगा आणि चिकमंगळूर या चार जिल्ह्यांचा लेखाजोखा वाचलात. हे चारही जिल्हे सध्या भाजपच्या ‘सरकारा बदलीसी, बीजेपी गेल्लीसी या स्वप्नाला अनुकूल ठरण्याची शक्यता असणारे जिल्हे आहेत. या चार जिल्ह्यांच्या एकूण ‘मूड’बद्दल सध्या थोडाफार अंदाज वर्तवणे शक्य आहे, मात्र, शिमोगा-चिकमंगळूरला खेटूनच असलेल्या दावणगिरी, चित्रदुर्ग आणि तुमकुर या जिल्ह्यांतील जनतेच्या मनाचा थांगपत्ता लावणं अवघड आहे. कारण या तीन जिल्ह्यांचा आजवरचा राजकीय प्रवासही तसाच आहे. संमिश्र आणि अनाकलनीय. कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस पक्ष, सत्ताधारी बनण्यास इच्छुक भाजप आणि या दोन्ही दगडांवर पाय ठेऊन मधल्या मध्ये लोणी खाण्यास इच्छुक असलेला जनता दल (सेक्युलर) या तीनही पक्षांमध्ये या तीन जिल्ह्यांत स्पर्धा आणि चुरस आहे. अर्थात, २०१३ च्या निवडणुकीत बी. एस. येडियुरप्पा यांच्या बंडखोरीचा जो फटका भाजपला राज्यातील इतर भागांत बसला तोच या तीन जिल्ह्यांतही बसला. तीन जिल्ह्यांतील मिळून विधानसभेच्या एकूण २५ मतदारसंघांपैकी २००८ मध्ये भाजपकडे होते १२, काँग्रेसकडे ६ तर जनता दलाकडे ४. हीच परिस्थिती २०१३ मध्ये झालेल्या मतविभागणीमुळे बदलली आणि काँग्रेसने २५ पैकी तब्बल १५ मतदारसंघ ताब्यात घेतले. भाजप फक्त २ जागी उरला तर जनता दल ४ जागांवर.

भाजपवर ही परिस्थिती ओढवण्यास दावणगिरी जिल्हा महत्त्वाचा ठरला. येडियुरप्पा आणि कर्नाटक भाजपचे दुसरे महत्त्वाचे नेते ईश्वरप्पा यांचा बालेकिल्ला असलेल्या शिमोग्याला लागूनच दावणगिरी वसलेला आहे. त्यामुळे इथे भाजपचा प्रभाव जाणवणारच. जिल्ह्यातील विधानसभेच्या ८ जागांपैकी २००८ मध्ये भाजपकडे होत्या ७ जागा. म्हणजे अर्थातच पूर्ण वर्चस्व, तर काँग्रेस कशीबशी १ जागा मिळवू शकली होती आणि जनता दलाला काहीही अस्तित्व नव्हतं. मात्र, २०१३ मध्ये जनता दलाला जिल्ह्यात खातं उघडण्यात यश मिळालं आणि काँग्रेसला तर तब्बल ७ जागा मिळाल्या. ७ जागी असलेला भाजप थेट शून्यावर घसरला. आता येडियुरप्पांच्या पुनरागमनानंतर दोन-तीन वर्षांत पुलाखालून बरंच पाणी गेलं असल्याचा दावा भाजप कार्यकर्ते करत असून त्या पाण्यात सर्वांचीच सर्वच पापं वाहून गेली असल्याचंही ते म्हणतात. दुसरीकडे भाजप आतून दोन गटांत पोखरली असल्याचा काँग्रेस आणि जनता दलवाल्यांचा दावा आहे. मात्र, त्यांच्या स्वतःच्या पक्षात जिल्ह्यातल्या जिल्ह्यातच दोनपेक्षाही अधिक गट आहेत, ज्याबाबत त्यांना उत्तर देता आलेलं नाही. बाकी काहीही असलं, तरीही जिल्ह्यातील मुख्य प्रकाशझोत हा पुन्हा एकदा भाजपकडेच आहे. जी काही चर्चा आहे, ती भाजपबद्दल आहे. त्यामुळे इथे भाजप पुन्हा आपलं अस्तित्व निर्माण करण्याची आशा व्यक्त केली जात आहे. ८ पैकी ४ जागांवर भाजपचं तसं बरं चाललं असून बाकी ३ जागांवर थोड्या अधिक प्रयत्नाची गरज व्यक्त होत आहे तर एका जागेवर काहीही आशा नसल्याची माहिती कर्नाटक प्रदेश भाजपमधील एका बड्या नेत्याने दिली.

चित्रदुर्ग हा मात्र भाजपसाठी तसा अवघड दुर्ग आहे. २००८ मध्येही तो भाजपसाठी अवघड होता आणि २०१३ मध्येही. येथील लोकसभा मतदारसंघावर कित्येक वर्षांपासून अव्याहतपणे काँग्रेसचे राज्य आहे. विधानसभेच्या एकूण ६ जागांपैकी सध्या काँग्रेसकडे सर्वाधिक ४ तर भाजपकडे १, जनता दलाकडे शून्य अशी विभागणी आहे. २००८ मध्ये भाजपला सर्वाधिक २ आणि काँग्रेस-जनता दलाकडे प्रत्येकी १ जागा होती. जिल्ह्यातील चित्रदुर्गसह छोट्या शहरांमध्ये मुस्लीम समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. चित्रदुर्ग, हिरीयूर आदी शहरांत ३० टक्क्यांहून अधिक मुस्लीम समाज आहे तर ग्रामीण भाग मात्र हिंदूबहुल आहे. चित्रदुर्ग हाही मागास जिल्ह्यांपैकी एक जिल्हा. मुंबई-बंगळूर महामार्गालगतचं चित्र वरवर पाहता बरं दिसतं. मात्र अंतर्गत भागात परिस्थिती फारशी बरी नाही. सिद्धरामैय्या सरकारमधील सामाजिक न्याय आणि मागासवर्गीय कल्याण खात्याचे मंत्री असलेले एच. अंजनेय हे याच चित्रदुर्गमधील होलाळकिरी मतदारसंघातून निवडून येतात. मात्र, या दुर्गम आणि मागास जिल्ह्याचा सामाजिक न्याय आणि कल्याण करणं मात्र त्यांना जमू शकलेलं नाही. तथापि, या जिल्ह्यात आजच्या घडीला तरी काँग्रेसकडेच कल दिसत आहे. येथील मतदार काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे आणि सिद्धरामैय्या सरकारच्या गेल्या ५ वर्षांतील भूमिकेमुळे कर्नाटकांतील जातीजातींत जी दरी निर्माण झाली, तिचाही (गैर)फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे.

चित्रदुर्गहून बंगळूरकडे निघालं की येतं तुमकूर. बेळगावनंतर तुमकूर हा कर्नाटकातील दुसरा सर्वात मोठा जिल्हा. चित्रदुर्ग, चिकमंगळूर, हासन, मंड्या, रामनगर, बंगळूर (ग्रामीण), चिकबल्लारपूर आदी ७ जिल्ह्यांची तसेच उत्तर-पूर्वेकडे आंध्र प्रदेश असा विविध जिल्ह्यांनी आणि दुसर्‍या राज्याने वेढलेला राज्यातील तुमकूर हा एकमेव जिल्हा. उद्योगांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई या औद्योगिक कॉरिडॉरवरील आणि महामार्गावरील महत्त्वाचा जिल्हा आहे. येथील विशेष बाब म्हणजे २००४ आणि २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभरात अपयश मिळालं असताना इथे भाजपचा खासदार निवडून आला तर देशभरात २०१४ मध्ये मोदी लाट असताना इथे मात्र काँग्रेसचा खासदार विजयी झाला. देवेगौडा-कुमारस्वामींचा बालेकिल्ला हासन जिल्ह्याला लागून तुमकूरचा मोठा भूभाग असल्याने त्या भागात जनता दलाचे सध्यातरी जनता दलाचे वर्चस्व आहे. असे असले तरी हा जिल्हा तीनही पक्षांसाठी अनुकूल राहिला आहे आणि याही निवडणुकीत राहायची शक्यता आहे. २००८ मध्ये भाजप राज्यभरात स्पष्ट बहुमत मिळवत सत्तेत असताना येथील एकूण ११ मतदारसंघांपैकी भाजपकडे केवळ ३ जागा होत्या तर काँग्रेस आणि जनता दलाकडे प्रत्येकी ४ आणि ३. दुसरीकडे २०१३ मध्ये काँग्रेसने राज्यभरात जोरदार मुसंडी मारली असताना या जिल्ह्यात मात्र काँग्रेसला चारच जागा टिकवता आल्या तर दुसरीकडे जनता दलाला ६ जागी विजय मिळाला. भाजपला केवळ १ जागा मिळवत अस्तित्व राखता आलं. त्यामुळे हा जिल्हा कोणाच्या बाजूने कल देईल, हे सांगणं तसं मुश्कीलच. हीच संमिश्र परिस्थिती याही निवडणुकीत कायम राहील, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी वर्तवला आहे आणि या जिल्ह्यात फिरताना ते जाणवतदेखील आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुमकूरमध्ये झालेल्या सभेचा परिणाम भाजपच्या बाजूने होण्याची आशा भाजपला असली तरी जिल्ह्यातील एकूण गुंतागुंत पाहता त्याची खात्री मात्र देता येत नाही. तीच अवस्था इतर दोन जिल्ह्यांचीही. दावणगिरी, चित्रदुर्ग आणि तुमकूर हे तीनही जिल्हे संमिश्र कौल देणारे असल्यामुळे इथे काय होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. दावणगिरी भाजपला अनुकूल तर चित्रदुर्ग काँग्रेसला आणि तुमकूर सर्वांनाच अशी परिस्थती आहे. तथापि, ‘विधानसौधा’वर स्वपक्षाचा झेंडा फडकावा, अशी मनीषा बाळगणार्‍या पक्षाला या तीन अवघड जिल्ह्यांतील २५ मतदारसंघांपैकी १५ जागांवर विजय मिळवावाच लागणार आहे.