विनयभंगाप्रकरणी व्हीजेटीआयच्या प्राध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल

28 May 2018 22:35:41


मुंबई; वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) या संस्थेत एका प्राध्यापकांने केलेल्या अश्लील वर्तन आणि विनयभंगाच्या घटनेच्या विरोधात माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. विद्यार्थी संघटनेने आवाज उठवल्यानंतर तक्रार नोंदविण्यात आल्याची माहिती व्हीजेटीआयचे संचालक डॉ. धीरेन पटेल यांनी दिली. यासाठी आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या विद्यार्थ्यांनी संचालकांना घेराव घालत परिसरात निदर्शने केली. व्हीजेटीआयमध्ये गणित हा विषय शिकविणारे प्रा. बी. जी. बेलापट्टी यांनी प्रथम वर्ष शिकणार्‍या एका विद्यार्थिनीला आपल्या केबिनमध्ये बोलावून, तिच्याशी अश्लील वर्तन करून, तिचा विनयभंग केल्याची घटना मागील आठवड्यात समोर आली. त्याविषयी संबंधित मुलगी व तिच्या वडिलांनी लेखी तक्रार व्हीजेटीआयच्या संचालकांकडे केली होती. कालपर्यंत संचालकांनी या घटनेप्रकरणी संबंधित प्राध्यापकावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याचे धाडस दाखवले नाही. यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी व्हीजेटीआयसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. संचालकांना घेराव घालत, संबंधित प्राध्यापकावर कठोर कायदेशीर कारवाई व निलंबनाची मागणी यावेळी करण्यात आल्यानंतर त्याची व्हीजेटीआय प्रशासनाने दखल घेत, पोलिसांत तक्रार नोंदविली असल्याची माहिती संचालकांकडून देण्यात आली.

Powered By Sangraha 9.0