दत्ता नर यांचा भाजपात प्रवेश

    दिनांक  27-May-2018खानिवडे: काँग्रेस पक्षामध्ये तळागाळात जाऊन काम करण्यासाठी व पक्ष संघटना बांधण्यासाठी कोणी काम करत नसल्याची खंत व्यक्त करून, तसेच प्रस्थापितांच्या विरोधात सतत लढूनही काँग्रेस नेहमी त्यांची बाजू वेळोवेळी राखत असल्याचा आरोप करून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव दत्ता नर यांनी पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे वसईतील पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच, आपल्या अनेक सहकार्‍यांसह आपण भाजपात प्रवेश करत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

“संपूर्ण विश्वाला नव्या भारताची ओळख देणारे, सव्वाशे कोटी भारतीयांचे भविष्य उज्ज्वल करणारे, भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचे प्रयत्न करणारे; स्वच्छ भारत जनजागृती अभियान देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रामाणिक प्रयत्नाला मी आकर्षित झाल्याने भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहे,” असे नर यांनी यावेळी सांगितले.

तसेच यापुढे पक्ष संघटना वाढवण्याचे काम प्रामाणिकपणे करणार असल्याचेही यावेळी नर यांनी सांगितले