पिक विम्याची रक्कम ७ तारखेअगोदर जमा करा : मुख्यमंत्री फडणवीस

30 May 2018 19:55:27




मुंबई :
गेल्या वर्षी राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पीक विम्याची रक्कम येत्या ७ जून पूर्वीच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पिक विमा कंपन्यांना दिले आहेत. मुंबई मंत्रालयात घेण्यात आलेल्या पंतप्रधान पिक विमा योजनेच्या आढावा बैठकीमध्ये आज ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि पिक विमा कंपन्यांचे सर्व प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे यंदा मान्सून हा वेळेअगोदरच केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे लवकरच तो राज्यामध्ये देखील आपले हजेरी लावले. तसेच यंदा पाऊस चांगला होणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून प्रयत्न करणे सरकारचे कार्य आहे. त्यामुळे पिक योजनेअंतगर्त ज्याज्या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा दिलेला आहे. त्या सर्व कंपन्यांनी विम्याच्या सर्व रक्कमा संबंधित शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ७ जूनपूर्वीच जमा कराव्यात, जेणेकरून गरजू शेतकऱ्यांना या रक्कमेचा लाभ यंदाच्या पेरण्यांसाठी करता येईल, असे मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले.


तसेच कंपन्यांच्या गेल्या वर्षीच्या कामगिरीचा देखील त्यांनी यावेळी आढावा घेतला व शेतकऱ्यांना लाभ योग्यरीत्या मिळावासाठी म्हणून विमा कंपन्यांना काही निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले. ज्या विमा कंपन्यांची कामगिरी समाधानकारक नाही त्यांनी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना रक्कम मिळेल यासाठी तत्परता दाखवावी, असे त्यांनी म्हटले. क्षेत्रिय स्तरावर अधिक गतीने काम होण्यासाठी मनुष्यबळ वाढवणे आणि खातेधारक शेतकऱ्यांची माहिती पडताळणी होत नसले तर अशा वेळी विमा कंपन्यांनी या खातेदारांची रक्कम संबंधित बॅंकेकडे जमा करावी, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
Powered By Sangraha 9.0