रसिकांच्या काळजावर कायम आपल्या कलाकृतींचे अत्यंत रेखीव असे कोरीव काम काही कलावंत करून ठेवत असतात. रसिकांची एक पिढीच त्यांच्या कलादानाने समृद्ध होत असते आणि नंतरच्या माणसांच्या पिढ्यांना रसिक करण्यांतही या कलावंतांचा वाटा असतो. त्या तालेवार कलावंतांच्या मांदियाळीत अढळ स्थानी जाऊन बसण्याचे केवळ भाग्यच लाभत नसते, तर त्यासाठी निरंतर साधना, निरपेक्ष कलानिष्ठा आणि कलेला सर्वस्व अर्पण करण्याची स्वत:च्याही नकळत असलेली तयारी हवी असते. अरुण दाते यांची ती होती म्हणून मराठी भावगीतांच्या इतिहासात आता त्यांना टाळून जाता येणारच नाही. या गायकाचे पार्थिव आता आपल्यात नसेल, मात्र हा ‘अरुण’ संगीतरसिकांच्या पुढच्या अनेक पिढ्यांच्या स्मरणात कायम सूरमयी पहाट उजाडत राहणार आहे. आयुष्याचे गाणे होण्याचा क्षण फारच दैवदुर्लभ असाच असतो. प्रत्येकाच्याच आयुष्यात हा क्षण येतो, मात्र सार्यांच्याच आयुष्याचे गाणे होत नाही, कारण त्याला त्याच्या वाट्याला आलेला तो क्षण सार्थक करता येत नाही. पार्थिव जाणिवांच्या पलीकडे जाऊन आयुष्यात फुलांसारख्या उमलणार्या दु:ख आणि आनंदाच्या भावनांना ओंजळ देता आली तरच ते क्षण शब्दांच्या सुगंधी चिमटीत पकडता येतात. त्यांच्या कविता होतात आणि त्या कवितांना अंतर्प्रवाही असा एक सूर असतो, एक निनाद असतो. एका चांगल्या संगीतकाराच्या अन् तितक्याच सर्जनशील गायकाच्या गळ्याची वाट ही कविता बघत असते. हे सारे जुळून आले की त्याचे भावगीत होते. चित्रपटबाह्य गाणी म्हणजे भावगीत, अशी संभावना केली जाते भावगीतांची, मात्र ते हिंदीच्या बाबत खरे आहे.
मराठीत केवळ चित्रपटबाह्य गाणी म्हणजे भावगीत नव्हे. ना. घ. देशपांडे यांची, ‘रानारानात गेली बाई शीळ’ ही कविता कविसंमेलनांत सादर केली जायची. तोवर तीच पद्धत होती. कवितांना जन्मत:च ज्या चाली असतात त्या चालींतच ती कविता कवी सादर करायचे. ‘रानारानात...’ ला जी. एन. जोशी यांनी संगीतबद्ध केले आणि गायलेही. काल-परवापर्यंत हेच मराठीतले पाहिले भावगीत आहे, असा समज होता. आताही अनेकांना तसेच वाटते, मात्र ‘रानारानात’ हे 1932 मध्ये ध्वनिमुद्रित झाले आणि त्या आधी 1926 साली ‘हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला’ हे भावगीत एचएमव्हीने ध्वनिमुद्रित केल्याचा संदर्भ आहे. त्या क्षेत्रातल्या अभ्यासकांचा तो दावा आहे. बापूराव पेंढारकर यांनी ते गायले होते. त्यानंतर गजानन वाटवे यांचे युग सुरू झाले. मराठी भावगीतांचा अनभिषिक्त सम्राट, हे त्यांचे स्थान अढळ आहे. मात्र, त्यांच्या कारकीर्दीच्या थांब्याशी एक पोकळी निर्माण झाली होती. मराठी भावगीतांचा हा स्वरयज्ञ पुढे सुरू राहण्यासाठी एका समर्थ गायकाची गरज होती. भावगीत म्हणजे सुरेल गळ्याने चाल सुटू न देता गायलेले गाणे नव्हेच. त्याच्यामागे एक समर्थ अशी कविता असते आणि त्या कवितेचा भावार्थ निरागस सुरांनी रेशमाच्या लडी उलगडाव्यात तसा उलगडून दाखविणारा असा स्वरांचा जादूगार हवा असतो. अरुण दातेंच्या रूपात तो मराठीला सापडला आणि 1947 ते 60 हा मराठीच्या भावगीतांचा सुवर्णकाळ अरुण दाते यांच्या सुरांनी उजळून निघाला. गायक अरुण दाते-कवी मंगेश पाडगावकर-गीतकार श्रीनिवास खळे या त्रयींनी मराठी भावगीतांचा शुक्रतारा अढळ ठेवला.
गायक, गीतकारांना त्यांच्याच तोडीच्या कवींची साथ लाभावी लागत असते. अरुण दातेंच्या काळात मंगेश पाडगावकर, शांता शेळके, यशवंत देव, सुरेश भट, मधुकर जोशी, शांताराम नांदगावकर, वंदना विटणकर, अशोक परांजपे, सुधीर मोघे या कवींची साथ त्यांना लाभली. त्यांच्या आधी कुसुमाग्रज, गदिमा यांच्यासारखे अलौकिक शब्द-भाव सामर्थ्य असलेले कवी लिहिते होते. संगीतकारांमध्ये अगदी श्रीनिवास खळे, स्नेहल भाटकर, हृदयनाथ मंगेशकर, पं. यशवंत देव, अनिल-अरुण, अनिल मोहिले, अरुण पौडवाल, अशोक पत्की, कमलाकर भागवत, गोिंवद पोवळे, सुधीर फडके, श्रीधर फडके, दशरथ पुजारी, श्रीकांत ठाकरे हे संगीतकारही भावगीतांचा प्रवाह समृद्ध करत होते. लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, सुधीर फडके, श्रीधर फडके, मालती पांडे, सुधा मल्होत्रा, साधना सरगम, देवकी पंडित, सुरेश वाडकर अशा गायकांचाही एक मस्त प्रवाह भावगीतांना लाभला. त्यात अरुण दाते यांचे आपले एक मखरातले स्थान आहे. त्यांनी केवळ आणि केवळ मराठी भावगीतांसाठी त्यांच्या गायकीचा ओघ वाहता ठेवला. त्या काळात मराठी चित्रपटांची गाणीही भावगीतांच्या तोडीची अर्थपूर्ण आणि विलक्षण गोडवा असलेली होती. मराठी भावगीतांच्या दालनातले मानाचे पान गीतरामायण आहे! गदिमांचे शब्द आणि बाबूजींचे स्वर यांनी हे लेणे अजरामर झालेले आहे. त्यामागे अर्थातच मराठी मनांची रामभक्तीदेखील होतीच; पण अरुण दाते यांच्या ‘शुक्रतारा’ने मराठी रसिकांच्या भावविश्वाला शब्द दिले, सूर दिले आणि त्यांची भावगीते ही सामान्यांच्या भावनांचे गीतरामायणच झाले! त्या काळात अनेक कवींनी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. काही कवितांना चाली लावून चित्रपटांसाठी गाणी म्हणून त्यांचा वापर करण्यात आला. दिग्गज कवींनी अगदी सराईतपणे आधी बेतलेल्या चालींवर गाणी लिहून दिली. अर्थात, तीदेखील भावगीतांच्या दर्जाचीच होती, मात्र ती भावगीते नव्हेत. गुलजारांच्या मीटरशी अजीबात संबंध नसलेल्या, ‘मेरा कुछ सामान’ या अनवट स्फुटाला एखादा आरडी सहज चाल लावून जातो अन् मग त्याचे गाणे होते... ते चित्रपटातले असले तरीही भावगीत असते. इतक्या दर्जेदारपणे भावगीतांशी अरुण दाते यांनी निष्ठा राखली होती.
अनेक गायक चित्रपटांसाठी गाणी म्हणू लागले. अर्थात ती गायक, संगीतकारांना सर्वोच्च अशी व्यवसायिक दाद असते. तो मोहदेखील असतो. अरुण दातेंनी तो मोह टाळला. अपवादात्मक संदर्भाची काही चूक होत असेल तर मर्मज्ञ वाचकांनी ती सुधारावी, पण अरुण दातेंनी चित्रपटांसाठी गाण्याचा मोह टाळलाच आहे. त्यांची भावगीते इतकी स्वयंभू आणि स्वयंपूर्ण होती आणि त्यांनी आपली एक ठशठशीत अशी भावमुद्रा निर्माण केली होती की, त्यांना ठरवूनही चित्रपटाच्या एखाद्या प्रसंगात समायोजन करण्याचे धाडस कुणी केले नाही. त्यांची भावगीते अभिजातपणाचा अदब राखीत ज्यांचा अर्थ, स्वर यांच्याशी मर्मज्ञ असा संबंध नाही अशाही सामान्य रसिकांना कवटाळती झाली. मराठी जिथवर पसरली आहे तिथवर त्यांच्या काळात जे काय सांस्कृतिक कार्यक्रम होत तिथे त्यांच्या भावगीतांच्या ध्वनिमुद्रिका निनादत असत. अगदी अलीकडच्या काळापर्यंत ते गात होते. 2016 च्या इंदूर येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात मराठी भावगीतांना 90 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून भावगीतांचा इतिहास जिवंत करणारा एक कार्यक्रम बेतण्यात आला होता. त्यात अरुण दाते गायले होते. त्यावेळीही शरीराचे वय वाढलेल्या या गायकाचे सूर मात्र कोवळेच आहेत, याची विलक्षण सुखद अशी जाणीव रसिकांना श्रीमंत करून गेली होती. मात्र, त्या आधीपासूनच त्यांनी एक दशक आधीपासून गाणे थांबविले होती. गजानन वाटवे यांच्या भावगीतांच्या मैफली गणेशोत्सव तालेवार करत होत्या, तोच प्रघात दातेंनी कायम ठेवला होता. आकाशवाणीच्या सोन्याच्या दिवसांचे साक्षी असलेले कलावंत अनेक आहेत, मात्र ते दिवस संपन्न करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता त्यात अरुण दाते हे महत्त्वाचे गायक आहेत. त्यामुळे त्यांच्या जाण्याने डोळे पाणावले नाहीत, असा मराठी रसिक असूच शकत नाही! एका पिढीच्या सांजा आपल्या सुरांनी अर्थप्रवाही करणार्या या कलावंतांच्या आठवणीने आता सांजेला नक्कीच पाणी येत राहणार आहे. ते कितीही म्हणोत, डोळ्यांत सांज वेळी आणू नकोस पाणी...