‘ये बिक गई है गोरमेंट’

    दिनांक  31-May-2018   
 

सिनेमागृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी तंबाखूसेवनापासून प्रेक्षकांना प्रवृत्त करण्यासाठी एक जनजागृतीपर जाहिरात दाखविली जाते. त्या जाहिरातीत तंबाखूमुळे कर्करोग झालेल्या रुग्णांची बिकट अवस्था बघून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. त्या जाहिरातीतील मुकेश हरणे तर कॅन्सरने मरण पावला. तेव्हा, ती जाहिरात दरवेळी बघताना हाच विचार येतो की, तंबाखूचे आरोग्यावर इतके भीषण परिणाम होत असले तरी लोक तंबाखूसेवन, सिगारेटच्या व्यसनात इतके आकंठ कसे बुडतात? निर्व्यसनी लोकांना जर त्या जाहिरातींमुळे अस्वस्थ वाट असेल तर खुद्द तंबाखूसेवन करणार्‍यांना त्याचे काहीच वाटत नाही का? की, हे फक्त जनजागृतीपर जाहिरातीपुरते तंबाखूपासून परावृत्त करण्यासाठी आहे, असे व्यसनींना वाटत असावे? पण, याचे उत्तर सरळ आहे, तंबाखूसेवनाने कर्करोग होतो. तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा, पोटाचा, किडनीचा आणि इतरही बर्‍याच घातक प्रकारचा. याची पूर्ण माहिती नसलेले आणि असलेलेही तंबाखूसेवनाच्या नशेत हरवलेले दिसतात. त्यांना स्वत:च्या आरोग्याची काळजी तर नसतेच, शिवाय आपल्या कुटुंबाचा, भवितव्याचा ते विचारही करत नाहीत, असेच खेदाने म्हणावे लागेल; अन्यथा तंबाखूपासून चार हात लांब राहणेच त्यांनी पसंत केले असते.
 
मुद्दा हाच की, सिनेमागृहातील जनजागृतीपर तंबाखूविरोधी जाहिराती असो वा तंबाखू, गुटखा आणि सिगारेटवरील पाकिटांवरील ‘तंबाखूमुळे कर्करोग होतो,’ हे अधोरेखित करणारी ओळ आणि तोंडाच्या कर्करोगाचे त्यावरील चित्र, यामुळे कुठेतरी सेवनकर्त्यांना तंबाखूपासून परावृत्त करण्याचाच मूळ हेतू असतो. तसेच, आजचा, ३१ मे चा दिवस जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणूनही जगभरात साजरा केला जातो... तर मुद्दा हा की, भारतातही तंबाखू उत्पादनांवरील अशा ‘चेतावणीपर’ संदेशांचे आणि त्यावरील फोटोंचे प्रमाण हे पॅकिंगच्या ८५ टक्के इतके निर्धारित आहे. इतर देशांतही हे प्रमाण मुख्यत्वे ५० टक्क्यांहून अधिकच आढळते. तेव्हा, शेजारी पाकिस्तान सरकारनेही गेल्या वर्षी तंबाखू उत्पादनांवरील कर्करोगासंबंधित छायाचित्राचा आकार ८५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला. त्याचे सर्व स्तरातून स्वागतही झाले. कारण, पाकिस्तानातही दरवर्षी एक लाखांहून अधिक लोक तंबाखू व तत्सम आजारांमुळे मृत्युमुखी पडतात. पण, सरकारच्या या निर्णयाविरोधात विदेशी तंबाखू व खासकरून सिगारेट विक्रेत्या मोठ्या कंपन्यांनी आक्षेप घेतला. फिलीप मॉरीस, ब्रिटिश अमेरिकन टोबॅको या कंपन्यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. या कंपन्यांना हीच भीती सतावते आहे की, अशाप्रकारे मोठ्या आकारात ‘तंबाखूमुळे कर्करोग होईल,’ अशा आशयाची छायाचित्रे पॅकिंगवर वापरल्यास कदाचित तंबाखूजन्य पदार्थ वापरणार्‍यांची संख्या घटेल. त्यांची ही व्यावसायिक भीती कदाचित रास्त असेलही. पण, धक्कादायक बाब म्हणजे, पाकिस्तान सरकारनेही या बड्या कंपन्यांसमोर नमते घेत लगेच या निर्णयावर यू टर्न घेतला आहे. त्यामुळे ती छायाचित्रे ८५ टक्के आकाराची नाही, तर केवळ ६० टक्के इतक्या पॅकिंगच्या भागावर छापली जातील.
 
विशेष म्हणजे, या मोठ्या कंपन्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे वगैरे यासंबंधी लॉबिंग केले नाही, तर थेट पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद अब्बासी यांचे उंबरठे झिजवले. पंतप्रधानांनीही लगोलग हा निर्णय बदलला आणि विदेशी कंपन्यांसमोर गुडघे टेकले. कारण काय तर, या कंपन्यांकडून मिळणारे कर आणि एक्साईज ड्युटी. २०१६-१७ आर्थिक वर्षात तंबाखूजन्य उत्पादनांतून तब्बल ५५० दशलक्ष डॉलर पाकिस्तान सरकारच्या तिजोरीत जमा झाले. त्यामुळे या मोठ्या कंपन्यांची नाराजी पत्करून महसुलावर पाकिस्तान सरकारला पाणी सोडायचे नाही, हा सरळ-साधा हिशोब परंतु, त्यासाठी आपण आपल्याच देशाच्या नागरिकांच्या जीवाशी खेळत आहोत, हा विचार मात्र पंतप्रधानांच्या ध्यानीमनीही आलेला दिसत नाही. ही अत्यंत दुर्दैवी आणि क्‍लेशकारक बाब म्हणावी लागेल. बड्या कंपन्यांसमोर अशाप्रकारे लोटांगण घालणे आणि आपल्या जनतेच्या हितार्थ घेतलेले निर्णय केवळ महसुलापोटी फिरवणे, यापेक्षा मोठे सरकारी अपयश ते काय...
 
साध्या तंबाखूजन्य पदार्थांच्या बाबतीत ही स्थिती असेल तर इतर क्षेत्रांतील अशा सरकारी लॉबिंगचा विचार न केलेलाच बरा. म्हणूनच, पाकिस्तानची जनता ‘ये बिक गई है गोरमेंट’ हे जे एकमुखाने म्हणतात, ते अगदी योग्यच!
 
 
 
 
- विजय कुलकर्णी