छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ शेतकरी कर्जमाफीसाठी मुदतवाढ

    दिनांक  31-May-2018
 
 
 

हिंगोली :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 योजनेअंतर्गत शासन निर्णय दिनांक 9 मे, 2018 अन्वये सदर योजनेच्या व्याप्तीमध्ये वाढ करण्यात आली असून, त्यानुसार या योजनेत दिनांक 1 एप्रिल, 2001 ते 31 मार्च, 2009 या कालावधीत घेतलेल्या कर्जापैकी केंद्र व राज्य शासनाच्या सन 2008 व सन 2009 च्या कर्जमाफी योजनांचा फायदा न मिळालेल्या दिनांक 30 जून, 2016 रोजी थकीत असलेल्या पीक/पुनर्गठीत व मध्यम मुदत कर्जांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्याच बरोबर दिनांक 1 एप्रिल, 2001 ते 31 मार्च, 2016 या कालावधीत वाटप केलेल्या इमू पालन, पॉली हाऊस व शेडनेट यासाठी मध्यम मुदकर्ज प्रकारांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. 
 
 
 
सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित कालावधीत सदर कर्ज प्रकाराच्या बाबत नव्याने अर्ज करणे किंवा यापूर्वी दिनांक 22 सप्टेंबर 2017 पर्यंत तसेच दिनांक 1 मार्च, 2018 पासून पोर्टलवर ऑनलाईन सादर केलेल्या अर्जामध्ये सदर कालावधीतील कर्ज प्रकारासंबंधी माहितीचा समावेश करणे आवश्यक असल्याने सदर कर्ज प्रकारांशी निगडीत शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जखात्यांची माहिती नवीन अर्जाद्वारे किंवा यापूर्वी केलेल्या अर्जात बदल करुन ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यासाठी www.csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर दिनांक 5 जून, 2018 पर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. 
 
 
 
सदर योजनेच्या यापूर्वीच्या निकषात कोणताही बदल करण्यात आलेला नसून दिनांक 9 मे, 2018 च्या शासन निर्णयान्वये या योजनेची व्याप्ती वाढवून यामध्ये केवळ सन 2008 व सन 2009 च्या कर्जमाफी योजनांचा लाभ मिळाला नसलेल्या दिनांक 1 एप्रिल, 2018 ते 31 मार्च, 2019 या कालावधीतील पीक / पुनर्गठन व मध्यम मुदती कर्जाचा व दिनांक 1 एप्रिल, 2011 ते दिनांक 31 मार्च, 2016 या कालावधीत वाटप केलेल्या इमूपालन, पॉलीहाऊस व शेडनेट यासाठी मध्यम मुदत कर्ज प्रकारांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.