आम्ही आशा करतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाचे धडे शिकतील : मनमोहनसिंग

07 May 2018 15:13:30
 
 

 
 
 
कर्नाटक : काँग्रेस आशा करते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाचे धडे लवकरच शिकेल आणि अंमलात आणेल असा दमदार टोला आज माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगळूरु येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करतांना ते बोलत होते. नरेंद्र मोदी काँग्रेस पक्षाबद्दल जे काही बोलतात ते बोलणे चुकीचे आहे. इतक्या खालच्या स्तरावर जावून बोलणे नरेंद्र मोदी यांना शोभत नाही असाही टोला त्यांनी यावेळी नरेंद्र मोदी यांना लगावला. 
 
 
 
 
 
सारखा कर वाढवून नरेंद्र मोदी सरकार सामान्य जनतेची पिळवणूक करीत आहे. तेलाच्या किंमती वाढवून सरकारने १० लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. आज आपला देश विविध समस्यांना तोंड देत आहे. भारतातील शेतकरी अनेक संकटांना सामोरे जात आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला खिळखिळे बनवून टाकले आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 
 
 
 
 
वस्तू व सेवा कर आणि नोटबंदी यामुळे अनेक तरुणांचे रोजगार गेले आणि आता तरुणांना रोजगार शोधावे लागत आहेत. मोदी सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थेमुळे बँकिंग यंत्रणेतील लोकांचा विश्वास हळूहळू कमी होत जात आहे अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. खऱ्या नेतृत्वामुळे संधी निर्माण होतात त्या नष्ट होत नाहीत असाही दमदार टोला त्यांनी यावेळी मोदी यांना लगावला. 
 
 
Powered By Sangraha 9.0