‘सरकारा बदलीसी’ करिता हे ४ जिल्हे ठरणार महत्त्वाचे!

    दिनांक  04-May-2018   

दक्षिण कन्नड, उडुपी, चिकमंगळूर आणि शिमोगा. कर्नाटकच्या सौंदर्याचा मुकुटमणी म्हणता येतील इतके नितांत सुंदर जिल्हे. हेच जिल्हे, आता कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीतही महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या तयारीत आहेत. कारण, भाजपने ‘सरकारा बदलीसी, बीजेपी गेल्लीसी’ (सरकार बदला, भाजपला आणा) म्हणत कन्नडिगांना सत्तापालट करण्याची साद घातली आहे आणि भाजपचं हे स्वप्न पूर्ण करण्यात हे चार जिल्हे मोठा वाटा उचलण्याची शक्यता आहे.म्हैसूरहून मंगळूरला जाताना मडिकेरी घाट उतरून जावं लागतं. हुन्सूर वगैरे मोठी गावं गेली की कोडागू (कुर्ग) जिल्हा सुरू होतो आणि हळूहळू लोकसंख्या विरळ होऊ लागते. मडिकेरी घाटातून उतरून दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुलियामध्ये पोहोचेपर्यंत जणू तुमचं देहभानच हरपून जातं. कुर्गच्या त्या उभ्या-आडव्या पर्वतरांगा, उंचच उंच वाढलेल्या वृक्षवेली, घाटातील तीव्र आणि नागमोडी वळणं आदींची मजा घेत ‘सह्याद्री’ ओलांडून दक्षिण कन्नडात उतरलं की सुरू होतं कर्नाटकातलं कोकण! लाल माती, कौलारू घरं, नारळी-पोफळीच्या बागा. गुजरातपासून केरळपर्यंतच्या पश्चिमी किनारपट्टीवरील महत्त्वाचं शहर असलेलं मंगळूर हे या जिल्ह्याचं मुख्यालय. महाराष्ट्रात ज्याला सर्रास ‘मुंबई-गोवा महामार्ग’ म्हटलं जातं, तो राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ खरंतर गोव्याहून कारवार, उडुपी, मंगळूरमार्गे खाली केरळपर्यंत जातो. कर्नाटकात हा महामार्ग चौपदरी असून बिनाखड्ड्यांचा आणि आखीव-रेखीव आहे. उडुपीतून पुन्हा पठारी भागात जायचं म्हटलं तर अगुंबे घाट चढून, सोमेश्वर अभयारण्यातून वर यावं लागतं. कुर्गला सर्वाधिक सुंदर म्हणावं तर अगुंबे-सोमेश्वरला गेल्यावर तुमचं मत पुन्हा बदलतं. घाटमाथ्यावर गेल्यानंतर शिमोगा जिल्हा सुरू होतो आणि तीर्थहळ्ळीमार्गे तुम्ही शिमोग्याला पोहोचता. मात्र, घाटमाथा चढून गेल्यावर आदीशंकराचार्यांनी स्थापन केलेल्या शृंगेरी मठाला भेट द्यायची इच्छा झाली तर वाट वाकडी करावी लागते. ती करून तुम्ही उजव्या हाताला वळलात की लगेचच चिकमंगळूर जिल्हा सुरू होतो.

दक्षिण कन्नड, उडुपी, चिकमंगळूर आणि शिमोगा. कर्नाटकच्या सौंदर्याचा मुकुटमणी म्हणता येतील इतके नितांत सुंदर जिल्हे. हेच जिल्हे, आता कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीतही महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या तयारीत आहेत. कारण, भाजपने ‘सरकारा बदलीसी, बीजेपी गेल्लीसी’ (सरकार बदला, भाजपला आणा) म्हणत कन्नडिगांना सत्तापालट करण्याची साद घातली आहे आणि भाजपचं हे स्वप्न पूर्ण करण्यात हे चार जिल्हे मोठा वाटा उचलण्याची शक्यता आहे. मधोमध उभ्या असलेल्या सह्याद्री पर्वताच्या पूर्व आणि पश्चिमेला असलेले हे जिल्हे म्हणजे भाजपचे एकेकाळचे बालेकिल्ले. २०१२-१३ मध्ये बी. एस. येडियुरप्पांनी कर्नाटक जनता पक्षाचा सवतासुभा निर्माण करून स्वतःच कष्टाने निर्माण केलेला बालेकिल्ला अक्षरशः जमीनदोस्त केला. त्यामुळे आधी बराच क्षीण असलेला काँग्रेस पक्ष २०१३ मध्ये या भागातील सर्वात मोठा पक्ष ठरला तर आधी अस्तित्वही नसलेला जनता दल (सेक्युलर)ही मधल्या मध्ये भाव खाऊन गेला. या ४ जिल्ह्यांतील विधानसभेच्या २५ जागांपैकी २००८ मध्ये भाजपकडे होत्या तब्बल १८ जागा. काँग्रेसकडे ७ तर जनता दलाकडे थेट भोपळा. २०१३ च्या निवडणुकीत काँग्रेसला मिळाल्या १५, जनता पक्षाला ५ आणि ४ जागा मिळवत भाजप तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला. काँग्रेस-जनता दलाला मिळालेल्या २० जागांवर कर्नाटक जनता पक्षाने खाल्लेल्या मतांचा परिणाम जबरदस्त होता, जो भाजपला अगदीच समुद्रसपाटीवर घेऊन आला. आता दरम्यानच्या काळात येडियुरप्पा झालं-गेलं विसरून पुन्हा स्वगृही परतले आहेत आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह या दोन खमक्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक भाजपही झालं-गेलं विसरून सरकारा बदलीसी करिता कामाला लागला आहे.मंगळूर शहर हे दक्षिण कन्नडचं मुख्यालय, तसंच महत्त्वाचं वाहतूक केंद्र आणि व्यापारी-औद्योगिक केंद्र. कर्नाटकच्या पश्चिम किनारपट्टीवरील हे सर्वांत मोठं शहर. विधानसभेचे ३ मतदारसंघ या शहरात आहेत तर एकूण जिल्ह्यात ८. लोकसभेच्या गेल्या कित्येक निवडणुकांमध्ये दक्षिण कन्नड मतदारसंघातून भाजपचाच खासदार निवडून येतो. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा हेही येथीलच. २००४ मध्ये काँग्रेसचे तगडे नेते, कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असलेल्या वीरप्पा मोईली यांचा गौडांनी याच दक्षिण कन्नड (२००९ पूर्वी मंगळूर) मतदारसंघातून दणदणीत पराभव केला होता. २००८ मध्ये जिल्ह्यातील ८ पैकी भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी ४ आमदार होते. २०१३ मध्ये काँग्रेस ७ वर गेली तर भाजपला केवळ एका जागी विजय मिळाला. शेजारच्याच उडुपी जिल्ह्यातही एकूण ५ मतदारसंघांपैकी २००८ मध्ये भाजपचे ४ आमदार होते आणि काँग्रेसचा केवळ एक. २०१३ मध्ये हेच चित्र उलटं होऊन काँग्रेसला ४ तर भाजपला अवघी एक जागा मिळाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र उडुपी-चिकमंगळूर या किनारी आणि पठारी अशा दोन्ही जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मतदारसंघातून भाजपच्या शोभा करंदलाजे विजयी झाल्या. कर्नाटकात सह्याद्री ओलांडला की, देवेगौडांच्या जनता दलाचं अस्तित्व संपतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुळूभाषिक असलेल्या उडुपी आणि मंगळूर या दोन्ही जिल्ह्यांत पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे. मुंबईसह देशातील आणि परदेशांतील अनेक शहरांत उडुपी आणि मंगलोरी हॉटेलं-खाणावळी थाटून रग्गड उत्पन्न मिळवणारे शेट्टी याच भागातील. या शेट्टींच्या रूपाने बंट समाज, तसंच गौडांचा वोक्कलिंग समाज तसंच काही प्रमाणात सारस्वत समाजही इथे आढळतो. गोव्याची कोकणी भाषाही इथे (किंचित वेगळ्या स्वरूपात) बरीच कानावर पडते. इथे मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाचं प्रमाणही बरंच असून दक्षिण कन्नड जिल्ह्यात मुस्लीम साधारण २५ टक्के तर ख्रिश्चन ९ ते १० टक्के आहेत. उद्यमशील लोकांचे जिल्हे म्हणून हे दोन्ही जिल्हे ओळखले जातात. या जिल्ह्यांतील आपलं गतवैभव पुन्हा मिळवण्यासाठी भाजप कार्यकर्ते झाडून कामाला लागले आहेत.


मंगळूर शहरातील एक तर जिल्ह्यातील २ मतदारसंघांत तसंच उडुपीतील २ मतदारसंघांत काँग्रेसने अलीकडच्या काळात पुन्हा बस्तान बसवलं आहे. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे ती आतून पोखरली गेली आहे. २०१२-१३ मधील घटना तशा बर्‍याच ताज्या असल्याने भाजपमध्येही तशीच काहीशी परिस्थिती होती. मात्र एप्रिलमध्ये स्वतः अमित शाह कर्नाटकात उतरताच या अंतर्गत कुरबुरी अरबी समुद्रात वाहून गेल्या असल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा दावा आहे. भाजपचा पारंपरिक मतदार इथे असल्याने आणि काँग्रेसला इथे संधी मिळूनही संघटन उभं करता न आल्याने सध्या मंगळूर-उडुपीची जमीन भाजपला भुसभुशीत जाणवते. विधानसभेत कमळ फुलवायचं असल्यास इथे रूजायचा प्रयत्न करणारी काँग्रेस या १३ मतदारसंघांतून बाहेर उखडून द्यावी लागणार आहे आणि २००८ प्रमाणे किंवा त्याहूनही अधिक सरस कामगिरी करून दाखवावी लागणार आहे.शिमोगा हा खुद्द येडियुरप्पांचा गेल्या तीन दशकांचा बालेकिल्ला. २००८ मध्ये जिल्ह्यातील ७ पैकी ५ आमदार भाजपचे होते, तर २ काँग्रेसचे. २०१३ मध्ये काँग्रेसचे ३ तर जनता दलाचे ३ आमदार निवडून आले. येडियुरप्पांच्या कर्नाटक जनता पक्षातर्फे केवळ ते स्वतः त्यांच्या शिकारीपुरा या पारंपरिक मतदारसंघातून निवडून येऊ शकले. भाजपही नाही आणि कजपही नाही, अशी दुर्दैवी अवस्था शिमोगा जिल्ह्यात झाली. त्यानंतर येडियुरप्पांची घरवापसी झाल्यावर त्यांचे पुत्र राघवेंद्र यांच्या रूपाने पोटनिवडणुकीद्वारे भाजपचा एक आमदार निवडला गेला आणि लोकसभा निवडणुकीद्वारे येडियुरप्पा केंद्रात गेले. मात्र, कित्येक दशकांच्या प्रचंड कष्टाने पक्ष संघटना उभी करणारे येडियुरप्पा दिल्लीत रमणारे नव्हतेच. कालांतराने त्यांनाच विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं आणि मग मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही. विस्कळीत झालेली पक्षसंघटनाही आता शिमोग्यात बरीच सावरली आहे. शिमोगा हा लिंगायत आणि दलित समाजाची लक्षणीय लोकसंख्या असलेला जिल्हा. स्वतः लिंगायत असलेल्या येडीयुरप्पांच्या मागे लिंगायत समाज भक्कमपणे उभा असल्याचं चित्र आहे तर सिद्धरामय्यांच्या राज्य सरकारने स्वतंत्र लिंगायत धर्माबाबत केलेला आततायीपणा काँग्रेसवरच बूमरँग होऊन उलटण्याची चिन्हं आहेत. त्याचप्रमाणे बूथप्रमुख स्तरापर्यंत पोहोचलेल्या भाजपच्या संघटनेच्या जोरावर होणारा अखंड प्रचार, सबका साथ, सबका विकास हे तत्त्व, पंतप्रधान मोदींचा लोकप्रिय चेहरा आणि येडियुरप्पांनी इतकी वर्षं या भागासाठी केलेलं काम, यांच्या जोरावर शिमोग्यातील इतर सर्व समाज भाजपच्या पाठीशी उभे राहतील, अशी खात्री भाजप कार्यकर्त्यांना वाटते आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या भागात घेतलेल्या प्रचारसभांना चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे, तर शनिवारी शिमोग्यातच होणार्‍या पंतप्रधान मोदींच्या सभेसाठीही लोकांमध्ये उत्साह आहे. शिमोग्यातील ७ पैकी ४ ठिकाणी भाजप आघाडीवर असून २ ठिकाणी किंचित मागे पडला आहे तर एका मतदारसंघात भाजपला फारशा आशा नाहीत, अशी माहिती मिळत असून आश्चर्य म्हणजे काँग्रेसकडूनही याच प्रकारची माहिती मिळते आहे. त्यामुळेच संपूर्ण राज्यात निकाल काही लागो, शिमोग्यात मात्र ‘शत-प्रतिशत’च होणार असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. शिमोग्याच्या दक्षिण-पूर्वेला असलेला चिकमंगळूर हा देशभरात अनेक कारणांनी प्रसिद्ध असलेला जिल्हा. कॉफीचं देशातील पहिलं उत्पादन याच चिकमंगळूर जिल्ह्यात घेण्यात आलं. इंदिरा गांधींनी १९७८ मधील ऐतिहासिक पोटनिवडणूक येथूनच लढवली आणि विजय मिळवला. चिकमंगळूर हेही गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचं शक्तिस्थान. गेल्या कित्येक लोकसभा निवडणुकीत उडुपी-चिकमंगळूर मतदारसंघातून भाजपचाच खासदार निवडून येतो. २००८ मध्ये येथील ५ विधानसभा मतदारसंघांपैकी पाचही मतदारसंघ भाजपकडेच होते आणि काँग्रेस-जनता दल दूरदूरपर्यंत कुठेही आढळत नव्हते. २०१३ मध्ये येडियुरप्पांच्या बंडानंतरही भाजपचे २ आमदार जिल्ह्यात निवडून आले. जनता दलाने २ जागा मिळवत पुन्हा शिरकाव केला तर काँग्रेसनेही एका ठिकाणी विजय मिळवत खातं उघडलं. चिकमंगळूरला लागूनच देवेगौडा-कुमारस्वामींचा बालेकिल्ला हासन जिल्हा येतो. एकीकडे शिमोगा तर दुसरीकडे हासन अशा दोन जिल्ह्यांच्या राजकीय प्रभावाखाली चिकमंगळूर कोणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार, याकडेच कर्नाटकातील राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.


दक्षिण कर्नाटकातील म्हैसूर, मंड्या, हासन, चामराजनगर वगैरे जिल्ह्यांत भाजपच्या यशाबद्दल खुद्द भाजपसह सर्वांनाच साशंकता असताना या प्रदेशाच्या जवळच्याच चिकमंगळूर, शिमोगा आणि किनारपट्टीवरील दक्षिण कन्नड आणि उडुपी या चार जिल्ह्यांतून मात्र, भाजपला ग्रीन सिग्नल मिळताना दिसतो. येथील चित्र भाजपसाठी आशादायक असलं तरी, तेवढ्यावर भागणार नाही, याची भाजपला पूर्ण कल्पना आहे. सरकारा बदलीसीकरिता विधानसभेत किमान शंभरी पार करावीच लागणार असून त्यासाठी या ४ जिल्ह्यांतील २५ पैकी १८ ते २० जागा भाजपला कोणत्याही परिस्थितीत जिंकाव्याच लागणार आहेत. त्यामुळे कोणताही बेसावधपणा न बाळगता अत्यंत शिस्तबद्धरित्या, संपूर्ण ताकद पणाला लावून आणि जोमाने या भागात भाजप आपली वाटचाल करत दिसत आहे.निमेश वहाळकर