आंध्र, बंगाल, अंदमानसाठी कॉंग्रेसकडून नवे प्रभारी

27 May 2018 16:35:16


नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पक्षांतर्गत दोन महत्त्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत. आगमी निवडणुकांसाठी म्हणून आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांसाठी दोन नवे प्रभारी कॉंग्रेसने नेमले असून उम्मन चाण्डी आणि गौरव गोगोई यांची अनुक्रमे आंध्र आणि प.बंगालसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच पक्षाने याविषयी घोषणा केली असून याविषयी पक्षाकडून परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे.

आंध्रमध्ये राज्याचे माजी प्रभारी असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांच्या जागी लवकरच चाण्डी हे पक्षाच्या प्रभारी पदाची धुरा सांभाळतील. तर प.बंगालमध्ये डॉ.सी.पी.जोशी यांच्या जागी गोगोई हे लवकरच आपला पदभार स्वीकारली अशी घोषणा पक्षाने केली आहे. याचबरोबर गोगोई यांच्याकडे प.बंगालबरोबर अंदमान आणि निकोबार या राज्याची देखील जबाबदारी देण्यात आली असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. दरम्यान सिंग आणि जोशी यांच्या आजपर्यंतच्या कार्यासाठी पक्षाने त्यांचे आभार व्यक्त केले असून तातडीने पक्षाच्या या नव्या नियुक्त्या या दोन्ही राज्यांमध्ये लागू करण्याचे निर्देश पक्षाने दिले आहेत.



Powered By Sangraha 9.0