भाषेची आपली एक गंमत असते. शब्द तोच असतो पण त्याचे स्थान बदलले की मग हसे निर्माण होते. एकाला खूप भूक लागली होती आणि तो सहज म्हणाला, सकाळपासून काही खाल्ले नाही, खूप भूक लागली आहे. कालपासून अन्नात एक पोटाचा कण नाही... थोडा वेळ कुणाच्याच काही लक्षात आले नाही अन् मग हळूहळू एकेकाच्या लक्षात यायला लागले की काय झाले आहे अन् मग सगळेच पोट धरून हसायला लागले. आता भुकेच्या प्रश्नावर ‘पोट धरून हसणे’ या वाक्प्रयोगाचाही श्लेष झाला. काही विनोद हे कुणीही करतं आणि त्याचे वजन वाढविण्यासाठी ते पुलं, अत्रे यांच्या नावाने खपवून टाकले जातात, म्हणजे मग कळले नाही तरीही लोक हसतात. आता ‘अवाक् होणे’ हा वाक्प्रयोग आहे. पुलं म्हणे एका स्नेह्याच्या घरी जेवायला गेले. कार्यक्रम झाला होता अन् पुलंना खूप भूक लागली होती. प्रत्यक्ष पुलंच जेवायला आलेत म्हटल्यावर यजमानांच्या सौभाग्यवतींनी अगदी हात सोडून वाढले. पुलंही पोटभर जेवले. अखेर यजमानीणबाईंना काही रहावले नाही. त्यांनी न राहवून विचारलेच, ‘‘कसा झाला स्वयंपाक?’’ पुलं म्हणाले, ‘‘उत्तम! मी तर अवाक् झालो आहे...’’ आता यजमान आणि त्यांच्या सौभाग्यवती आश्चर्याने बघतच राहिल्या. पुलं म्हणाले, ‘‘स्वयंपाक छानच झाला, मलाही खूप भूक लागली होती, त्यामुळे मी इतका जेवलोय् की आता मला वाकताही येत नाहीय्...!’’ अवाक् झालो, याचा अर्थ कळल्यावर यजमान नंतर बराच वेळ हसत राहिले... तर हे असे विनोद होतात अन् मग हसू फुटत असते. माणसे हसतात. हसणे हे आरोग्यासाठी चांगले आहे, असे म्हणतात पण कधी कधी ते आरोग्यावर बेतत असते. एका दातांच्या डॉक्टरकडे एक इसम गेला. बाताड्या होता. डॉक्टर त्याला म्हणाले, ‘‘आ करा.’’ त्याने केला. डॉक्टर म्हणाले, ‘‘आणखी थोडा मोठा आ करा.’’ त्याने तोंड आणखी ताणले. डॉक्टर म्हणाले, ‘‘मोठ्ठा ऑ करा...’’ तो पेशंट म्हणाला, ‘‘तुम्हाला बसायचे आहे का माझ्या तोंडात?’’ डॉक्टर हसतच सुटले अन् हसण्याच्या नादात त्यांच्या लक्षातच राहिले नाही की त्यांनी किडलेल्या दाताऐवजी चांगला दात उपटून फेकला होता... तर हे असे होते. कुणी कोट्या करतं, नेमक्या ठिकाणी विनोद करतं. पुलंना ते जमायचे. ते जमायलाही हवे नाही तर आपलेच हसे होते. एकदा पुलं म्हणाले होते, ‘‘मामा या नात्याचीही गंमतच आहे. शकुनी म्हटले तरीही अडचण आणि अपशकुनी म्हटले तरीही अडचण!’’ तर अशा कोट्या करण्यासाठी तल्लख बुद्धी हवी नाहीतर त्या करणार्यावरच उलटतात आणि मग त्याचेच हसे होते. मागे एका नगरपालिकेच्या गावी एका जणाच्या घरासमोर गाढव मरून पडले होते. त्याने नगरपालिकेत फोन केला. त्यांना सांगितले, ‘‘माझ्या घरासमोर गाढव मरून पडले आहे. त्याची दुर्गंधी सुटली आहे.’’
नगरपालिकेच्या त्या अधिकार्याने विनोद करण्याचा प्रयत्न केला, ‘‘मग गाढवाच्या नातेवाईकांना फोन करा ना...’’ तो नागरिक शांतपणे म्हणाला, ‘‘त्यांच्याचकडे तर सांगतो आहे ना...’’ हे असे होते अन् मग आपलेच हसे होते. आपला विनोद आपल्यावरच उलटतो अन् मग हसे होते. कुठल्या विषयावर विनोद करावा, हेही कळायला हवे. केवळ हसविण्यासाठी विनोद केला जाऊ नये, विनोदाने हसविले गेले कुणी तर ते मजेदार असते. लोक मात्र गंभीर घटनाही हसण्यावरी नेत असतात. बादशहा आणि बेगम एकदा आंबे खात बसले होते. दोघांच्याही समोर आंब्याच्या टोकर्या ठेवल्या होत्या आणि कोई व साली टाकण्यासाठीही कचरा कलश ठेवले होते. बादशहाने त्याच्या कोई आणि साली बेगमच्या कचरा कलशातच टाकल्या अन् मग बिरबल आला. बादशहा म्हणाला, ‘‘बघ बिरबल, बेगम किती खादाड आहे, सगळे आंबे तीच खाते आहे...’’ बादशहाने असा उपहास केल्यावर बेगमला तो जिव्हारी लागला; पण ती काही बोलू शकत नव्हती. तिचा चेहरा उतरला. बिरबल चटकन् म्हणाला, ‘‘तुम्हाला तर आंबे इतके आवडलेले दिसतात बादशहा सलामत की तुम्ही तर साली अन् कोईंसकट खाल्लेले दिसते...’’ बादशहाने पटकन् बेगमची माफी मागितली. बेगम म्हणाल्या, ‘‘बिरबल तुम्ही आज माझी लाज राखलीत...’’ बिरबल म्हणाला, ‘‘मी केवळ बेगमी केली!’’ बिरबलच्या चातुर्याने गंभीर वळणावर जाणारा विषय असा सामान्य झाला. आता मात्र लोकांना विनोद कळत नाही त्यामुळे दिलखुलास हसताही येत नाही. तुमच्यावर करण्यात आलेल्या विनोदावर हसता आले पाहिजे. त्यासाठी अर्थात तो विनोदही पातळी राखून केला जायला हवा. पूर्वीच्या काळी राजाच्या दरबारात एक विदूषक असायचा. तो केवळ वातावरण हलकेफुलके राखण्यासाठीच नसायचा तर तो अनेक गंभीर विषयांत त्याचे तज्ज्ञ मत द्यायचा अन् तेही विनोदाच्या माध्यमातून. आता प्रत्येकच क्षेत्रात असे विदूषक आले आहेत. त्यामुळे लोकांचे मनोरंजन होते, हे खरे आहे; पण ते त्यांचे काम नसते. त्यामुळे लोक हसतात पण त्याचे ते हसणे हे हसण्यावरी नेण्यात काही हशील नसते.
राजकारणात तर कोण केव्हा आणि कशा पद्धतीने विदूषक होईल, याचा नेमच राहिला नाही. बलात्कार, भ्रष्टाचार यासारख्या अत्यंत घातक विषयांवरही लोक विनोद करू पाहतात. मागे एका पक्षाच्या नेत्याने 9 कोटींचा भ्रष्टाचार केला, तर त्याची पाठराखण करताना त्या पक्षाचा प्रवक्ता म्हणाला, इतक्या कमी रकमेचा घोटाळा, याला घोटाळाच म्हणू नये अन् आमच्या पक्षाचा नेता इतका चिल्लर घोटाळा करूच शकत नाही... आता याला काय म्हणायचे? राजकारणात असलेल्या लोकांचे कार्य जनतेला हसते ठेवणे, हेच असते म्हणून अशा पद्धतीने हसवावे? कधीकाळी चित्रपटांत एक पात्र हमखास विनोदी असायचे. त्यासाठी विनोदी अभिनेते होते. मेहमूद, केस्टो मुखर्जी, जॉनी वॉकर, जगदीप, मुकरी, असरानी, राजेंद्रनाथ, टुनटुन... आणि मग यांच्यासोबत ओमप्रकाश, जॉनी वॉकर, जीवन यांच्यासारखे चरित्र अभिनेतेही विनोदी भूमिका करायचे. नंतर मात्र ट्रेंड बदलला. चित्रपटाचा नायक हा ‘ऑल इन वन’ झाला. तोच विनोद करू लागला अन् पब्लिकला हसवू लागला.
महानायक अमिताभ बच्चन यांचे असे कितीतरी सिन्स आठवणीत आहेत. मार खाऊन आल्यावर अमर, अकबर, अँथनी या चित्रपटांत, ‘‘ये देख अँथनीभाय पक्का इडियट लग रहा है...’’ असे म्हणत आरशातल्या प्रतिमेलाच औषध लावणारा अँथनी आठवला की अजूनही हसू येतं. चित्रपटांचे ठीक आहे पण सार्वजनिक जीवनात असे कुणी विदूषक झाले की सार्वजनिक जीवनाचा स्तरच पडत असतो. ‘एक्झॅगरेशन दाय नेम इज कॉमेडी’ असे चार्ली चॅप्लीन म्हणाला होता. हा अतिरेक काय असतो... मार्क ट्वेन म्हणाला, ‘‘दारू सोडणे खूपच सोपे आहे, मी अनेकदा सोडली आहे!’’ किंवा तोच म्हणाला होता, ‘‘मला खूप शिकायचे होते; पण शाळाच मधे आली...’’ विनोद केला की लोक हसतात आणि हसण्याने वातावरणाचा ताण हलका होतो; पण कधी कधी लोकांचे हसे होते... आजकाल तसे बर्याचदा होऊ लागले आहे!