'वूमन फर्स्ट' हाच पक्षाचा मंत्र : पंतप्रधान मोदी

04 May 2018 15:07:18


नवी दिल्ली : 'वूमन फर्स्ट हा पक्षाचा मूळ मंत्र असून देशातील महिलांचे हित आणि त्यांचा विकास यालाच पक्षाचे प्राधान्य आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले आहे. कर्नाटकातील महिला मोर्चाशी नमो अॅपच्या माध्यमातून आज त्यांनी संवाद साधला होता. यावेळी महिला नेत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

सध्याचे सरकार हे महिलांच्या नेतृत्वामध्ये देशाचा विकास करू इच्छित आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये सरकार हे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले आहे. तसेच देशाच्या विकासामध्ये महिलांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असून त्यांनी देखील यासाठी अविरत प्रयत्न केले पाहिजे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याच बरोबर कर्नाटक निवडणुकांच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील त्यांनी यावेळी चर्चा केली. कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.


कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना सत्याशी अवगत करावे व ही निवडणूक स्थानिक पातळीवर जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक कार्यकर्त्याने जर स्थानिक पातळीवरील निवडणूक जिंकली तर राज्यात भाजपची सत्ता येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे देखील त्यांनी म्हटले.

Powered By Sangraha 9.0